विचार वसुधाचे भाग दोन
विचार वसुधाचे भाग दोन
*विचार वसुधाचे*
भाग 2
आपल्या विचारांची शृंखला कधीच खुंटत नाही. कार्य मग्न असताना,शांत असताना, निवांत असताना सुद्धा आपल्या विचारांची शृंखला चालूच असते .मन शांत नसते.विचार प्रवृत्त करत असतात. काय करावे, काय करू नये हे सुचत असते. अगदी मध्यरात्री सुद्धा मला काही विचार सुचले तर मी ते लिहून ठेवते. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या डोक्यात काय चालले होते हे आठवत देखील नाही. त्यावेळी सुचलेले शब्द समर्पक असतात आणि मनातून आलेले असतात त्यामुळे लेखणीद्वारे लिहून ठेवले की समाधान वाटते.
विचार हे मनाच्या सुपीक भूमीत रुजणारे बीज असते. त्या बीजाला संस्कारांचे पाणी, अनुभवांचे खत आणि माणुसकीचा प्रकाश मिळाला की त्यातून सुंदर व्यक्तिमत्त्व फुलते. म्हणूनच विचारांची श्रीमंती ही धनसंपत्तीपेक्षाही मोठी असते. आपल्या विचारात विद्वत्ता हवी. पावित्र्य हवे. तरच आपण सामाजिक कार्य उत्तम करू शकतो. त्याचबरोबर कुटुंबाची देखभाल छान करू शकतो.
आज विज्ञानाने, तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे.पण मनांमनातील अंतर वाढताना दिसत आहे. सर्व विचार व्हाट्सअप, इन्स्टा,फेसबुक इत्यादी द्वारे प्रदर्शित होताना दिसतात.
स्पर्धा, स्वार्थ आणि अपेक्षांच्या गर्दीत माणूस स्वतःच हरवत चालला आहे. अशा वेळी प्रेम, करुणा, सहकार्य आणि कृतज्ञतेची आठवण करून देणारे विचार समाजाला नवी ऊर्जा देतात.
विचार हे केवळ वाचण्यासाठी नसतात; ते जगण्यासाठी असतात. चांगला विचार जेव्हा कृतीत उतरतो, तेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते, निराश मनाला आशेचा किरण मिळतो आणि समाजात सकारात्मक बदलाची सुरुवात होते. आत्मविश्वासाच्या स्वबळावरती खंबीरपणे समाजामध्ये आपण पाय होऊ शकतो.
संत रामदासांच्या श्लोकातून याची जाणीव होते. विचारांना चालना मिळते. कसे वागायचे हे समजते. आपण अनेक वर्षांपासून संत रामदासांचे श्लोक शाळांमध्ये घेत असतो त्याचबरोबर काही घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेला, दिवेलागणीला या श्लोकांचा, शुभंकरोतीचा लहान मुलांसाठी, संस्कारक्षमतेसाठी उपयोग केला जातो.
संतांची वाणी हे जर आपण वाचले,ऐकले तर त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव होतो.
आजकाल वाचायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही. तर आपल्याकडे प्रसार माध्यम खूप आहेत आपल्यासमोर दूरदर्शन आहे.रेडिओ आहे. यू ट्यूब आहे.यावर अत्यंत उत्तम विचार सांगितले जातात. कथन केले जातात. आपल्याला फक्त ते श्रवण करायचे आहेत आणि त्यानुसार वागायचे आहे.
तर खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत विचाराने आपण मोठे होतो. पण या संतांच्या वाणीचा उपयोग आपल्या जीवनात खरोखर केला पाहिजे. म्हणून आजही शाळांमध्ये भगवद्गीता म्हणा किंवा संत रामदास, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर इत्यादी संतांच्या वर कथा आहेत. त्याचबरोबर श्लोक आहेत. अभंग आहेत.
प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, तर समाज अधिक सुंदर होईल.
लेखन ही माझ्यासाठी केवळ शब्दांची मांडणी नाही. ती मनाशी मन जोडण्याची, माणुसकी जागवण्याची आणि समाजप्रबोधनाची एक साधना आहे.
प्रत्येक कविता, प्रत्येक लेख आणि प्रत्येक ओळ ही जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि माझ्या लेखनामध्ये समाजकार्य घडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो यशस्वी होताना मला दिसत आहे. जसे माझे विचार आहेत ते लेखणीद्वारे उमटवते . ज्यांना माझे विचार आवडतात ते त्यावर पाऊल ठेवून वागण्याचा प्रयत्न करतात आणि अशी बरीच उदाहरणे आहेत की जे माझ्या पावलावर पाऊल ठेवून वागताना दिसत आहेत.आणि मला काही लोक सांगतात तुमच्या लेखणी द्वारे तुम्ही पेरलेला विचार जो आहे तो आम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करत आहोत. आमच्या जीवनशैलीमध्ये फरक पडत आहे वागण्या बोलण्यात फरक पडत आहे त्यामुळे समोरच्याशी नाते सुद्धा छान होत आहे. असे फोन असे मेसेज आले की मला खूप छान वाटते.
चला तर मग आपल्या विचारांमध्ये प्रकाश, संस्कार पेरूया. कटुतेऐवजी प्रेम, निराशेऐवजी आशा,आणि स्वार्थाऐवजी माणुसकीची बीजे रुजवूया. कारण एक चांगला विचार अनेक आयुष्यांना नवी दिशा देऊ शकतो.नवी प्रेरणा देते. नवीन बीजे पेरण्याचा प्रयत्न शंभर टक्के करूया.
विचार बदलूया .. दृष्टी बदलूया. नवी विचार प्रणाली आत्मसात करूया.
यातूनच समाजाला विचार विकास मिळेल.
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
