आम्ही तृतीयपंथी
आम्ही तृतीयपंथी


सगळ्यांच्या जीवनात संघर्ष असतो,पण मला अशा लोकांचा संघर्ष शब्दांत मांडायचा आहे,ज्यांच्याकडे आजही लोकांची बघण्याची दृष्टी वेगळी आहे, त्यांच्या जीवनाचा संघर्ष मी माझ्या शब्दांत माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करते...कोणाचं मन किंवा भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही,तसे वाचकाला वाटत असेल तर माझं साहित्य गृहित धरले जात नाही ,असे कळवावे...
तृतीयपंथी आम्ही,आम्हांला ही जगू द्या...
माणूस म्हणून जन्माला आलो
पण माणसांतच नाही ठेवलं,
क्रुर वाटते नियती आता
जिने रस्त्यावर आल्यासारखं फिरवलं...||१||
इतरांना पाहताना हेवा वाटतो
फार नशीबवान आहेत असं वाटतं,
वाळीत टाकल्यासारखी वागणूक आम्हां
आम्हांलाही अभिमानानं जगावं वाटतं...||२||
बाई माणूस फरक नाही
समान हक्क आहेत असं फक्त म्हंटल जातं,
आमच्याकडे पाहताना मात्र
भेदभाव करूनच पाहिलं जातं...||३||
वेगळेपणाच्या कटाक्ष नजरेच वाईट वाटतं
म्हणून थोडं हसू,थोडा रुसवा आहे,
हार नाही मानत ,का तर
तृतीयपंथीची लढाई लढायची आहे...||४||
भाव-भावना आम्हांलाही आहेत
आपलेपणाच्या नात्यात थोडीशी जागा द्या,
हात पसरूनही समाधानी आहोत
तृतीयपंथी आम्ही,आम्हांलाही जगू द्या...||५||