चाहूल दिवाळीची, झळ महागाईची
चाहूल दिवाळीची, झळ महागाईची
लगबग चाललेले
भादवही अश्विनही
धामधूम उत्सवांत
अनामिक काहूरही...१
दिवाळीच्या चाहुलीने
जगी हर्षाचा वसंत
माझ्या डोई चिंता भार
क्षणीकही ना उसंत...२
विष्णुप्रियेच्या स्वागता
जळीस्थळी रेलचेल
प्रश्न छळती उद्याचे
मनी माझ्या घालमेल...३
दुष्काळ, महागाईची
झळ केवढी सणाला
सदाचीच हुरहुर
जीर्ण माझ्या नशीबाला..४
आस पिल्लांच्या डोळ्यांची
उद्या जाईल सुकुनी
ना फटाके,करंज्या
तरारेल दुःख मनी...५
आसमंत उजलेल
लक्ष लक्ष त्या दिव्यांनी
वाट तुझी मी पाहीन
तेज डोळ्यांत आणुनी...६
दिवा एक जरी तेवेल
लक्ष्मी माझ्या गं अंगणी
सुख येवो संसारात
माये तुझ्या पावलांनी...७
