विचार वसुधाचे भाग तीन
विचार वसुधाचे भाग तीन
*विचार वसुधाचे*
भाग -3
विचारांची श्रीमंती ही प्रत्येक माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते. जसे माणसाचा स्वभाव तसेच त्याचे विचार शब्दात प्रकट होत असतात.
माणूस कसा आहे या पेक्षा यापेक्षा त्याचे विचार कसे आहेत हे अधिक महत्त्वाचे असते.
माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे यावर त्याचे विचार अवलंबून नसतात.
माणूस खूप श्रीमंत आहे पण त्याचे विचार जर का समाजाला घातक असतील तर उपयोग होत नाही. उलट एखादा गरीब माणूस पण त्याचे विचार जर समाज उपयोगी असतील तर निश्चितच त्याच्या विचाराने समाज पुढे चालतो हे सत्य आहे.
कारण संपत्ती क्षणभंगुर असते, पण विचारांचा ठेवा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतो.
पण हल्ली ज्याच्याकडे संपत्ती त्याच्याकडे अतिशय वेगळ्या नजरेने पाहिले जाते हे मात्र खरे आहे. किंबहुना त्याचे कोणतेही विचार कसे आहेत हा विचार न करता समाजात पेरले जातात. तर माणसानं असं असावं साधी राहणी उच्च विचारसरणी...
असेही आपल्याकडे खूप लोक आहेत साधे राहतात पण त्यांचे विचार खूप उच्च आहेत आणि यांच्या विचारांनी समाजाला खूप फायदा होत आहे.
जीवनात अनेक प्रसंग येतात. काही आनंदाचे, काही दुःखाचे. प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो. त्या अनुभवांतून घडणारे विचारच आपले व्यक्तिमत्त्व घडवतात.
आलेल्या कोणत्याही संकटाला धीराने तोंड देणे हे आपले विचारच आपल्याला समजून सांगतात. संकटावर मात करायला शिकवतात.
संघर्षाला वाचा फोडायला शिकवतात. वाद असेल तिथे संवाद कसा साधायचा आहे विचारच ठरवतात आणि शिकवतात.
जिथे वादाचे स्वरूप असेल तिथे शांत विचारांनी हे वाद मिटवले जातात. एकूणच काय तर आपल्या विचारात विद्वत्ता हवी पावित्र्य हवे. आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये हा विचार हवा.
येणारी संकटे माणसाला खचवण्यासाठी नसतात; ती त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात.
आजच्या युगात माहितीचा महासागर आपल्या हातात आहे, पण विचारांची खोली मात्र कमी होताना दिसते. सोशल मीडियावर शब्द सहज लिहिले जातात; परंतु प्रत्येक शब्दामागे संवेदनशीलता, जबाबदारी आणि माणुसकी असणे तितकेच आवश्यक आहे.
आज मीडिया द्वारे आपल्याला अनेक गोष्टी ताबडतोब समजल्या जातात.
उदा :- निलायम टॉकीज जवळ एक घटना घडली. त्या घटनेबाबत मला फोन आला अगदी पंधरा मिनिटांच्या अंतरावरच.मी ताबडतोब टीव्ही लावला तर ती घटना बातमीच्या स्वरूपात टीव्हीवर चालू होती. तर मीडिया इतकी फास्ट आहे. हे मला सांगायचे आहे, तर आपले विचार किती फास्ट असतील ते आपल्याच आतून निघत असतात. कोणतेही फास्ट आलेले विचार आचरणात न आणता विचार करून ते आचरणात आणावे इतकेच मला म्हणायचे आहे.
शब्द जखमाही करू शकतात आणि जखमांवर फुंकरही घालू शकतात. म्हणून शब्दांचा वापर विवेकाने व्हायला हवा.
आपल्या मुखातून गेलेला शब्द आपल्याला परत घेता येत नाही. त्यासाठी आपण जो शब्द वापरतो तो अतिशय काळजीपूर्वक वापरावा. मी मागेही म्हटले आहे शब्द हा आपल्या विचाराचा पुत्र आहे. जसे आपले विचार तसे तो शब्दात प्रकट होतो. म्हणून शब्दांचा योग्य त्या ठिकाणी योग्य त्या शब्दात वापर करावा.
शब्दानेच शाब्दिक चकमकी वाढतात. आणि मग संवादाचे रूपांतर वादामध्ये होते. म्हणून संवाद भरकटूना जाऊ देऊ नयेत. जर आपल्याला वाटले की नाही आता इथे संवादाचे रूप वादात होणार आहे तेव्हा सर्व शांत बसावे. विचार करून मगच बोलावे.
आपण समाज बदलण्याची भाषा करतो; पण बदलाची सुरुवात स्वतःपासून केली तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. घरात प्रेम, नात्यांत विश्वास, वागण्यात नम्रता आणि मनात कृतज्ञता असेल, तर समाज आपोआप सुंदर होईल.
स्वतःच्या शब्दांमध्ये, स्वतःच्या कर्तृत्वामध्ये,स्वतःच्या बोलण्यामध्ये, आचरणामध्ये नम्रता, विद्ववत्ता दिसून आली तर शंभर टक्के आपण विचार बदलले आहेत हे समजावे.
प्रत्येक सूर्योदय हा नव्या संधीचा संदेश घेऊन येतो. प्रत्येक दिवस आपल्याला एक नवी संधी देत.चांगले विचार करण्याची, चांगले बोलण्याची आणि चांगले कर्म करण्याची. ही संधी आपण ओळखली, तर जीवन अधिक अर्थपूर्ण होईल.
चला, आपल्या विचारांनी निराशेचा अंधार दूर करूया. आशेचा दिवा पेटवूया, माणुसकीची ऊब जपूया आणि आपल्या कृतीतून समाजात सकारात्मकतेची फुले फुलवूया.
कारण चांगले विचार कधीच वाया जात नाहीत; ते कोणाच्या ना कोणाच्या जीवनात नक्कीच प्रकाश पेरतात.
स्वतः विचार बदलावेत, आचरणात आणावेत. समाजात पेरावेत.
"विचार हेच खरे व्यक्तिमत्त्वाचे आरसे असतात.
आरसा स्वच्छ असेल, तर जगही सुंदर दिसते."
विचारांची ही शृंखला चालूच राहील.... सध्या थांबते.
*वसुधा वैभव नाईक*
धनकवडी,जिल्हा - पुणे
*मो. नं. 9823582116*
