बुद्ध भीमात पाहिला
बुद्ध भीमात पाहिला
आज पुन्हा एकवार
बुद्ध भीमात पाहिला
अश्रुपूर्ण लोचनांनी
श्रद्धाभाव मी वाहिला ||0||
अष्टपैलू ज्ञान ज्याचे
प्रखर वाणीचा प्रहार
समाजाला नव्हता कोणी
असा एक तारणहार
घणाघाती वक्तव्याने
स्वाभिमान जागविला
अश्रुपूर्ण लोचनांनी
श्रद्धाभाव मी वाहिला ||1||
जगण्यातली तफावत
त्याने विषद केली अशी
ठिणगीस देऊन हवा
आग भडकावी जशी
मृत मने पेटवून
त्याने वणवा लाविला
अश्रुपूर्ण लोचनांनी
श्रद्धाभाव मी वाहिला ||2||
देव नाही दैव नाही
तुझे दैव तुझ्या हाती
शिकून संघटित होऊन
ज्ञानाच्या लावा वाती
शिकवून संघर्ष
दैववाद बघ जाळीला
अश्रूपूर्ण लोचनांनी
श्रद्धाभाव मी वाहिला ||3||