STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Others

2  

Shraddha Kandalgaonkar

Others

नवरात्रीचे रंग... माझ्या नजरेतून...

नवरात्रीचे रंग... माझ्या नजरेतून...

2 mins
53

लाल रंग..

बस मध्ये उभे राहून प्रवास करताना नकोस वाटणारे स्पर्श तिला आत कुठेतरी एकटी करत होते.बराच वेळ वाट बघून शेवटी तिने बेल वाजवून बस थांबवली आणि त्याला सामोरे जाऊन म्हणाली,"इथेच करूया तसाही तू बेताल झाला आहेसच".सगळ्यांच्या नजरा क्षणात खाली वळल्या ,त्याच्या नजरेला नजर देऊन ती दिमाखात वळली,प्रत्येक वेळी राक्षसाला मारायला तलवारीची गरज नसते नजरेची धारही त्याला नेस्तनाबूत करू शकते.


राखाडी. रंग 

दोन मुली नंतर मुलासाठी त्याने आणि त्याच्या घरातल्यांनी केलेला पाणउतारा तिच्यातल्या बाईच्या आणि आईच्या जिव्हारी लागला.नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीत ती भाग घेत होती. दोन्ही कडचे पाहुणे जमल्यावर तिने डॉक्टरांचा रिपोर्ट सगळ्यांसमोर ठेवला,त्याच्यातल्या कमी मुळे त्याला कधीच मुलगा होणार नव्हता..सगळ्यांना चपराक देऊन , तिथून दोन मुलींना घेऊन निघाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधानाचा प्रकाश होता आणि त्याच्या चेहऱ्यावर लाजेची काजळी.


हिरवा रंग 

बाळंतपणाच्या असह्य वेदनेने तिचा जीव कळवळत होता.डोळ्यातल्या पाण्याने समोरचे दिसेनासे होत होते.जेव्हा तिला शुद्ध आली .डॉक्टरांनी तिच्या हातात एक इवलेसे गाठोडे ठेवले, "अभिनंदन,मुलगी झाली आहे, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला एक क्षणही एकटे सोडले नाही, कळा तुम्ही सोसत होता पण त्रास त्याला होत होता."चार तासांच्या अथक परिश्रमाने थकलेल्या तिला त्या दोघांमधल्या अद्वैताचा नव्याने साक्षात्कार झाला.


पांढरा रंग 

नऊवारीतील आपल्या बायकोला पंचाहत्तरी ची टपोऱ्या मोत्याची नथ देताना अप्पाना ,आपल्या संसारात केलेल्या तडजोडी आणि कुठल्याही परिस्थितीत आपली साथ न सोडणाऱ्या आपल्या अर्धांगिनी ला नथ देऊन आपण जणू काही दैवाच्या नाकावर टिच्चून तिच्या प्रेमाचा आदर केला आहे असे वाटले.एकमेकांच्या सहवासात ते जणू दूधसाखरे सारखे विरघळून गेले.


मोर हिरवा रंग 

 इमारतीचे काम संपल्यावर एकमेकांच्या मदतीने त्यांनी आपले तंबुतले घर आवरले. निघताना मागे वळून पाहताना तिला अचानक काही दिसले,परत आल्यावर नवऱ्याच्या हातात झाडावरून पडलेले घरटे देत ते झाडावर नीट ठेवत त्यांनी जणूकाही आपल्या हक्काच्या घराच्या स्वप्नाची पहिली वीट ठेवली.


Rate this content
Log in