STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

विश्वासाचे नाते

विश्वासाचे नाते

5 mins
18


  मूल आईच्या उदरात वाढत असतानाच त्याला एक विश्वास असतो की आई मला वाढवणार आहे. आई मला खायला,प्यायला देणार आहे. विश्वासानं तो तिच्या उदरात वाढत असतो. एवढा गाढ विश्वास असतो ह्या छोट्या बाळाला. अजून त्याचा देह बनलेला नसतो पण विश्वास मात्र ठाम असतो.

  यातही काही अघटीत घटना घडतच असतात. काही मन मारून गर्भपात करून घेतात. तर काहींना तो करावा लागतोच. तर काहींचा आपोआप नैसर्गिक होतो. याला जबाबदार कोण? कोणीच नाही असेच म्हणता येईल. हा पण जे आपल्या उदरातच मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करून अशावेळी गर्भपात करून घेतात. हे कितपत उचित आहे याचा विचार आपणच आपल्या मनाने करावा.

  अशा दाम्पत्याने खरंच विचार करून प्रत्येक कृती केली पाहिजे. विश्वासानं ठाम भूमिका घेतली पाहिजे. मुलगा काय, मुलगी काय हल्ली हा भेदभाव तर नाहीच अजिबात. तरी देखील काही घरांमध्ये अजूनही हे चालूच आहे. याला आता बऱ्यापैकी आळा बसलेला आहे. आज मुलापेक्षा सुद्धा मुलगी उंच भरारी घेत आहेत. मग मुलगी का नको? पालकांनी हाच विचार करावा. मुलगी झाली म्हणून तिचा अव्हेर करू नये. तिला शिकवावे मोठे करावे तिच्या पायावर उभे करावे. भारताचा एक जबाबदार नागरिक बनवावे. तू मोठी हुशार आहेस बाळा हा विश्वास तिला द्यावा.

   आता मूल जरा मोठे होते. चालण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करते. पडते,उठते,परत धावते. तोंडातला घास पूर्ण तोंडात जात नाही पण तरीसुद्धा चार दाणे काही ना तोंडात जातात. त्याच्या समोर त्याची आई त्याचे नातेवाईक बसलेले असतात. त्याला चालायचं कसं त्याला वागायचं कसं त्याला खायचं कसं हे सगळं शिकवत असतात. आपल्यासमोर एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आपल्याला पडू देणार नाही हा एक विश्वास त्याला आहे आणि म्हणून ते मूल छान प्रयत्न करत असते .

  आता समाजात मूल वावरायला सुरुवात होते. त्याचे पहिले पाऊल शाळेमध्ये पडते. आईच्या, बाबांच्या हाताला धरून ते मूल शाळेमध्ये येते. शाळेमध्ये आल्यावर ते आपल्या बाईंचा पदर धरते. त्याला ठाम विश्वास असतो की आईसारखी वागणूक या बाई देणार आहेत. विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विश्वास ठाम असला तर जगात कुठल्याही अडचणी येत नाहीत. हा पण कोणी विश्वास आपला गमावला तर मात्र परत उभे राहणे शक्य होत नाही. परत मनाची उभारी घ्यायला खूप अवधी जातो. यासाठी विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  आता मूल छान मोठे होतेय. त्याचे मित्र गोळा व्हायला सुरुवात होते. मित्रांमधून तो चांगल्या, वाईट अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या घरातले बाळकडू त्याला मिळतच असते. त्याचा जर एखादा कोणी अगदी खरंच मित्र असेल आणि त्यांनी जरी त्याच्याकडची पेन्सिल घेतली तरी तो ठाम विश्वासाने म्हणेल की नाही त्यांना माझी पेन्सिल घेतलीच नाही. अगदी हे साधे उदाहरण आपल्याला दिले आहे. अशा अनेक घटना शालेय जीवनामध्ये सहज होऊन जातात.

  यातील एक घटना मी शेअर करू इच्छिते.

  इयत्ता चौथी ला असताना माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता आणि तो मुलगा इतर मुलांचे कंपास घेत असायचा. त्याला इतरांच्या कंपासचे खूप अट्रॅक्शन होते. आपला कंपास सोडून दुसऱ्याच्या कंपास घ्यायला त्याला फार आवडायचे. पण हा मुलगा कोण हे समजायला जरा वेळ लागला.

  मधल्या सुट्टीमध्ये मी डबा खायला न जाता मी वर्गातच थांबले होते. फक्त आड बाजूला थांबले होते. आज आपला हा विद्यार्थी शोधून काढायचा हे मी ठाम ठरवले होते. मी वर्गात आहे हेच त्याला मुळी कळले नाही. तो वर्गात आला आणि दोन-तीन कंपास स्वतःच्या दप्तरात ठेवून रिकामा झाला. मधली सुट्टी संपली सर्व विद्यार्थी वर्गात आले. मी पण वर्गात आल्याचे भासवले.

  वर्गात गेल्याबरोबर परत त्या दोन-तीन मुलांच्या तक्रारी बाई आमच्या कंपास आमच्या दप्तरात नाही. मी चकित झाल्यासारखे दाखवले. आणि वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले कोणी याचा कंपास घेतला का रे?

