लोलक
लोलक
शुभ्र आमचा काश्मिर रक्ताने डागाळतो..
अन् आंदोलनावेळी काळा रस्ता दुधाने न्हातो...
हिरवी माय आमची दुष्काळापायी होते रुक्ष...
निळा रंग लेवून वाहणारी नदी होते शुष्क...
देवा आजकाल रंगसंगतीचा झोल होतोय खूप...
या सृष्टीच्या सुंदर चित्राच पार पालटलयं रुप...
खूप दिग्गज कलाकार मंडळी आहेत
तुझ्याकडे जरा भरवून बघ दरबार...
तुझ्याने झेपतयं का बघ नाहीतर
सोपव मग कुणाकडे तरी कारभार...
काहीच करु शकत नसला
तर एक सुचवू का युक्ती...
सुजाण निरागस लेकरांना
एक एक लोलक दे हाती...
तेच जमवतील मग रंगाचे मेळ...
बरा रंगेल त्यांचा सप्तरंगी खेळ...
मग रक्ताचा लाल नसेल सडा
ना दुष्काळाचा रंग कोरडा...
तेव्हा तरी मग नाहीत होणार
रोज ओल्या डोळ्यांच्या कडा !!!