STORYMIRROR

Jayshri Dani

Others

4  

Jayshri Dani

Others

विसर्ग

विसर्ग

4 mins
321

      भूतकाळाचा हात धरून असणारी आई आणि भविष्यकाळाकडे तुरुतुरु चालणारी मुलगी यात अडकलेल्या तिची वर्तमानात थांबण्याची धडपड आज संपली होती. साऱ्या भावभावनांतून ती विमुक्त, मुक्त, मुक्त झाली होती. येऊन मिसळली होती स्वतःशीच स्वतःला या मुसळधार कोसळणाऱ्या पावसात.


     मुसळधारही कसला? चांगल्या रानटी सरींवर सरी धुमाकूळ घालत होत्या. ढगफुटी झाली होती. प्रशासनाकडून हाय अलर्ट जाहीर केला होता. शहराच्या कित्येक कोस दूर असणारी नदी वाट चुकलेल्या वासरासारखी जिकडे जागा दिसेल तिकडे हुंदडत होती. दारातून पाणी आत येऊ पहात होते. महानगरपालिकेने त्वरित घरं रिकामे करायची सूचना जारी केली होती.


    जो तो हाताला लागेल ते सामान आणि किमती ऐवज घेऊन पळ काढत होता. ती मात्र ते दृश्य पहात सावकाश जिना चढली आणि गच्चीत आली. चिंब ओली झाली क्षणात.


 "सुरक्षित ठिकाणी त्वरित कूच करा, त्वरित कूच करा, महापूर आहे, महापूर आहे"

महानगरपालिकेच्या गाड्या जोराजोरात भोंगे वाजवत फिरत होत्या.


 "अग निघालीस का? अग चलतेस का? अग गेलीस का?" म्हणत शेजारचे बायाबापडे डोकावून जात होते. 


तिच्या कानावर पडलेही ते आवाज पण तिने मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण जीव सरींचा मरणप्राय कोलाहल ऐकण्यात एकवटला होता.


     टम्म फुगलेली पंचगंगा दारातून गळ्यापर्यंत येताना खरे तर तिने दरवाजा लावला होता. पण तो अक्राळविक्राळ पान्हा जेव्हा बंद दाराला जुमानेना तेव्हा ती किंचित हसली. हो, हसणार नाहीतर काय? काय असे निराळे केले पंचगंगेने आज? ज्याही कुणाला येऊ नका म्हणून आयुष्यभर विनवले ते ते मुद्यामहून सूड घेतल्यासारखे घरात, नशिबात शिरले. आणि ज्या सुखाची तिने कामना केली ते कित्येक योजने दूर पळत राहिले.


     लग्न झाल्यावर भाऊ विलायतेला स्थायिक झालेला. म्हणून वडील गेल्यावर दु:खीकष्टी आईला कुठे एकटे ठेवावे हा प्रश्नच तिला पडलेला. उभ्या हयातीत आईने साधा पाच पैशांचा व्यवहारही न केलेला. प्रत्येक गोष्टीत वडिलांवर निर्भर. एकटीने साधा रस्ता ओलांडताना भांबावून जायची मग बाकी गोष्टी तर कल्पनातीतच होत्या. तिला नव्हते आणायचे आईला जवळ, म्हणजे आईचे करायचे होते तिला मनापासून पण आपल्या विकृत नवऱ्याची भीती वाटत होती. तिच्यासारखी आत्मविश्वासू मुलगीच जर त्याने अल्पावधीत चिरडून टाकली तर म्हाताऱ्या आईचा काय सोस ठेवणार होता तो?


     काहीच उपाय नसल्याने आणावे लागले तिला आईला जवळ. आणि अकस्मात जादूची कांडी फिरावी तसे सासू न् जावई एक झाले, ती एकटी पडली. आईसाठी तिने तेही निभावून नेले. पुढे मुलीचा जन्म आणि नवऱ्याचे अपघातात जाणे अशा दोन परस्परविरोधी घटना घडल्या. नाही म्हंटले तरी सहवासाची सवय, पुरुष म्हणून त्याचे घरावर झाकण या बाबींसाठी तिला त्याच्या जाण्याचे वाईट वाटले पण त्याचबरोबर मनातून खूप मोकळे वाटतेय हेही कबूल केले तिने स्वतःजवळ.


