आठवणीतील क्षण
आठवणीतील क्षण
आमच्या कायम स्मरणातलं गाव म्हणजे करमाळा जिल्हा सोलापूर . ते गाव सोडून आता बराच काळ लोटला. पण आठवणीत जशाच्या तशाच आहेत. वडिलांची सर्विस तेथेच होती. आम्ही भावंडे लहानाची मोठे, आमची जडण-घडण, सर्वांचे शिक्षण करमाळ्यातच झाले. तसे शांततापूर्ण गाव होते. तालुका प्लेस.बेसिक सोयी सर्व होत्या. करमाळ्याचे स्टॅन्ड स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध होते. स्टँड पासून पाच मिनिटाच्या अंतरावर 'महावीर फरसान 'म्हणून दुकान आहे. खूप सुंदर चव होती. त्यामुळे खूप प्रसिद्ध. लोक थांबून ते खरेदी करत.दोन हायस्कूल होते महात्मा गांधी विद्यालय आणि अण्णासाहेब जगताप विद्यालय. आम्ही सर्व महात्मा गांधी विद्यालयत शिकलो. एक कॉलेज यशवंतराव चव्हाण महाविद्यालय डिग्रीपर्यंत चे. करमाळ्याचे ग्रामदैवत म्हणजे कमलादेवी मंदिर. गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर. नवरात्रात पायी मंदिरात जात असू. मंदिर पूर्ण दगडी, जुन्या पद्धतीचे. फिरायला जाण्याचे एकच ठिकाण. स्टॅन्ड वरून सरळ पुढे गेले की एक छान दत्त मंदिर.तिथे मोठे गार्डन. फिरायला गेलो की बरेच ओळखीचे लोक भेटायचे.
आमची खरेदीची दुकाने तर फिक्स ठरलेली असायची.
मेडिकल ,स्टेशनरी ,किराणा. करमाळ्यातील 'किल्ला विभाग' म्हणजे गल्लीचेच नाव होते ते. तिथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे खूप सुंदर आणि जुने ही. आईचा रोजचा पहाट काकड्या ला जाण्याचा नियम.
तिला फार आवड गाण्यांची. कधीकधी आम्ही पण जायचो तिच्याबरोबर. नंतर वडिलांची बदली पंढरपूरला झाली. त्यामुळे करमाळ्याशी संबंधच संपला. आताही नाशिकहून पंढरपूरला जाताना करमाळ्याच्या स्टॅन्ड वरून जाणे होते. डायरेक्ट बस असंते त्यामुळे उतरता येत नाही.
प्रसंग चांगलाच आठवतोय. माझ्या आयुष्यातली पहिली दंगल मी पाहिली करमाळ्यात झालेली. सातवी आठवीला असेल तेव्हा. नवरात्राचे दिवस असल्यामुळे देवीची मिरवणूक रस्त्यावरून जात होती. मिरवणूक मशिदी पाशी आली, आणि मुसलमान लोक मशिदीच्या वरून, मोठे मोठे दगड खाली मिरवणुकीवर टाकत होते. आणि हे मी थोड्या अंतरावर उभी राहून पाहत होते. आताही तो प्रसंग डोळ्यासमोर आला. नंतर खूप गोंधळ झाला पोलीस आले. त्यांना गोळीबार करावा लागला. त्या दंगलीमध्ये माझ्याच बरोबर चा आमच्या शाळे मधला 'पाठक' नावाचा मुलगा गेला. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये तो हुशार म्हणून फेमस होता. त्याच्या स्मृतीसाठी शाळेने पाच वर्षे गॅदरिंग बंद ठेवले होते.
आत्ता आठवतात ते आमचे इतिहासाचे जाधव सर. त्यांना बोलताना ' याठिकाणी' हे शब्द उच्चारायची खूप सवय होती. एकदा आम्ही ते काउंट केले. पण त्यांना ते कळले. दुसऱे पवार सर. जसे आडनाव असेल त्या आडनावावरून ते प्रत्येकाला बोलायचे.
**भेटवस्तू आणि तिची आठवण**
मिळालेली भेट ही वस्तू रुपात किंवा मानसिक रूपातही मिळत असते. कधी ही अनपेक्षित आनंदाचीही असते. त्याआठवणी मात्र निरंतर आपल्या जवळ ताज्या असतात. कधीही न विसरल्या जाणाऱ्या.
