STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

तंत्रयुग - आजची स्मार्ट पिढी

तंत्रयुग - आजची स्मार्ट पिढी

4 mins
0

*तंत्रयुग, WhatsApp आणि आपली स्मार्ट पिढी...* दि. 15/07/2024 रोजी आमच्या सोसायटीमध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली. सोळा वर्षाच्या मुलीने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. आत्महत्या केली. पण आत्महत्या केल्यानंतर किमान कुठेतरी शरीरावर, जमिनीवर रक्ताचे डाग हवे होते. रक्ताचे डाग अजिबात नव्हते. त्यामुळे पोलीस, सायबर क्राईम वाले यांनी खूप शोध घेतला पण विशेष हाती सापडले की नाही हे उद्याच कळेल. हे सांगण्या मागचा उद्देश एवढाच आहे की तिच्या भावाने असे सांगितले की - तिचा मोबाईल चेक केल्यानंतर कोणीतरी ब्लॅकमेल तिला करतोय असं समजलं. याचा सर्व खुलासा निश्चितच होईल. हल्ली कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. कारण काय तर नवीन तंत्रयुगाचा वापर व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या गोष्टींचा अतिवापर.आणि मोहाला बळी पडणे. दुसरी केस - एक तरुण वयातील मुलगी. व्हाट्सअप च्या माध्यमातून एवढ्या ओळखी झाल्या पण ती ओळखीतच फसतं चालली आहे.बाहेर येण्यासाठी मार्ग सापडत नाही. आईवडील त्रस्त झालेत. आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे संपूर्ण जग आपल्या हातातील छोट्याशा स्क्रीनमध्ये सामावले आहे. WhatsApp हे आज संवादाचे सर्वांत लोकप्रिय माध्यम बनले आहे. एका क्षणात संदेश, फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. आजची पिढी या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करते. हा वापर जर चांगल्या कामासाठी असेल तर अति उत्तम पर्याय आहे. पण यातून बऱ्याचशा वाईट गोष्टी घडत चाललेल्या आहेत. पर्सनल लाईफ शेअर केली जात आहे. मित्र बनवले जातात. मैत्रिणी बनवल्या जातात. पण हे मित्र-मैत्रिणी योगी आहेत का? हे मात्र शंभर टक्के पाहिले जात नाही. या मैत्रीचा आपल्याला त्रास होईल हे समजतच नाहीये. यातून मग अनेक घटना आत्महत्येपर्यंत पोहोचत आहेत. कारण काय तर तुम्ही योग्य मुलाची अथवा योग्य मुलीची मित्र मैत्रीण म्हणून निवड केलेली नाही जो तुम्हाला खूप छान म्हणतोय तो खरच स्वतः चांगला मनाचा आहे का? हे पडताळून पाहिलं जात नाही. एक निराशावादी मन आशावादी मनाला शोधते आणि तिथेच मुलाची अथवा मुलीची फसगत होत चालली आहे. काही गोष्टी व्हाट्सअप मुळे सुसह्य झाल्या आहेत जसे की -शिक्षण, व्यवसाय, ऑनलाइन वर्ग, बँकिंग, सामाजिक उपक्रम, नोकरीची माहिती आणि कौटुंबिक संवाद यासाठी WhatsApp अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अनेक चांगल्या गोष्टींचा प्रसारही याच माध्यमातून होत आहे. परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. WhatsApp च्या अतिरेकी वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. घरात सर्वजण एकत्र असले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अभ्यास, वाचन, मैदानी खेळ, कुटुंबीयांसोबतचा वेळ आणि सामाजिक नाती यावर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय अफवा, खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारे संदेश समाजात गोंधळ निर्माण करतात. आजच्या पिढीने तंत्रज्ञानाचा वापर गरजेनुसार आणि जबाबदारीने करणे आवश्यक आहे. मोबाईलचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी, चांगले विचार आत्मसात करण्यासाठी आणि समाजहिताच्या कार्यासाठी केला तरच त्याचे खरे महत्त्व आहे. वेळेचे नियोजन, माहितीची सत्यता पडताळणे आणि सोशल मीडियावर संयम राखणे ही काळाची गरज आहे.हल्ली मुलांमध्ये पेशंस फार कमी आहेत. तंत्रज्ञान आपला मित्र आहे, परंतु त्याचे गुलाम होता कामा नये. माणुसकी, संस्कार, संवेदनशीलता आणि प्रत्यक्ष संवाद यांची जागा कोणतेही ॲप घेऊ शकत नाही. त्या ॲपला आपण बळी पडता कामा नये. म्हणूनच आजच्या पिढीने तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांचा सुंदर समतोल साधला, तर उज्ज्वल आणि सुसंस्कृत समाज घडविणे निश्चितच शक्य होईल. "हातात मोबाईल असावा, पण मनात माणुसकीही असावी; तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी असावा, अधोगतीसाठी नव्हे." अजून एक मला इथे विशद करावेसे वाटते की प्रत्येक पालकांनी आपली लहान मुलं काय पाहताय त्या मोबाईल मध्ये हे निश्चित बघावे.जास्त मोबाईल हाताळू देवू नये. तसेच 15 ते 17 वयाच्या मुलांमध्ये हातात मोबाईल असतो खरा पण, त्या मोबाईल मध्ये ही मुलं काय चॅटिंग करतात,कोणाशी चॅटिंग करतात,हे चॅटिंग गरजेचे आहे का?आणि कुठल्या थरापर्यंत हे बोलतात हे शंभर टक्के पालकांनी पहावे. म्हणजे पुढे येणाऱ्या समस्या आपोआप कमी होतील. तसे पाहता हल्लीची पिढी खूप हुशार आहे. या मुलांना सर्व आत्मसात आहे. ते शिकतात छान. फक्त यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर पालक हो आपण सर्व जबाबदार नागरिक आहोत. आपणच आपल्या मुलांची जबाबदारी घेऊन पुढील वाईट गोष्टींना आळा घालावा. आत्महत्या किंवा वाईट मार्गाने वाटचाल करणे या चांगल्या गोष्टी नाहीत पण याच हल्ली जास्त बघायला मिळतात. त्या गोष्टी थोपवायला मात्र हव्या आहेत. अजून एक की हल्ली माणसाला माणसाची कदर राहिलेली नाही. जर एखाद्या बद्दल खूप राग असेल या तरुण पिढीला तर प्रत्यक्ष माणसाला मारून टाकण्याची हिंमत या मुलांमध्ये आलेली आहे. हल्ली हे सर्रास दिसून येत आहे. भीती,दडपण हा प्रकारच राहिलेला दिसत नाही. तर आपण सर्वांनी मिळून निदान आपापल्या मुलांवर तरी उत्तम संस्कार घडवूयात. मुलांच्या हास्यात दडलेले असते उद्याचे स्वप्न प्रेम, संस्कारांनी उजळू दे मुलांचे प्रत्येक क्षण बरं काळजी, माया आणि विश्वासाची देऊया त्यांना साथ सुंदर भविष्य घडवूया, हाच पालकत्वाचा मार्ग आहे खरं... वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in