आरसा
आरसा
एक असतो आरसा
दाखवतो तुमचा चेहरा
जसा आहे तसा
कधी त्यात दिसतो
सुंदर चंद्रमुखी चेहरा
मनात हसतो आरशाचा
कोपरा आणि कोपरा
केतकीचा वर्ण आणि टपोरे
पाणीदार डोळे
चंदनाची काया आणि
ओठ जसे मधाचे पोळे
कधी दिसतो प्रौढ चेहरा
वयाचे गळालेले मोरपीस
पांढरे केस उपटताना
आरसा होतो कासावीस
कधी दिसतो छोटासा सोनुला
प्रतिबिंब मागतो आपुले
रामरायाच्या हट्टापुढे
कौसल्याने हात टेकले
भूत भविष्य वर्तमान
सारे दाखवतो आरसा
चिऊ-काऊच्या टोच्यानी
हैराण होतो आरसा
वार्धक्याचे याचे रुपडे पाहता
पाठ फिरवतो आरसा
वेदनेने कळवळतो
रडतो कधी आरसा
