Rahul Shinde

Others

2.3  

Rahul Shinde

Others

व्यवहार

व्यवहार

3 mins
1.4K


तात्यांच्या तेराव्याला जेमतेम पन्नास-साठ माणसं जमली व्हती.कौलारू घरात आक्का-तात्यांची कारभारीण, शुद्ध हरपल्यासारखी,डोळं थिजल्यारखी एकटक भिंतीकड बघत बसली व्हती.सांत्वनासाठी तिला भेटायला येणाऱ्या माणसांपैकी कोणी जवळचं दिसलं की आक्का तात्यांची आठवण काढून रडत व्हती...तर कधी मधूनच पुन्हा यंत्रासारखी वागत व्हती.तात्यांच्या जाण्यानं सत्तरीत एकटीच उरलेल्या आक्काची मनस्थिती ढासळली व्हती.शेजारीच राहत असलेल्या दिरासोबत,तसंच पुतण्यांसोबत आक्काचं आणि तात्यांचंही आयुष्यभर पटलं नव्हतं, पण 'गाव काय म्हणल' आणि रिवाजाप्रमाणे सगळं व्हायला पायजे यासाठी तात्यांच्या मरणापासून ते आत्ता तेराव्यापर्यंत जो काय खर्च झाला तो तात्यांच्या थोरल्या पुतण्यानं केला व्हता.

तेराव्याला आलेली पुरुष मंडळी आक्काच्या घराबाहेर तळवट टाकून त्यावर बसली व्हती..

"आत्तापर्यंत सामान आणि गावजेवण देण्यात चौदा हजार रुपय खर्च झाला."थोरल्या यशवंतानं हळू आवाजात बाकी दोन भावांसमोर हिशेब मांडला.

"व्हय नव्ह' ..लय मोठ्या मनाचा अप्पा तू..सगळा खर्च एकट्याने केलास."मधल्या राम्यानं वरवरचं कौतुकाचं शब्द बोललं तसा यशवंतानं जरा आवाज चढवून चिडूनच खुलासा केला,

"ए रामभाऊ,हिशेब सांगितला ते कौतिक ऐकाया न्हायी..जे काय पैसं झालंत ते आपण तिघांनी समान करायचं.अजून ५००-१००० इकडं-तिकडं धरलं तर पंधरा हजार रुपय होतील,म्हणजे तुम्ही दोघं मला धा हजार द्या..प्रत्येकी पाच हजार.." असा हिशेब ऐकून मधला राम्या आणि धाकटा सुनील दोघंबी येरबाडलं(अनपेक्षित गोंधळले).

"वा र वा..समद्या गावानं इतकं दिवस विचारलं तवा आमी अभिमानानं सांगितलं..आमची काय लय परिस्थिती नाही,पण आमच्या आप्पानं सगळा खर्च उचलला.आणि तू म्हणतोस तिघांत करायचा.."सुनील म्हणाला,आणि राम्याने त्याला मानेनं दुजोरा दिला.

"आरं, तात्या आपल्या तिघांचंबी चुलते व्हते ना? त्यास्नी मूल-बाळ न्हाय मग खर्च आपल्यावर आला, आणि त्यो खर्च मी एकट्यानं कशापाय करायचा .."

"झेपत नव्हता तर कशापाय लोकांना मोठेपणा दाखवाया खर्च केलास? खर्च करताना इचारलं असतंस तर आमी तवाच सांगितलं असतं, थोड्यात काय ते कर ..."राम्या म्हणाला.

"होय...आपलं आणि तात्याचं कवा पटत व्हतं होय?" सुनील म्हणाला..

"पटत नसलं तरी रितीरिवाजाप्रमाणं कराया नको? ...ते काय न्हाय,तुम्ही पाच-पाच हजार द्या आजच..." त्यांचा वाद वाढू लागला तशी आजूबाजूची माणसं एकमेकात कुजबुजाय लागली..आवाज एवढा चढत होता की तो आतल्या कौलारू खोलीत बसलेल्या बायकास्नीबी ऐकाया जात व्हता.आक्काच्या कानावर शब्द पडत होते,पण ती आपल्याच दुःखात होती.