बऱ्याच वेळा आपल्या पहाण्यात, वाचनात येते की, बहिण-भाऊ एकमेकांना भाऊबीजेच्या दिवशी कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी भेट देतात, तर कधी नवरा बायको एकमेकांना. तर कधी मुले आई-वडिलांना. व भेट वस्तू ही छोटी असते किंवा मोठी असते, भेटीचं मोल हे वस्तू रुपात मोजण्या ऐवजी त्या पाठीमागच्या भावनांच्या रूपात मोजले तर, आनंद द्विगुणीत होतो.
खूप वर्ष झाली या आठवणीला. मी दहावीत असतानाची गोष्ट आहे. परीक्षेला घड्याळाची खूप आवश्यकता वाटत होती.बोर्डाच्या परीक्षेच्या आधल्या दिवशी आजोबा कबूल केल्याप्रमाणे घड्याळ घेऊन आले. त्यावेळेस एचएमटी चे घड्याळ खूप चालायचे. माझा आनंद तेव्हा गगनात मावत नव्हता. आणि माझी बोर्डाची परीक्षा पार पडली.
**रम्य ते बालपण आणि आठवणी**
आमचं बालपण करमाळा या गावात गेले. वडिलांची सर्विस तेथे बँकेत होती. एका वाड्यात आम्ही रेंट वर राहत होतो.दोनच रूम होत्या पण सामान खचाखच भरलेले होते. आम्ही चौघे भावंडे आणि आई वडील असे सहा जण राहत असू. आम्ही धरून वाड्यात पाच भाडेकरू. आम्ही, मालुताई, मोरे काकू, शहा भाभी आणि स्वतः जोशी काका आणि जोशी काकू मालक. आमच्या गल्ली चे नाव खडकपुरा. साफ रस्ता नव्हता, असे ओबडधोबड खडक बसवलेले होते. म्हणून खडकपुरा हे नाव पडले होते. पूर्ण गल्ली ओळखीची. गल्लीतले सर्व मुलं-मुली बरोबरीचे होते. तालुका प्लेस चे गाव असल्यामुळे दोनच शाळा होत्या. आणि गल्लीतले बहुतेक जण एकाच शाळेत शिकत होतो. त्यामुळे शाळेत जाणे ,अभ्यास करणे सर्व एकत्रितपणे व्हायचे.खेळामध्ये विटी-दांडू आणि विष -अमृत असे खेळ खूप रंगायचे. अधूनमधून जेवणाची अंगतपंगत होत असे. भातुकलीचे खेळ रंगायचे. लहानपणी आम्ही कधीही चॉकलेट खाल्ले नाही की कॅडबरी नाही की कुरकुरे नाही. फक्त संध्याकाळी खारे शेंगदाणे घेऊन एक काका येत असत. रोज नाही पण अधून-मधून ते मिळायचे. आमच्या घराला लागून बसायला एक कट्टा होता. सहा सात वाजता बाबा बँकेतून घरी आले की चहापाणी झाल्यावर आम्ही सर्वजण कट्ट्यावर रेडिओ ऐकत बसायचो. आम्ही बसलो की आजूबाजूचे लोक ही यायचे गप्पा मारायला. रेडिओवरचे माझा आवडता प्रोग्रॅम म्हणजे बिनाका गीतमाला. दर बुधवारी संध्याकाळी सात ते आठ एक तास ही गितमाला लागायची. अमीन सयानी चा तो भारदस्त आवाज अजूनही कानात गुंजतो. " बहन और भाईयो अब आप सुनेंगे बिनाका का गीतमाला" हा आवाज ऐकला की एक तास मी जागेवरून हालत नसे. प्रत्येक गाणं थोडफार पाठ असायचं. दुसरा आवडणारा कार्यक्रमाचे "नभोनाट्य." आठवड्याची कार्यक्रमाची रूपरेषा आवर्जून ऐकत असू.
