STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

एक उनाड दिवस स्वतःसाठी

एक उनाड दिवस स्वतःसाठी

4 mins
0

*एक उनाड दिवस स्वतःसाठी*
 आपण रोज कुटुंब, नोकरी, व्यवसाय, मुले आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून गेलो आहे की स्वतःसाठी वेळ देणे विसरून जातो. आपण स्वतः एक कोणीतरी आहोत हेच विसरून जाणं म्हणजे स्वतःला पूर्णतः संसारामध्ये झोकून देणे. कौटुंबिक,सामाजिक सर्व जबाबदारी पेलणे होय. पण आयुष्यात किमान एक दिवस तरी स्वतःसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. त्या दिवशी मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्यात. आवडते पुस्तक वाचावे, निसर्गात फेरफटका मारावा किंवा शांतपणे स्वतःशी संवाद साधावा. स्वतःच्या आवडी-निवडींना वेळ दिल्याने मन प्रसन्न होते. तणाव कमी होतो आणि नवीन ऊर्जा मिळते. स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नसून गरज आहे. आपल्या भावना समजून घेण्यासाठी आणि स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी असा दिवस महत्त्वाचा असतो. आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे. म्हणूनच, प्रत्येकाने अधूनमधून एक मनासारखा दिवस स्वतःसाठी जगावा. गृहिणी असो अथवा नोकरदार महिला असो. तिला स्वतःचे जीवन जगण्याचा पुरेपूर हक्क आहे. पण घरातील विवंचना,समाजातील प्रॉब्लेम्स. मी असे केले तर मला कोण काय म्हणेल?? आपल्याच मनातील सतावणारी ही भीती... या सर्वांमुळे बाई स्वतःचे जीवन जगणं विसरून जाते. हा मी माझा स्वतःचा अनुभव लिहीत आहे. माझी शाळा घराच्या पाच मिनिटं अंतरावर एवढी जवळ होती. आणि त्याच परिसरातील मुलं शाळेमध्ये आहेत. सर्व पालक सर्व विद्यार्थी अवतीभवतीच्याच परिसरामध्ये आहेत. त्यामुळे साडी आणि पंजाबी ड्रेस शिवाय कोणता वेगळा ड्रेसअप करता आला नाही. कोण काय म्हणेल ही सतत मनामध्ये शंका... जरी कोणी काही म्हणत नसेल तरी मन आपले आपल्याला सांगत असते. त्याप्रमाणे आपला ड्रेसअप करायचा आणि घराच्या बाहेर पडायचं. मेकअप नाही, लिपस्टिक नाही. सिम्पल राहणी आणि उच्च विचारसरणी असे होते.पण चारचौघी पाहिल्या की मनात यायचे असा मेकअप आपण करू शकत नाही. मग कुठे ट्रीपला गेलो की थोडाफार मेकअप केला तरी वावरताना अवघड होऊन जायचे. असे ते दिवस होते. आणि माझ्याच वर्गातले मुलं आता 35,40 चे झालेले आहेत. त्या मुलांना आपल्या बाई जशा बघायची सवय असते तीच सवय मुलांना लागलेली असेल त्यांच्या नजरेला आपल्या बाई वेगळ्या आवडत नाहीत. पण मी निवृत्त झाल्यानंतर एक वर्षभर हे सर्व पाळले. शाळेचा नोकरीमुळे कुठल्या मित्र-मैत्रिणींचा जास्त सहवास घेता आला नाही. कायम नोकरीची टांगती तलवार असायची. आता जराशी निवांत झाली आहे. घरची जबाबदारी म्हटलं तर आणखी काही जबाबदाऱ्या जीवनात आलेल्या आहेत.त्यांना हसून सामोरे जात आहे. पण एकांतात बसले की असे कुठेतरी असे वाटते अरे आपण आपल्यासाठी जगलोच नाही. लहान असताना आई-वडिलांची शिस्त, शाळा यातच 17 वर्षे गेली. सतराव्या वर्षी लग्न ठरले अठराव्यात पदार्पण केले आणि लग्न झाले. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी जुळ्या मुली झाल्या आणि जीवन तिथेच खुंटल्यासारखे झाले. अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या फार लहान वयामध्ये बांधली गेले. हे आत्ता समजतंय बरं... 