अनुबंध
अनुबंध


शुभ मंगल सावधान ...! शेवटच मंगलाष्टकं चालू होतं. अश्विन आणि सुमनवर अक्षतांचा वर्षाव होत होता. डोळ्याचे पारणे फिटेल अशी नेत्रदीपक सजावट कार्यालयाची केली होती. गुलाब, शेवंती, मोगरा आणि नाना प्रकारच्या फुलांनी सभागृहाची रचना केली होती. मनाला प्रसन्न करणारा सुगंध सगळीकडे दरवळत होता. सगळ्या पाहुण्या मंडळींच्या चेहऱ्यावर स्मित हास्याचा वर्षाव होत होता. संगीत मेजवानीनी ह्या लग्न समारंभाची सुरुवात झाली होती. आप्तेष्टांना एकमेकांच्या भेटीमुळे सर्वांना होणारा आनंद पाहायला मिळत होता. जेवणाची तयारी उत्तम. मंगलाष्टकं पुष्पा आत्याकडे होते, त्या तर भावनिक होऊन म्हणत होत्या. पाहुणे मंडळी नि समारंभात होणाऱ्या विविध आकर्षक घटकाला साद देत होती.
भावी आयुष्य खूप सुंदर असेल ह्या कल्पनेत सुमनच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. सुमनला नवरी बघताना श्रीधररावची पत्नी सुमनचे कौतुक सांगत होती, 'आपली छकुली खूप छान दिसत आहे, ती किती सुंदर हसत आहे. माझी छकुली किती गोड किती निरागस' श्रीधर लेकीकडे बघत आणि त्याच्या मनात हुरहूर चालली होती, की सुमन आज आपल्याला सोडून जाणार. श्रीधररावांचे डोळे पाणावले, हात पाय स्तब्ध झाले, ओठातले शब्द मुके झाले. लाडालोभात वाढलेली छकुली आज मला सोडून जाणार. समारंभात एकटेपणा चा आभास व्हायला लागला. पाहुण्या मंडळीमध्ये साद प्रतिसाद चालायचा पण क्षणात डोळ्यामध्ये अश्रू तयार व्हायचे.
सुमन मोठी कधी झाली कळलं नाही, जन्मापासून तर तिचे बालपण, शिक्षण, आणि लग्न वयानुसार तिच्यामध्ये होणाया बदलाची एक शृंखला डोळ्यासमोर उभी राहते. तिने केलेल्या मायेचा क्षण आठवतो मला. 'माझ्या आईचे आणि इतर शेजारी असणाऱ्या लोकांचे असे म्हणणे होते की श्रीधर तुला मुलगाच होणार. मनाला पण मुलगाच होणार तसे वाटायला लागले. दिवस शुक्रवार सायंकाळी सुमनचा जन्म झाला. मला कळले की मुलगी झाली म्हणून, थोडावेळ शांत झालो. काही काळ कानावर आलेले शब्द स्वीकार करायला तयार नव्हतो. छोट्या बाळाचा चेहरा बघितल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व शंकांचे निरसन झाले. आत्या म्हणायची 'श्रीधर तुझ्याकडे लक्ष्मी आली.' सतत सुमन सोबत असावे असे वाटे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, दिवसामागून दिवस गेले. बोबडे बोल कधी बोलायला लागले कळले नाही. वागणे, बोलणे, धावणे, मजा करणे या साऱ्याचा खेळ आम्ही करत असो. आईची भजनाची वेळ झाली तर सोबत सुमन टाळ वाजवायची. 'राम कृष्ण हरी' रोज या भजनाचा नाद होत असे. चॉकलेटचा आणि बाहेर फिरायला नेण्याचा हट्ट पुरवावा लागे. शाळेचीपण सुरुवात झाली. दहावीपर्यंतचे शिक्षण कसे पूर्ण झाले कळले नाही.
निरागस असणारे मुलीचे हे प्रेम, या बंधनात जीव लागला. जिव्हाळा तयार झाला. रोज होणाऱ्या संवादाची सवय झाली. कधी सुमन नाराज होईल किंवा तिच्या निर्णयाचा विरोध होईल असे माझ्या हातून घडले नाही. मला तिला वेगळे संस्कार शिकावे लागले नाही उपजत तिच्या आईचे संस्कार तिला मिळत गेले. एका स्त्रीची तिची आई ही तिची पहिली मैत्रीण आणि मुलगी ही दुसरी मैत्रीण असे म्हणायला हरकत नाही. मित्र मैत्रिणींमध्ये होणारे संवाद हे निरपेक्ष आणि निःस्वार्थी, मनमोकळे असतात. तुझा जोडीदार कसा असेल ह्यावर एकदा चर्चा झाली, सुमनचे म्हणणे ऐकले, ''मी जीवनसाथी कसा आहे हे बघेल त्याच्याकडे काय आहे किवा काय नाही याला नंतर स्थान देईल.'' व्यक्ती आणि वस्तूची योग्य तुलना करण्यापेक्षा व्यक्तीलाच जास्त महत्व सुमनने दिले.
माझे पत्नीसोबत कमी पटायचे. आमच्यामध्ये बरेचदा अबोला व्हायचा. आमच्या नात्यातील कटूपणा सुमनच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही. वैचारिक गैरसमज तर आमच्यामध्ये कधी नव्हता. वाद तर कधी झाला नाही. यदाकदाचित मुलगी आणि वाडिलांमध्ये होणारे वाद लग्नाच्या दिवशी जेव्हा मुलगी वडिलांना म्हणते, ''बाबा निघते मी, तुम्ही काळजी करू नका.'' वाद लोप पावत असेल. भावनिक प्रसंगाला सगळ्यांना सामना करावा लागतो. हे भावनिक क्षण निघून जाईल, सुमनसुद्धा तिच्या नवीन घरी जाईल. ही संस्कारमूर्ती नवीन आयुष्याची परीक्षा देईल. तिचेसुद्धा नवीन अनुबंध तयार होतील.