अंधारी वळणं
अंधारी वळणं
1 min
67
दूर दूर पर्यंत पसरलेला घनघोर अंधःकार
छोटासा प्रकाशाचा कवडसा
अन् तिथवरच जाऊन थांबलेली
ती नागमोडी वळणं
पुढे काय?
मनात साठलेले प्रश्नचिन्ह
मग कानोसा घेत घेत चाललेलं मार्गक्रमण
कधी बिचकत अन् कधी लडखळत
पुढच्या प्रवासाचा वेध घेत
जीवनही येऊन ठेपते की कधी
अशा अंध:कारमय वळणावर
मग उगीचच सावट नैराश्याचं
ते चाचपडणं अन् ठेचकाळणं
बिकट वाटते वाट
वाटतं व्हावा इथेच हीचा अंत
नसतेच काही दृष्टिपथात दूर दूर पर्यंत
पण मनातला आशावाद ,नवी उमेद प्रेरणा देत असते
अन् चालत असतो आपण दूर दूर पर्यंत
एक आशा घेऊन
त्या प्रकाशाच्या कवडस्याच्या दिशेने!
