STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

प्लॅस्टिकमुक्त गणपती

प्लॅस्टिकमुक्त गणपती

3 mins
3

*प्लास्टिकमुक्त गणपती*

 जसा श्रावण महिना आला तसं गणपती मंडळांची हालचाल सुरू झाली. घरातले गणपती श्रावण महिना संपत आला की गणपतीची आरास कशी करायची याची बोलणी सुरू झाली . निर्मल पार्क सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाची हालचाल सुरु झाली. आता जुनी मंडळी जाऊन नवीन मुलांनी गणपतीच्या कार्यक्रमाची तयारी हाती घेतली.संपूर्ण सोसायटीत उत्साहाचे वातावरण होते. मंडप सजवण्याची लगबग सुरू होती. यंदा मात्र काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय सोसायटीतील मुलांनी घेतला होता. नवीन रक्त सळसळत होते. नव्या आयडिया येत होत्या. सोसायटीचे अध्यक्ष रामकाका,उपाध्यक्ष संगीता ताई आणि उत्साही मुलगा ओंकार, त्याची मैत्रीण सई आणि दुकानदार शेखर अशी पाच जणांची छोटी बैठक झाली. ओंकार म्हणाला, “काका, यंदाचा गणपती आपण प्लास्टिकमुक्त करूया का?” काहीतरी नवीन करूया. काका हसत म्हणाले, “अरे वा! कल्पना छान आहे. पण एवढ्या मोठ्या उत्सवात प्लास्टिक पूर्णपणे टाळणं सोपं नाही. आणि सर्वच हातभार लावतील असे हे नाही. काही लहान मुलं पाणी पितील बाटल्या तिथेच टाकतील खाऊ खातील रॅपर तिथेच टाकतील. याला काय करायचे?? " संगीताताईनी शांतपणे सांगितले, “सोपं नाही म्हणून प्रयत्नच करायचा नाही, असं थोडंच आहे? गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी आणि चांगल्या विचारांचे प्रतीक. मग त्यांच्या उत्सवात निसर्गाची हानी कशाला करायची? आपण फलक लावू. सर्वांना समजावून सांगू,किंवा एखादा व्होलेंटियर तर ठेवूया तिथे." सईने लगेच वहीत यादी करायला घेतली.प्लास्टिकच्या पिशव्या नाहीत, प्लास्टिकचे ग्लास नाहीत, थर्माकोलची सजावट नाही आणि प्लास्टिकच्या फुलांऐवजी कागदी व नैसर्गिक सजावट करायची. लोकांना समजण्यासाठी फलक लिहायचे. मार्कर, कार्डशिट असे साहित्य हवे.. शेखर म्हणाला, “पण माझ्या दुकानात गणपतीसाठी येणारे लोक प्लास्टिकच्या पिशव्या मागतात. मी काय करू?” ओंकार म्हणाला, “काका, तुम्ही कापडी पिशव्या ठेवा. आम्ही त्यावर ‘बाप्पा आले घरी, प्लास्टिक जाऊ दे दारी’ असा संदेश लिहून देऊ.” त्या पिशव्या निश्चित छान वाटतील आणि सर्व आवडीने खरेदी करतील. आपण किमत पण कमीच ठेवा जरा. " शेखरला ही कल्पना आवडली. त्याने लगेच पन्नास कापडी पिशव्या तयार करायला टाकल्या. परत मागणी आली छापून घेवू असे मनाशी ठरवले. गणेशोत्सवाचा पहिला दिवस उजाडला. मंडपात कागदापासून बनवलेली फुलं, जुन्या वर्तमानपत्रांपासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू आणि मातीचे छोटे दिवे लावण्यात आले.झिरमिळ्या लावल्या. प्रसादासाठी स्टीलची ताटे आणि वाट्या वापरण्यात आल्या.आणि प्रसाद घेऊन झाला की प्रत्येकाने आपले भांडे धुवून ठेवायचे असा फलक लावला. नळा शेजारी भांडी घासण्यासाठी लिक्विड ठेवले. सूचना फलक दिसेल असा लावला. एका आजींनी विचारले, “अरे, प्लास्टिकचे चमचे पण नाहीत का?" सई हसून म्हणाली, “आजी, यंदा बाप्पाला आपण पर्यावरणाची भेट देतोय हाताने प्रसाद खा..." आरतीनंतर काकांनी सर्वांसमोर घोषणा केली, “आजपासून आपल्या सोसायटीत प्लास्टिकच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना पूर्णविराम देत आहोत. आता आपल्या सोसायटीत प्लॅस्टिकचा वापर कोणीच कधीच करायचा नाही. " सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विसर्जनाच्या दिवशी तर मुलांनी आणखी एक सुंदर उपक्रम केला. त्यांनी मातीच्या गणपतीची मूर्ती सोसायटीतील कृत्रिम विसर्जन टाकीमध्ये विसर्जित केली आणि त्याच मातीपासून नंतर रोपांसाठी कुंड्या बनवण्याचा संकल्प केला. बाप्पाला निरोप देताना ओंकार म्हणाला, “गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या… पण त्याआधी आमचा प्लास्टिकमुक्त संकल्प प्रत्येक घरापर्यंत पोहोचू द्यावा... " संगीता ताई म्हणाल्या, “बाप्पाची खरी आरती म्हणजे फक्त दिवा लावणे नाही; तर निसर्गाचा दिवा सदैव तेवत ठेवणे होय.पर्यावरणाला सांभाळणे होय... " त्या दिवशी पाच जणांनी सुरू केलेला छोटासा प्रयत्न संपूर्ण सोसायटीचा संकल्प बनला,आणि सर्वजण त्यात सहभागी झाले ही आनंदाची बाब होती. संदेश : बाप्पाची भक्ती करूया मनापासून, पण निसर्गाची काळजी घेऊया कृतीतून. प्लास्टिकला नकार देऊया, आपण पर्यावरणपूरक गणपती साजरा करूया..... जय गणपती बाप्पा!!!! वसुधा वैभव नाईक, पुणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन