थवा (चिवचिवाट)
थवा (चिवचिवाट)


एक मोठे झाड आणि त्या खाली बसलेले गावातील मंडळी. सगळ्याचा पोषाख जवळपास पांढरा. विविध विषयावर सविस्तर चर्चा यासाठी गावातील अनुभवी व रिटायर्ड लोक जमा व्हायचे. राजकीय, सामाजिक, गावातील, राज्यातील अशा विविध विषयावर चर्चा होत असे. सण, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी गावातील शिवजयंती हे साधारण विषय ज्यावर पूर्णवेळ चर्चा होत असे. दसरा सणाला सोनं द्यायचं घ्यायचं यासाठी हा पारंपारिक थवा असे.
गणपतरावचा मुलगा दहावी पास झाला त्याला शुभेच्छा तसेच पेढे वाटण्याचा कार्यक्रम इथे होत असे. सुमनचं लग्न जुळलं तर लग्नाची सर्व तयारी इथे होत असे. दत्त जयंतीला गावामध्ये असलेल्या पौराणिक मंदिरामध्ये जत्रा भरत असे. ज्येष्ठ लोकांना पूजा करायचा मान देण्याची परंपरा या मंडळींमधूनच होत असे. बरेच वारकरी मंडळी असल्याने ते वारी करायचे त्या वेळेला हा सभा भरण्याचा कार्यक्रम थांबायचा.
साधारण पणे राजकीय विषयावर चर्चा न होता चर्चेचे रुपांतर वादात होत असे. कोण एका व्यक्तीला राग आला तर ती व्यक्ती चर्चा न करता घरी निघून जायची. चार एक लोक त्या व्यक्तीला समजावून पुन्हा चर्चा करायला लावायचे. असा हा गावातील एक विशिष्ट प्रकारचा समुदाय आजही प्रवास करताना आपल्याला दिसतो.
शहरात असे चित्र बघायला भेटत नाही. तरुण मंडळींचा समुदाय वेगळा. ते त्यांच्या विश्वात वावरताना दिसतात. एका विशिष्ट वयोगटातील लोक बगिच्यामधील किंवा आवास करण्याच्या ठिकाणी दिसून येतात. त्यांचे विषय ग्रामीण भागातील विषयापेक्षा वेगळे असतात. पेपर वाचन करणे आणि अमूक तमूक विषयानुरूप आपले मत मांडणे, तसेच कुठल्याही विषयावर वाद होऊ न देणे याची काळजी घेणे. दिनचर्या आणि आजार हे प्रमुख विषय यावर एकमेकांना मार्गदर्शन करण्यात वेळ घालवणे. काही प्रमाणात महिला मंडळींचा समुदाय दिसून येतो, घरापासून तर घरापर्यंत विषयानुसार त्या पण मते मांडतात. आरोग्य या विषयावर चर्चा दीर्घकाळ चालायची.
मोठ मोठे टाॅवर उभे झाले त्यामुळे आजकाल चिमण्या कमी दिसतात. चिव चिव आवाज लुप्त होत जात आहे. बऱ्याचशा जुन्या रूढी, परंपरा लुप्त होत आहे. पूर्वी खेळाचे मैदान मुला-मुलींनी भरून असायचे. मनोरंजन म्हणून खेळणे, गोष्टी सांगणे, पुस्तक वाचन करणे, आजी-आजोबा सोबत वेळ घालविणे होत असे. वाचनालयांमध्ये गर्दी होत असे. आता तसे दिसून येत नाही.
नवीन समुदायाने जन्म घेतला आहे. लहानांपासून तर मोठ्या मंडळींपर्यंत सर्व या ग्रुपमध्ये गुंतला आहे. फोनमध्ये वेगवेगळे आविष्कार होत गेले. तासनतास फोनवर बोलणे थांबून गेले आहे. आज ज्या काही घडामोडी होतात त्या ग्रुपवर होताना दिसतात. घरघुती ग्रुप, मित्रांचा ग्रुप, शालेय मित्रांचा वेगळा, कॉलेजमधील मित्रांचा वेगळा, शेजारी लोकांचा ग्रुप वेगळा, जो कोणी जिथे कुठे काम करत असेल त्याचा ग्रुप हे वेगळे वेगळे असतात. साधरणत: दहा ग्रुप तर एखाद्या व्यक्तीच्या फोनमध्ये असतात.
दिनचर्याही ग्रुपमध्ये येणाऱ्या संदेशापासून होते. सुप्रभात ते शुभरात्री पर्यंत संदेशाची देवाण-घेवाण सुरूच असते. ब्रेकिंग न्यूज आजकाल तर ती इतर कोणत्याही माध्यमापेक्षा ग्रुपवर येते. सण-उत्सव तर ग्रुप वर जास्त साजरे केले अशी प्रचिती येते. वाढदिवस ग्रुपवर साजरा होतो. प्रत्यक्षात पूर्ण आयुष्यात इतके मोठे केक बघितले नसेल ते ग्रुपवर चित्रच्या स्वरूपात दिसतात. जिवलग मित्रांसाठी अश्रू अनावर होतात. पाच चांदणी असलेल्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला याचा आभास होतो.
willing suspension of disbelief S.T.COLERDGE यांच्या पंक्ती आठविल्या. प्रत्यक्षात न घडणाऱ्या घटनांचा आभास होणे आणि त्याला खरे समजणे, या आपल्याला ग्रुपमधील काही प्रसंगावरून अनुभवता येतात. ग्रुपमधील काही मेम्बर्सचे छायाचित्र पाठवण्यावरून असे लक्षात येते की, कुठे काही स्पर्धा सुरु आहे की काय...
फोटो काढण्याची वेगळी मजा असते. मग ते लग्न समारंभ असो, बारसं असो, की एखाद्या व्यक्तीचं तेरावं असो... उपरोधिक वाटेल पण तेराव्यामध्येसुद्धा फोटो काढण्याची क्रेझ आहे. फोटो काढणे आणि ग्रुपमध्ये पाठविणे. आपसात बोलणं कमी झाले. घरी जेवण करताना 'मला भात वाढ' असा संदेश फोनवर येतो. अशाप्रकारे वेगवेगळे मनोरंजनात्मक संदेश आपल्याला बघायला मिळतात. शाळेतील जिवलग मित्र ग्रुपच्या माध्यमातून जवळ आले, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मित्रांची सामुहिक चर्चा आणि ती पण ग्रुपमध्ये आनंददायक वाटायला लागली. राजकीय विषय कधी कधी मित्रांमध्ये विसंगती निर्माण करून जातो. राग धरून लेफ्ट होतात आणि पुन्हा प्रवेश करायचा आग्रह. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आधुनिक जगातील या थव्यातील चिवचिवाट असाच सुरु राहील हीच अपेक्षा!