😊 वयाच्या 25 व्या वर्षी नोकरीला लागले. ते वयाची 58 वर्षापर्यंत नोकरी केली. जणू काही सर्व जीवन आपल्या शाळेतील लहान मुलं,आपला संसार याच्यातच गुरफटून गेले होते. त्यातून पतीवर आलेली आजारपण, विविध आर्थिक संकटे,काही घरगुती अडचणी यामुळे डोकं वर काढायला वेळच नव्हता. पण आता असं वाटतं की आता हे जे पुढचे जीवनाचे क्षण आहेत त्यातले काही क्षण स्वतःसाठी वेचावेत. आपल्या जीवनातील या क्षणांची उधळपट्टी निश्चित करणार नाही. आपल्यावर असे संस्कार झालेत की आपण असे उनाड वागूच शकत नाही. संसाराच्या चौकटीत राहूनच आपल्याला आपले क्षण अनुभवायचे आहेत. हे मनाला मीच निक्षुन सांगत आहे. आणि तो दिवस लांब नाही असे मला वाटते. एक दिवस स्वतःसाठी जगायला मला आवडेल. निसर्गाच्या कुशीत वसुधाला रमायला आवडेल. मग तो मैत्रिणींच्या मेळाव्यातील क्षण, स्वतः निवांत निसर्गात घालवलेला क्षण, झोपाळ्यावर झुलत, झुलत केलेले सुंदर विचार लेखणी द्वारे प्रकट करणे हे सुद्धा माझे आवडते क्षण असतील. आपल्या फॅमिली बरोबर मस्त उनाड दिवस घालवणे सुद्धा मला आवडेल. आणि असा एक दिवस परवा आम्ही कोकणात दिवेआगारला घालवला. माझ्या दोन जुळ्या मुली आणि पाच नातवंडे यांना समवेत घेऊन कोकणात मस्त समुद्रकिनारी हा दिवस घालवला मस्त बर्फ गोळा,कोकण मेवा खाल्ला. निसर्गात भरपूर फोटोसेशन केले. यापेक्षा एक उनाड दिवस काय असावा... हेच ते क्षण गृहिणी आणि नोकरदार महिला यांनी स्वतः अनुभवावेत.हल्ली प्रत्येक जण असे क्षण अनुभवतो,पण पूर्वीच्या काळी याला काही मर्यादा होत्या. बंधन होती. त्यामुळे माझा हा लेख मी माझ्या स्वअनुभवावर लिहिलेला आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात मी माझे विचार मांडलेले आहेत. हल्ली जीवन फार अनमोल झाले आहे. याचे महत्त्वाचे कारण पुढचा क्षण आपल्या जीवनात कसा येईल हे आपल्यालाच माहिती नाही. आला क्षण आनंदाने जगुया, आणि इतरांना सुख देऊया. समाजात आपले एक स्थान निर्माण करूया. सर्वांना घेऊन पुढे जाऊया. एकटे पुढे गेलो तर आपल्याबरोबर कोणी राहत नाही. त्या ऐवजी आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन गेलो होतो तर आपल्या आनंदात,दुःखात सर्वजण सहभागी होतात हा अनुभव आहे. तर बघा मैत्रिणींनो किंवा मित्रानो असं वाटतं की आपण एक उनाड दिवस जगावा तर...दररोजच्या कौटुंबिक जबाबदारीतून एक दिवस मित्रांबरोबर घालवावा काही हरकत नाही त्यांनीही असे क्षण उपभोगावेत मात्र त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला होणार नाही याची दक्षता मात्र घेणे गरजेचे आहे. गृहिणी,नोकरदार महिला हे क्षण आनंदाने घालवतात पण कुटुंबला त्रास होईल असे कधीच वागणार याची दक्षता घेतात. एक दिवस स्वतःसाठी जगून पाहावे मनाच्या कोपऱ्यांना हळूच हलवावे... जबाबदाऱ्यांच्या गर्दीत क्षण हरवलेत पुन्हा एकदा अलगद उचलून ते अनुभवावेत... स्वप्नांच्या पंखांना थोडे बळ द्यावे समाजाशी काही नाते नव्याने जोडावे... स्वतःवर परत प्रेम करायला शिकावे मनातले दुःख हलकेच विसरावे... एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवावा जगण्याचा खरा अर्थ अनभवून पाहावा..... वसुधा वैभव नाईक, पुणे. मो. नं. 9823582116


Rate this content
Log in