आठोळी की चारोळी?
आठोळी की चारोळी?
आठोळीतील चारोळी नि आठोळी वर चारोळी
( मगजबी चारोळी तर कोय आठोळी)
चार ओळींचा अर्थ त्या
सांगू नका हो मज मुळी!!
शब्दांची करूनी कोटी
कल्पकता करते खुळी!!!!
कधी साद देई प्रेमाची तर
कधी ठोकत येई आरोळी!!
आनंदाला उधाण कधी तर
होते सौख्याची कधी होळी!!!!
कधी भासे लबाड नि लुच्ची
सुगम तितकीच साधी भोळी!!
विणलेल्या स्वच्या जाळ्यात
गुरफटलाय का कधी कोळी!!!!
नको कुणा ते दिर्घ आख्यान
संक्षिप्त लिहिती मग चारोळी!!
नकोच नेहमी इंजेक्शन मोठे
करी काम जर औषधी गोळी!!!!
सहज जाई गिळली ती मग
असता लहान अन् वाटोळी!!
अधिक होता मोठी नि लांब
करावी लागते मग खांडोळी!!!!
फळा पेक्षाही लागे रुचकर
फोडून खाल्ली जर आठोळी!!
आठोळी फोडता करवंदातील
मिळे करंजीसाठीची चारोळी!!!!
डोस नको मोठ्या आठोळीत
ऐकवा रे फक्त मग चारोळी!!!!
चारोळी तच सार आठोळींचा
लिहिता अर्थ पूर्ण चार ओळी!!
नको डोस तो आठ ओळींचा
ऐकवा फक्त त्या चार ओळी!!!!
प्रत्यक्ष शब्दशः अर्थ व गंमतीशीर या दृष्टिकोनातून विचार करून मी ही कविता लिहिली आहे. सहज सुचली म्हणून लिहिली आहे!