आमचे मालक जोशीकाका स्वतः पत्रिका बघत असत. त्यामुळे वाड्यात नेहमी त्यांच्याकडे येणार्या लोकांची गर्दी असायची. जोशी काकूंचे "रताळ्याचे थालपीठ" मला अजूनही खूप आठवते. त्यांची एक नात होती सुमती नावाची. त्यांच्या मुलीची मुलगी. एका खेड्यात राहत असे ती. सुट्टी लागली की आजी कडे यायची. तिला एवढी अक्षर ओळख नव्हती. पण आम्ही अभ्यासाला बसलो की ती पण पुस्तक घेऊन बसायची. आणि पुढे पुस्तक धरून मनाने काहीही वाचायची. आम्हाला खूप हसायला यायचे. आम्ही चौघे बहिण-भाऊ एकाच शाळेत शिकलो. त्यामुळे सर्वांचे शिक्षक तेच . फक्त वेळ बदललेली.
जसं सकाळी उठल्यावर दिवसभराच्या कट,कारस्थानाचा चेहऱ्यावर लवलेशही नसतो, चेहरा निर्विकार असतो तसेच बालपणही असतं. आयुष्यभरातल्या धकाधकीचा, व्यवहाराचा जराही लवलेश नसलेल्या चेहरा म्हणजे बालपण.
बालपण कशाकशात शोधावं?
लग्नाच्या वरातीतला बँडचा आवाज ऐकून धावणाऱ्या मनात शोधावं. की आकाशातल्या विमानातल्या आवाजात शोधावं.
पावसाच्या पाण्यात नाचताना शोधावं की बनवलेल्या कागदी होड्या पाण्यात सोडताना शोधावं की खेळताना धडपडून पडण्यात शोधावं
आईने दिलेल्या मारात शोधाव की बाबांनी घेतलेल्या आपल्या बाजूमध्ये शोधावं,
बहीण-भावांच्या एकमेकांच्या भांडणात शोधाव की एकमेकांची खोडी काढण्यात शोधावं. की जेवणासाठी च्या ताटावरून भांडण्यात शोधावं
आजारी पडल्यावर आईने केलेल्या लाडात शोधाव की सर्दी झाल्यावर आईने लावलेल्या विक्स वेपोरेब मध्ये शोधावं.
दिवसभर खेळताना च्या मस्ती मध्ये शोधावं की थकून आईच्या मांडीवर निरागसपणे झोपण्यात शोधावं.
"बालपणीचा काळ सुखाचा"
आपल्या मानसिक आनंद जर कुणी जपला तर त्याहून वेगळी भेटवस्तू ती काय असते? आठवण आहे मागच्या वर्षीची. मैत्रिणीच्या माहेरी (जळगाव खान्देश) भरीत पार्टी चा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी मैत्रिणीने आम्हालाही आमंत्रित केले होते. माझा वाढदिवस आणि कार्यक्रमाचा दिवस एकच होता. त्यामुळे मला जायला नको वाटत होते. पण विचार केला घरी तर नेहमीच आपण वाढदिवस साजरा करतो. एक वर्ष दुसरीकडे केले तर काय हरकत आहे? आणि आम्ही गेलो. तो खानदेश भाग मला पूर्ण अपरिचित होता. ती भाषा ,तेथील केळीच्या बागा, ताजे वेफर्स करुन देणारे स्टॉल, रोजच्या जेवनातील वेगळे पदार्थ, भरीत करण्याची पद्धत मला सर्वच नवीन होते. मी तर प्रेमात पडून गेले. त्या केळीच्या बागेमधे तो मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. रोज केळीच्या पानावर जेवन असायचे. ते दोन-तीन दिवस इतके सुंदर गेले की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिथे होते हे कायम स्वरूपी आठवणीत राहील.
दुसरी आठवण तर अगदी ताजी आहे. अनपेक्षित असा आनंद मिळाला. याच आठवड्यात माझा वाढदिवस होऊन गेला. मैत्रिणींच सरप्राईज होतं माझ्यासाठी. त्यादिवशी मैत्रिणी केक घेऊन आल्या. आणि बर्थडे सेलिब्रेशन झाले. एका मैत्रिणीने स्वतः केलेली कॅनव्हास पेंटिंग फ्रेम( कामधेनु गाय) भेट म्हणून आणली होती. हा अनपेक्षित आनंद मी कधीही विसरू शकणार नाही.
