"आपुलकी अन प्रेम जिव्हाळा
"आपुलकी अन प्रेम जिव्हाळा
सोबत सोबत निसर्गाच्या सानिध्यात राहू
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
तिथे असतो स्वच्छ वारा अन निर्मळ जलधारा
गुदमरलेल्या ह्रदयामध्ये श्वास भरून घेवू.!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
हिरवाईने नटलेथटले उंच डोंगर कडे
मयुरासंगे तरुवेलींसह खेळूनी लाभ घेवू .!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
शुभ्र दुधांच्या उंचावरुनी पडती तुषार धारा
इंद्रधनुच्या रंगीत लहरी अंतरंगात साठवू .!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
भेदभावाचे सावट नाही निर्मळता चहूकडे
लालहिरवा,निळाजांभळा,पांढरा लपेटून झोपू .!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
खेळीमेळीने जगती वनी अंसख्य जातीच्या मुळ्या
जाती-पातीच्या विषम मुळ्या खोदूनी नष्ट करू .!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
नभांगनातील सूर्यचंद्र अन् तारांगन ही सोबत
निरभ्र वर्तुळे अन कवडसे डोळ्यांमध्ये भरवू .!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
आपुलकी अन प्रेम जिव्हाळा पशुपक्षी ही देतील
भेदभाव कुत्सित बुद्धीला मातीमध्ये पुरवू .!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!!
पुर्व पश्चीम, उत्तर दक्षिण दश दिशा ही आपुल्या
मृदगंधाने तृप्त होऊनी काळ्या मातीसाठी सरू..!!
चल ना सखे आपण दोघे अरण्यात राहू ..!