      मग नोकरी, घर, मुलगी सांभाळताना तिची दमछाक व्हायची. ती मुलीला रागवायला गेली की "तुला मोठे वळण होते, तुझे शाळेचे मार्क बघ ना, मग रावीला रागव" असे जेव्हा आई तिलाच दटावायची तेव्हा प्रचंड बुचकळ्यात पडून आईने आपल्या व मुलीच्या मध्ये बोलू नये असे तिला वाटायचे पण तसे होत नसे. आजी आपला बचाव करते हे लक्षात आल्यावर रावी आजीच्या पदराआड दडू लागली.


     त्याच दरम्यान तिच्या आयुष्यात घटस्फोट झालेला अभिजित काणे आला. दोघे एकमेकांत गुंतले. आईचा चढा पहारा, मुलीची भिरभिर नजर टाळून त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. आयुष्यात स्थैर्य हवे. लग्न संसार, मुलीला वडील हवे असे जेव्हा तिला वाटू लागले तेव्हा तिने त्याला लग्नाविषयी विचारले पण,


 "हॅट गं, असेच ठीक आहे आपले नाते, आशू सावत्र आई स्वीकारणार नाही" 

असे म्हणत आपल्या पंधरा वर्षाच्या मुलाचे कारण सांगत त्याने पहिल्या वाक्यातच लग्नाला साफ नकार दिला. मग तिचाही शरीरसंबंधातला रस आटत आटतच गेला कारण तिला शरीरसंबंधापलीकडले काही शांत क्षण हवे होते. तिला खूप त्रास झाला त्याच्यापासून वेगळे होताना पण झाली ती. तो तर अद्यापही तिच्या मागावर होता.


    खूप भिजून हुडहुडी भरायला लागली म्हणून ती खाली आली. अरे रामsss सगळे घरच जणू वहात होते. पाणी प्रत्येक खोलीत खेळत होते. रावीसोबत अमेरिकेला गेलेली आई बकुळहार न्यायला विसरली वाटते, तोही वहात होता. ती उचलायला गेली. पण तरुणवयात हौसेने दे दे म्हणत असताना आईने "पुढे देईल" म्हणत प्रत्येकवेळी टाळले तो आता पन्नासाव्या वर्षी घालावासा वाटेना. मोहच सुटून गेले की सारे.


     नवऱ्याची तसबीर, त्याला कधीचा घातलेला चंदनहार, रावीची वह्या पुस्तके, आईच्या साड्या, स्वयंपाकघरातली भांडी, तिचा लॅपटॉप एकूण एक सामान पाण्यात तरंगत होते. अगदी अभिजीतचा पहिला स्पर्श झालेली चादर जी तिने अद्यापही जपून ठेवली होती तीही वाहताना दिसली आणि आपण आठवणींच्या साखळदंडातून खऱ्या अर्थाने मुक्त झाल्याची जाणीव तिला हायसे करून गेली.


    ती परत वर आली. गच्चीवर. आता तिच्यातून साराच विसर्ग झाल्याने ती आणि पाऊस, पाऊस आणि ती एकरुप झाले होते. अधिक मोकळ्या मनाने तिने त्या प्रलयकारी मुक्त धारा अंगोपांगावर घेतल्या. ती खुलत होती, फुलत होती, फलित होत होती पावसात.


 "नवरा मेल्यावर कसले तुला प्रेम करायचे सोस सुचतात गं, आपण आपले सरळमार्गी रहावे." हे आईचे बोल आता तिच्या कानाला, मनाला क्षती पोहचवत नव्हते. रावीही युएसला मस्त नोकरीला लागल्याने तशी काहीच काळजी उरली नव्हती. अभिजीतची आठवण कापरासारखी उडाली तात्काळ. ह्याक्षणी ती फक्त तिच्यासाठी उरली होती. राहिलेले सारे क्षण मनसोक्त जगायला.


    शिटीचा आवाज आला. पाठोपाठ "कुणी घरात अडकले आहे का?" अशी नावेतील बचावपथकाच्या कार्यकर्त्यांची जोरदार हाळी आली.


"जा राणी, आपण भेटू पुन्हा कधीतरी, आत्ता जीव वाचवणे महत्वाचे आहे" तिच्या अंगागाला झोंबत पाऊससखा हळूच तिच्या कानात कुजबुजला.


"अहं" तिने मानेने घट्ट नकार दिला आणि पावसाला कवटाळायला दोन्ही बाहू आवेगाने फैलावले.


Rate this content
Log in