आई
आई
जगी अशी कोण
सर्वश्रेष्ठ ती माय
आई म्हणतात तिला
वासराची ही गाय
माये तुझी सय
येते क्षणोक्षणी
डोळ्यांतून गळतसे
आसवांचे पाणी
तुझ्याविना नाही
आधार मायेचा
डोईवरी असे
हात वात्सल्याचा
जन्माची शिदोरी
जोडूनि नाळेसंगे
तुझ्या पोटी आले
कृपा पांडुरंगे
बीज माझे उदरी
प्रेमाने प्रसविले
देऊनि पान्हा अमृताचा
मला पोसविले
आई तुझ्यासोबत
स्वर्गही पडे फिका
तुझ्यासाठी साहीन
साऱ्या दुनियेची टीका
आईसारखे दैवत
तिन्ही लोकीं ठायी
तुझी मूर्ती आई
वसावी माझ्या हृदयी
साऱ्या लेकरांना
देई सुख प्रेम माया
सुखाची सावली नि
वृक्षापरी छाया
सहवासात तुझ्या
भासे सोन्याची लंका
तुझ्या स्नेहाळ प्रेमाचा
वाजे जगभरात डंका
गाऊ किती आई
तुझीच पुण्याई
देईन सारे सुख
होऊनि उतराई
भारती सावंत