विचार वसुधाचे भाग चार
विचार वसुधाचे भाग चार
*विचार वसुधाचे*
भाग ४
*मन जिंकणारे शब्द*
आपल्या शब्दांनी आपण इतरांचे मन जपू शकतो. किंबहुना आपल्या शब्दांनी त्यांचे मन जपायलाच हवे.
शब्दांना आवाज नसतो पण ते मनापर्यंत पोहोचण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात असते. शब्दांचा आवाज होत नाही हे मान्य आहे पण शब्दांची उलघाल आपल्या चेहऱ्यावर मात्र शंभर टक्के दिसत असते.
भावना विवश झालेला चेहरा ताबडतोब नजरेत येतो. दुःख झाले असता डोळे डबडबतात पाण्यान. आनंद झाला असता आपल्याच मुख कमलावर हसू लपत नाही.
राग आला तरीसुद्धा रागीट चेहरा लपत नाही. कोणाबद्दल दया आली,करुणा आली तरीसुद्धा डोळ्यातले भाव बोलके असतात. अगदी संवेदना शील दुःख असेल तर आपोआप डोळे वहायला लागतात.
इथे अगदी आपण टीव्ही सिरीयल जरी पाहत असेल, जर भावनात्मक दुःखद अशा घटना घडत असतील किंवा संवाद चालू असतील तरीसुद्धा आपोआप डोळे भरतात. यालाच आपण संवेदनातील मन असे म्हणतो आणि हे मन आपल्या चेहऱ्यावर दिसत असते.
एखादा प्रेमळ शब्द खचलेल्या मनाला उभारी देतो, तर कटू शब्द आयुष्यभराची जखम करून जातो. म्हणून बोलण्यापूर्वी शब्दांची निवड आणि लिहिण्यापूर्वी विचारांची शुद्धता आवश्यक असते.
"मन चिंती ते वैरी न चिंती" असे नेहमीच म्हणतात बघा.
मनात चांगल्या वाईटाची नेहमीच नोंद होत असते. आणि त्यातूनच लेखणी द्वारे आपल्यासारखे साहित्यिक लिहीत असतात. आपण लिहून आपले मन रिकामे करतो.
बघा बरं इथे शब्दाला आपल्या किती किंमत आहे. मनातून येणाऱ्या शब्दांची माला तयार होऊन उत्तम लेख तयार होतो. उत्तम कविता तयार होते.
असे काहीच जरी झाले नाही तर उत्तम वक्ता म्हणून तो प्रसिद्धीस येतो.
आज माणूस प्रगतीच्या शिखरावर पोहोचला आहे, पण संवादातला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. संदेशांची देवाणघेवाण वाढली, पण मनांची देवाणघेवाण कमी झाली. अशा काळात माणसाला सर्वाधिक गरज आहे ती आपुलकीच्या दोन शब्दांची.
यासाठी संवाद वाढले पाहिजेत. आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत अगदी लहान मुलांपासून. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे मोबाईल वरती चॅटिंग करतो, युट्युब वरचे पहात बसतो,काहीतरी नवीन तंत्रज्ञान शिकत असतो. आपण शिकूया पण संवाद टाळायला नकोत हे नक्की.
मोबाईलवर टाईप करतो, विचार पाठवतोय आपण, पण किती जण वाचतात,किती जण ऐकतात आणि किती जण आत्मसात करतात हे आपल्याला माहीत नसतं त्यापेक्षा संवाद हे एक सुंदर माध्यम आहे त्याचा आपण विचार करावा आणि वाचलं लोकांनी तर अति उत्तम.
प्रत्येकाच्या आयुष्यात काही न सांगितलेल्या वेदना असतात. प्रत्येक चेहऱ्यामागे एक संघर्ष दडलेला असतो. त्यामुळे कोणाशीही बोलताना संवेदनशीलता आणि आदर जपणे हीच खरी माणुसकी आहे. आपले शब्द कोणाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणतील की दुःख, याचा विचार आपण केला पाहिजे.
बऱ्याचदा "उचलली जीभ लावली टाळ्याला "असे होते. पण असे न करता समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करावा. त्याला भावेल अशा शब्दांमध्ये आपण बोलले तर निश्चितच त्याच्या मनावर खोलवर परिणाम होतो व आपली मैत्री जुळायला वेळ लागत नाही.
शब्द हे केवळ वाक्य तयार करत नाहीत; ते नाती जोडतात, विश्वास निर्माण करतात आणि समाजात सकारात्मकतेची बीजे पेरतात. म्हणून प्रत्येक शब्द प्रेमाचा, प्रत्येक विचार विधायक आणि प्रत्येक कृती माणुसकीची असू द्यावी.
एक प्रार्थना आहे "माणसाने माणसाशी माणसासम वागणे." हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
आजकाल गुलामगिरी फार वाढत चालली आहे. माणसाला मारणे अगदी मुंगी चिरडल्यासारखं झालंय. माणुसकी लोप पावताना दिसत आहे. परवाच एक विधान ऐकले भारतात गेल्यावर्षी पासून आत्तापर्यंत जवळजवळ पाच लाख स्त्रिया आणि बालिका, मुलं हरवली आहेत. त्यातील काहींचा शोध लागला काहींचा अजूनही शोध लागलेला नाही.
हे लोक कोणी पळवून नेली का पळून गेली त्यांचे पुढे काय झाले काहीही आता पता अजूनही लागलेला नाही. बघा माणुसकी कुठे पळाली आहे.असे का होतेय??
बऱ्याचदा असे सुद्धा होते की आपल्यासमोर कृती होत आहे पण आपण शांत बसलेलो असतो कारण पोलिसांचा ससे मिरा आपल्या मागे लागायला नको हे बरोबर आहे चुकीचं काहीच नाहीये याच्यामध्ये.पण त्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण उभे राहिले तर आपल्यामागे समाज उभा राहील.
त्यातूनही काही असे निडर आहेत की ते आपल्या जीवाची परवा न करता त्या लोकांना सोडवतात. अन्याय,अत्याचार सहन करत नाहीत भ्रष्टाचार सहन करत नाहीत.
पण हल्ली असे झाले ना की काही बोललं तर लगेच अरेरावीची भाषा ऐकू येते.. मग या भीतीपोटी कोण कसे पुढे येणार. आपला जीवाचा नाहक बळी कोण देणार? स्वतःचा जीव सर्वांना प्यारा आहे. शेवटी स्वतःलाही स्वतःचे कुटुंब आहेच ना!
चला, आजपासून एक संकल्प करूयात.आपल्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही, तर त्यांना जगण्याची नवी उमेद देऊ. कारण चांगले शब्द खर्च होत नाहीत, पण त्यांची किंमत मात्र अमूल्य असते.
"शब्दांची श्रीमंती पैशांनी विकत मिळत नाही;
ती मनाच्या संस्कारांतून जन्माला येते."
जर आपल्यासमोर कोणतेही वाईट कृत्य होत असेल तर किमान आपण पोलिसांच्या कानावर ते घालावे. आपण सक्रिय सहभाग न घेता अशाप्रकारे सहभाग निश्चितच घेऊ शकतो. म्हणजेच काय तर पुन्हा शब्द आले. आपल्या शब्दात पोलिसांशी संवाद करून पुढील प्रकरण निपटायला सांगावे.
अशी कार्य मी स्वतः करते केलेली आहेत त्यामुळे मी हे सांगण्याचे धाडस करत आहे.
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