"माझी परिस्थिती न्हाय एवढी..लैत लय मला दोन हजारभर रुपय देता येत्याल."सुनील म्हणाला.

"मी पण मोलमजुरी करणारा..तेवढंच देतो.."राम्या म्हणाला.

"असं म्हणतासा,थट्टा करतायसा व्हय,मग मी पण एकट्यानं जिम्मेवारी कशापाय घ्यायची.."असं म्हणून यशवंतानं अंगणात जेवण बनवत असणाऱ्या आचाऱ्याला जोरात हाक मारून बोलवलं.सगळी पाऊण-पै यशवंताकडं बघू लागली,पण त्येला कशाचंच भान नव्हतं. त्यो आचाऱ्याला म्हणाला,

"हे बघा,आजचं मी ऍडव्हान्स जेवढं दिलं तेव्हडंच माझ्याकडं पैसं हुतं...आता राहिलेलं रामभाऊ आणि सुनील देतील.देत असलं तर बघा नाहीतर आलेल्या पाव्हण्यांना कसं जेवण द्यायचं हे त्यासनीच इचारा.."डोक्यात तिडीक जाऊन यशवंता बोलायला लागला आणि तिघांमध्ये पुन्हा वाद घुमू लागला...पाक पावणे मंडळींसमोर शोभा जात व्हती.यशवंता आता आचाऱ्याला उरलेलं पैसं देणार न्हाय म्हणाला, पण बाकी दोघंबी तयार हुईनात आणि मोठाच पेच निर्माण झाला.आतल्या बायकाबी गोंधळून कधी एकमेकींकडे,कधी आक्काकडे बघत होत्या.तिघांच्या कारभारणी बी आपलं मालक बरोबर करत्यात या थाटात गर्व डोळ्यात बाळगून हुत्या. हतबल आक्काच्या डोळ्यात पाणी हुतं,तर मनात ह्या तमाशाचा राग आला हुता..आपलं दुःख मनात गिळून आक्का जागेवरून उठली आणि तरातरा चालत घराबाहेर आली.तिच्या तोंडून दुःखोद्गार निघालं,

"अरे ये पोरांनो,तुमास्नी येळ-काळ प्रसंगाचं भान हाय का नाय..म्हातारा असताना कवा तुमास्नी दवा-दारूचा खर्च कराया लावला का? हे गेलं तवापास्न मला काय सुधरणा झालया,तरीपण म्या ठरवलं व्हतं, त्यांच्या कार्यापातूर (कार्यापर्यंत) ज्यो काय खर्च तुमी करशीला त्यो तुमास्नी सगळं दिवस संपल्यावर परत करायचा..पण म्हणलं तवापातूर(तोपर्यंत) तरी धीर धरशिला..पण तेव्हडाबी वक्त न्हाय तुमच्याकडं..माझं पेन्सिलीच' (पेन्शनचे) पैसं हायत साठवलेलं, आणि त्यातनंबी हिशेब भागला न्हाय तर माझ्या जमिनीचा तुकडा विकन म्या..मला ना मूल ना बाळ, कुणासाठी ठेवू आता जमीन,..तुमास्नी तिघांत मिळून खर्च वाटून घ्यायची गरज न्हाय, सगळं पैसं देईन म्या.....फकस्त एकच इनंती हाय,म्हाताऱ्याचं कार्य संपेपर्यंत उगाच तमाशा करू नगासा,म्हंजी त्यांच्या आत्म्याला शांती लाभल.."

आक्काने हात जोडला आणि बोलून तशीच आत निघून गेली.तिचं अशा अवस्थेतही व्यवहारी बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडं अवाक होऊन बघत हुते आणि आक्काचे तिघंबी पुतने आता शरमले व्हते.


Rate this content
Log in