वरण भात
वरण भात
एका गावात एक जोडपं राहत होतं. छोटंसं घर आणि घराला लागून त्यांची शेती. जवळच एक विहीर होती. शेती पण खूप काही मोठी नव्हती. मुलबाळ नाही. घरातपण वस्तू मोजक्याच. दोन जीवाला लागेल तेवढीच भांडी, त्यात जेवण करायची तांब्याची दोन ताटं आणि दोन ग्लास. भाजी करायला एकच जर्मनचा गंज. भाजी ठेवण्यासाठी घरात लटकवता येईल अशी एक टोपली. फारच तर कांदे नेहमी त्यात राहायचे. प्लास्टिकच्या छोट्याछोट्या डब्यात स्वयंपाक करायला लागणाऱ्या इतर वस्तू ठेवलेल्या होत्या. झिरोचा लाईट आणि लाईन गेली तर एक लालटेन. शेती करायची आणि दोन वेळेस पोटभर जेवण करायला भेटेल ह्याची व्यवस्था करायची. घरामध्ये पाणी भरायला एक छोटा माठ होता. माठातील पाणी खूपच गोड असे. स्वयंपाक करायला एक चूल होती. स्वयंपाकामध्ये भाकर आणि मेथीची भाजी, बेसन, भरीत, टमाटरची चटणी, ठेचा आवर्जून असायचा तसेच सोबत कांदा, मिरची, लाल मिरचीची चटणी, मुळा, कांद्याची पात असा बेत बनत असे.
घराला लागून एक मोठं आंब्याचं झाड होतं. दोघेपण त्या झाडाखाली रोज बसून जेवण करीत असत. शेतात भाजीपाला पिकवायचा आणि तो विकायचा. कोणत्याही मोठ्या कमाईची आशा नाही की अपेक्षा नाही. मिळालेल्या कमाईतून रोजच्या जीवनाश्यक वस्तू खरेदी करायच्या आणि त्यामध्ये आनंद मानायचा. सर्व बाबतीत साधेपणा, आणि साधेपणामध्ये खूप सुंदरता. तीच त्याची श्रीमंती होती.
मला काही कामानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला. दुपारची वेळ झाली होती. जेवण करावे याकरिता मी त्या आंब्याच्या झाडाजवळ गेलो. इथे जेवण करायला बसलो. ते दोघे माझ्याजवळ आले. विचारपूस केली, काही लागेल का ते विचारले, मी नाही म्हटले तरी पण कांदा, मुळा, चटणी त्यांनी मला दिली. पाणी आणले, "खूप गोड पाणी आहे. पाणी प्या जी," म्हणाले. मी पाणी पिलो आणि थोडा वेळ आराम केला. काहीवेळ गप्पा करून मी तिथून निघून घरी आलो. थोडा वेळ का होईना पण छान वाटले. मनाची श्रीमंती अनुभवली.
रात्री जेवणासाठी सौ. नि विचारलं की कशाची भाजी करायची. मी म्हटले जेवण साधं कर, भाजी कुठलीही चालेल पण वरण भात कर. सौ. म्हणाली," काय हो आज शिफारस फार साधी साधी" तिला आजच्या दिवसातील वृ्त्तांत सागितला. त्या दोघांचा वरण भातासारखा साधेपणा कायम स्मरणात राहील.