  सर्वजण नाही म्हणून पडले. शेवटी म्हटलं आपण आता दप्तर चेक करायला घ्यावेत. त्या मुलाने आपले कंपास दप्तरातले काढून त्याच्या डब्याच्या पिशवीत ठेवून दिले. मी सर्व मुलांची दप्तर चेक केली. मला काही सापडले नाही. आणि त्यांना कुठे ठेवले हे मला कळले नाही. कळून न कळले असे मी भासवले आणि सर्व मुले एक जात म्हणत होते बाई आपल्या वर्गातील कोणीच नाही कंपास चोरणार हा विश्वास त्यांना ठाम होता. आपल्या दुसऱ्या वर्गातील कोणीतरी आला आणि त्यांनी हे आमचे कंपास चोरले अशी मुलांची मतं होती. मी या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष केले. लहान मुलं ही काही चोर मुळीच नसतात. त्यांना वस्तूंचे अट्रॅक्शन असते म्हणून ते मुलं ती चोरी करतात. त्यांना समजत नाही याला चोरी म्हणतात. मग मी मुलांना एक बालकथा सांगितली. ती कथा एकूण सर्वांच्या मनावर जरा परिणाम झालेला मला जाणवला.

  दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे वडील आणि तो जरा उशिरा आले. त्याच्या वडिलांकडे दोन मोठ्या कापडी पिशव्या होत्या. त्यांना म्हटलं काय आहे हे? त्यांनी सांगितले माझा मुलगा कंपास मुलांचे कंपास घेत होता आणि हे चोरलेले कंपास माझी बायको वरती कपाटात ठेवून देत होती. काल तुम्ही कोणती गोष्ट सांगितली मला माहित नाही पण माझा मुलगा त्याच्या आईला खूप रागावला ते सगळे कंपास घेतले. पिशव्या भरल्या, आणि आज मला घेऊन तो इथे आला आहे. हे सर्व कंपास इयत्ता तिसरी आणि चौथीच्या मुलांचे आहेत. या कंपासातील साहित्य मात्र वापरलेल आहे पण कंपास मात्र आहेत. मला खूप आश्चर्य वाटले. माझ्या एका बालकथेमुळे माझा एक विद्यार्थी छान घडला होता. मी ही कथा सांगितल्यानंतर त्याच्या मनात हा असा विचार येईल हा विश्वास मला होता. कारण कोवळ्या मनावर आपण संस्कार करतो.त्यामुळे मुले उत्तम साथ देतात. उत्तम घडतात. असा गेला 35 वर्षाचा अनुभव मला आहे.

  आजही सगळीकडे विश्वासावर जग चालू आहे. जिथे विश्वास असतो तिथे लोक एकमेकांशी भावना शेअर करतात. मनातले विचार शेअर करतात. एकमेकांचे ऐकून घेतात. विश्वासाने एकमेकांना सल्ला देतात आणि घेतात.

  प्रत्येक नात्यांमध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पतीने पत्नीवर आणि पत्नीने पतीवर विश्वास ठेवला तर संसार हा सुखाचा होतो.

  कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांवर ठाम विश्वास ठेवायला हवा त्याशिवाय एकत्र कुटुंब राहू शकत नाही.

  मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा तेवढेच विश्वासाचे नातेदृढ असायला हवे. आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक मित्राला किंवा मैत्रिणीला सांगतच नाही. त्याचे कारण काही मित्रमैत्रिणी आपली टवाळकी उडवतात . मजा पाहतात. मग अशावेळी आपण फक्त अगदी आपल्याकडे बोटांवर मोजण्याइतकी मित्रमैत्रिणी असतात की आपण त्यांना आपल्या मनातले सर्व शेअर करू शकतो. ते मित्र देखील आपल्या कधीच विश्वासघात करत नाहीत.

  यासाठी प्रत्येकावर विश्वास ठेवावा की नाही हे वैयक्तिक आपण ठरवलं पाहिजे. आपले नाते त्या माणसाचे किती दृढ आहे हे आपण ठरवले पाहिजे. तो खरच विश्वासास पात्र आहे की नाही हे आपण ठरवले पाहिजे. तो विश्वासघात तर करणार नाही हे मनात जाणून घेतले पाहिजे.

  मानवा माणूस म्हणून जन्माला आला आहे तर माणुसकीने वागावे. विश्वासाने वागावे. विश्वासघात करावा असे मनातही येऊ देऊ नये.

  मग हा विश्वास कसा दृढ होईल बरं. आपल्या वागणुकीतून समजेल. मित्रांच्या वागणुकीतून समजेल.

 आजकाल सोशल मीडिया वरती अनेक घटना घडत आहेत. आपण विश्वासाने एखाद्या गोष्टीवर क्लिक केले असता आपल्या अकाउंट मधून पैसे नाहीसे होतात. मीडियामधील लोकांशी आपण मैत्री करतो पण ते त्या मैत्रीसाठी लायक नसतात. तर प्रत्येक गोष्ट विश्वासाने हाताळा आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. यासाठी खालील गोष्टींचा खरंच उपयोग होईल आपल्याला...

  समाजप्रबोधनाच्या कीर्तनातून आपल्याला काही बोध मिळेल. संस्कारकथातून आपल्याला बोध मिळेल. माणसाने प्रत्येक मूल्य जपले तो मूल्य संस्कारातून आपल्याला बोध मिळेल.

 जीवन चाललेय विश्वासावर 

 नका घात करू एकमेकांचा 

 घे जगुनी हे मानवा जीवनात 

 मेवा वाटत रहा आनंदाचा...



Rate this content
Log in