युद्ध
युद्ध


परवा माझ्या भाचीचा फोन आला, मामी, ईशान ला कुठल्या शाळेत अडमिशन घेऊ? त्याचा बाबा म्हणतोय सी बी एस सी , मी म्हणतेय आय सी एस सी ... मी म्हटले , खरे सांगू ज्या शाळेत अभ्यास कमी असेल तिथे घाल . दोन वर्षांचे चिमुरडे ते , हसत खेळत मोठें होऊ दे ना . अर्थातच माझा सल्ला त्या दोघानाही पटला नाही. आणि ईशान चे आई बाबा कामावरून आल्यावर ईशान चे प्रोजेक्ट करताहेत , जनरल नॉलेज ची पुस्तके वाचताहेत , इवल्याश्या ईशानला रात्री झोपायला अकरा वाजतात आणि सकाळी सहा ला अंथरुणातून बाहेर काढताहेत , असा विदारक भविष्यकाळ माझ्या डोळ्यासमोर यायला लागला. “ भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे? “ अशी स्पर्धा करतच लहानाचे मोठें व्हायचे . अरे पण कमीज चे कापड कसे होते, तागा कसा आहे, कापडाचे प्रोसेसिंग कुठे झाले? यालाही महत्व आहे ना? की फक्त ‘ धुलाई ‘ कोणी केली , त्याचा डंका पिटाल ? पण हल्ली हीच बाब विसरत चाललोय आपण. मुलांची जडण घडण , संस्कार, शरीर आणि मनाची ताकद वाढवणे , कुठलाही विषय मुळापासून आणि सखोल शिकवणे, हे पाहायला कुणालाच वेळ नाहीये आणि शिक्षण पद्धती सुधारायची सरकारला ईच्छा नाहीये .
खरेतर आपल्या मुलांचा वकूब , कल , मेहनत घेण्याची वृत्ती पालकांना ओळखता यायला हवी. मुलांना त्याची जाण आणि जाणीव करून देता यायला हवी . कित्येकदा या सर्व गोष्टी जमून आल्या तरी शंभर टक्के यश मिळतेच असेही नाही . निकोप स्पर्धेची कल्पना मुलांना बालवयातच दिली पाहिजे .स्पर्धा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सामोरी येणारच .तिचा निकाल हो किवा नाही असाच असणार..नकार ऐकायला आणि पचवायला पालकांनीच शिकवावे लागते.माझ्या सोनुला जगातली सगळी सुखे मिळालीच पाहिजेत, हा अट्टाहास का? त्यांना धडपडून मिळवू दे ना काहीतरी. अति पाणी रोपं कुजवते , आणि अति प्रेम पंगु बनवते . हे आव्हान अवघड खरेच पण अशक्य नाही. योग , ध्यान, खेळ हे बालवयापासूनच शिकायला मिळाले तर ,आयुष्यातल्या ताण तणावांचा सामना करायची सवय लागते. मग तन की शक्ती आणि मन की शक्ती साठी कुठलाही बोर्न विटा द्यायची गरजच नाही.
मुले आणि पालक हे नाते दिवसेंदिवस भौतिक सुखांशी निगडीत होत चाललंय .’ तुम मुझे मार्क्स दो, मै तुम्हे laptop/ नवा मोबाईल/ कॉम्पुटर गेम / फोरीन ट्रीप ( यापैकी काहीतरी ) दूंगा,’ अशी ही यादी वाढतच जाते. .आई वडिलांना सुद्द्धा हे सगळे आपण देऊ शकलो नाही तर आपण कुचकामी असल्यासारखे वाटायला लागते.आणि युद्धाची पहिली चाल सुरु होते. हळूहळू डिमांड -सप्लाय चे हे युद्ध उग्र स्वरूप धारण करते. यापेक्षा मुलांना सहवास देणे, त्यांच्या विश्वाशी जोडून घ्यायचा प्रयत्न करणे हे महत्वाचे ठरते. मुलांनी घेतलेले निर्णय तपासून मगच प्रतिक्रिया दिल्याने मुलांचा पालाकावरचा विश्वास वाढतो. यात कधीतरी दोघांकडूनही चूक होऊ शकते , पण ती स्वीकारून पुढे जायची तयारी मात्र हवी. नात्यांना फुलवण्यासाठी मोकळे अवकाश (space) हवे. नाहीतर नाती गुदमरून जायचा धोकाच जास्त .
मोठ्या झालेल्या मुलांना स्वातंत्र्य द्यावेच पण त्याच्या बरोबर येणाऱ्या जबाबदारी ची जाणीव पण द्यावी. करीयर , शिक्षणक्रम या सगळ्यात प्लान A, प्लान B, प्लान C तयार ठेवून त्याची साधक बाधक चर्चा मुले आणि पालकांमध्ये व्हायला हवी, नाहीतर निराशेचे धुके पसरते आणि त्यात आपले माणूस हरवते . मुलांना मिळणाऱ्या यशापयशावर आपले प्रेम तोलणे कितपत बरोबर आहे? ते आधी तुमचे मूल आहे, एक व्यक्ति आहे, आपली इच्छा पूर्ण करणारा जिन नव्हे. एकमेकांवर येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगात आपण एकमेकांना सांभाळून घ्यायचे आहे, चुका दाखवण्यापेक्षा त्या सुधारायच्या आहेत , असा भरवसा दिला तर टोकाची पावले उचललीच जाणार नाहीत. अर्थात त्यासाठी शिक्षण पद्धती पासून स्वतः पर्यंत असंख्य बदल घडवायला हवेत . तर हे रोज होणारे युद्ध थांबेल. थोडक्यात पालकत्वाचे शिवधनुष्य आधी आपण पेलायला हवे आणि मुलांबरोबर आपणही रोज मोठें व्हायला हवे .