'योग्य समज'
'योग्य समज'
प्रिया, मनिष अन विद्या, मनिषची बहिण यांची चांगलीच मैत्री होती. कॉलेजला जातानाही ते तिघे बरोबरच जात असत. त्यांचं कॉलेजचं शेवटचं वर्ष हाेत. ते तिघेही एकाच वर्गात होते. ही तिन्ही मुलं खुप चांगली, गुणी मुलं होती, पण प्रिया खूपच चांगली मुलगी होती, तीचबोलणं,वागणं सगळ्यांना खूप आवडायचं. अतिशय सकारात्मक विचारांची, अन् स्पष्टवक्ती निर्भिड प्रिया कोणालाही आवडेल अशीच होती. ती एखाद्या विषयावर बोलायला लागली की तिचं बोलणे ऐकतच बसावं, असं ऐकणाऱ्याला वाटायचं. तिचं वक्तृत्व कौशल्य अन् स्टेजवरचा तिचा सहज आत्मविश्वासपूर्ण वावर पाहून तिचे सगळे मित्रमैत्रिणी तिचं भरभरून कौतुक करायचे. तिच्याशी बोलायला सगळेच उत्सुक असायचे. तीही सगळ्यांशी हसून प्रेमाने बोलायची. तिचा मित्र मैत्रिणींचा ग्रुपही खूप चांगला होता .
मनीषला हळूहळू प्रिया आवडू लागली होती . विद्याला हे समजायला वेळ लागला नाही. प्रिया होतीच मुळात गुणी कुणालाही आवडेल अशी. एखाद्या विषयावर वादविवाद स्पर्धेत ती समोरच्याला हरवून टाकीत असे.अतिशय प्रगल्भ आणि सर्व विषयांचे वाचनही तिच्या विद्वत्तेत भर घालत होतं. त्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. विद्या मनिषला म्हणाली, "अरे दादा ती खूप वेगळी मुलगी आहे ,तिच्या नावी गावीही अशा गोष्टी नसतात ." विद्या पुढे बोलू लागली, "ती जर माझी वहिणी झाली ना तर मला खूप आनंद होईल,पण तू हा विचार सोडून दे. उगाच फसशील अन् चांगली मैत्री गमावून बसशील".पण मनीषच वेड मनं हे मानायला तयार नव्हतं .
मनीषने निश्चय केला की आज काहीही झालं तरी तिला विचारायचंच. तो संधी शोधत होता. तीघे लायब्ररी समोरच्या गार्डनमध्ये बसले असताना तो तिच्याशी बोलू लागला. "प्रिया मला काही तरी बोलायचंय तुझ्याशी", "काय बोलायचे आहे?...... काय बोलायचे ते बोल ना?" प्रिया मनिष ला म्हणाली. आता मनिष बोलू लागला "मी............तु........... मला........... " " हे काय चालले तुझे?.... " प्रिया म्हणाली. अन् एकदाचा धीर एकवटून तो बोलला "मला तू आवडतेस I love you......" अन् प्रिया हसायला लागली. "हो अगदी मनापासून, मनिष बोलला, अग तुला वाटत नाही का काही माझ्याबद्दल ?" प्रिया बोलू लागली "are you serious ..... अरे कोणालाही आवडेल असाच आहे तू , अभ्यासात हुशार, खेळात पटाईत, छान गिटार वाजवतोस तू ,तुझे विचारही पटतात मला. स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आपण, वेड्या असं वागून नाही चालत , शिकतोय अजून आपण खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत आपल्याला. त्याबरोबर आपल्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायची आहेत. शिकण्यासारखं अजून बरेच काही आहे.रोज नवं नवं येईल ते शिकायचंय आहे मला. या वयात , जे जे काही चांगलं करता येईल, शिकता येईल ते ते मला करायचे आहे. या अशा नको त्या भाव- भावनात गुंतून नाही पडायचं मला, तू ही असा गुंतून नको जाऊस, अभ्यासावर लक्ष दे. माई बाबांचं स्वप्न पूर्ण कर अन् जसा विद्याचा भाऊ तसा माझा ही भाऊच आहेस , आणि त्याहीपेक्षा एक खूप चांगला मित्र. सगळ्या गोष्टी आपण शेअर केल्यात एकमेकांत. आपल्या तिघांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. 'त्रिकूट' म्हणतात ना आपल्या तिघांच्या मैत्रीला सगळे?..... असूया वाटते सगळ्या जणांना आपल्या मैत्रीची. ही मैत्री कायम टिकवायची आहे आपल्याला. हो,शुद्ध पवित्र मैत्री........... ,मैत्री नेहमी अशीच असते, हो ना?.......
मनिष निशब्द झाला . प्रिया पुढे बोलू लागली ,"मला वाटतं तुला समजल आहे, मला काय म्हणायच आहे ते. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, अन् मोठा हो. मलाही माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत , मोठे व्हायचे आहे मला, उगाच नको त्या स्वप्नाळू मायावी जगात वावरायचं नाही मला " प्रिया बोलत होती मनीष त्याची तर नुसती निराशा झाली होती. या सगळ्याला विद्या साक्ष होती, ती मनीषला बोलली, "अरे मी तुला सांगितलं होतं ना,ही मुलगी वेगळी आहे म्हणून ,तरीही तिला तू विचारलस , पण तिने तुला समजून घेतलं, समजुदारपणाने सांगितलं.सगळ्यांनी असेच विचार बाळगायची गरज आहे सध्या,अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास,अन ध्येयावर लक्ष.
प्रिया तिथून निघाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मनिष बघत होता. तो भानावर आला अन् तिला हाका मारू लागला . "प्रिया....... प्रिया......" " काय रे? " म्हणत प्रिया मागे वळली जवळ आली, मनीष बोलला "आपली मैत्री "? ती हसत बोलली "हा कायम राहणार "त्रिकूट "अन् तिघेही मस्त छान खळाळून हसले.
मनीष मनाची समजूत काढत होता अन मनाशीच बोलत होता,प्रिया तुझी अमूल्य मैत्री गमवायची नाही मला , पण .........माझ्या मनाचं काय...........? समजूत काढली पाहीजे मला त्याची..........