STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

आईचा राग

आईचा राग

4 mins
1

*आईचा राग*

 भावनांच्या ओलाव्यातून उमललेली कविता… आईचा राग म्हणजे मायेचा ओलावा लेकरांच्या सुखासाठी तिचा जीव कासावीस व्हावा... ओठांवर राग, असते काळजी डोळ्यात मात्र प्रेमाची अखंड ज्योत मनात... चार शब्द रागाचे, दोन अश्रू गालावर भविष्याची चिंता तिला प्रेम आपल्या मुलांवर... कधी ओरडते, कधी अबोला धरते पण लेकरांच्या दुःखाने आतून तीच झुरते… तिच्या रागाला हट्ट समजून दूर नको जाऊ तिच्या हळव्या मनाला प्रेमाने समजून घेऊ… आईचा रागही कधी काळजी सांगून जातो तिच्या कठोर शब्दांमागे मायेचा झरा वाहतो… आई रागावते, कारण तिला काळजी असते लेकरांच्या सुखदुःखात ती भागीदार असते... आईचा राग - प्रेमामागची हळवी वेदना मुलं बोलत नसतील तर ती तिची मूक संवेदना... आई रागावते तेव्हा मुलांना तिचे शब्द कठोर वाटतात. तिचं बोलणं नकोसं होतं, तिच्या सूचना बंधनासारख्या वाटतात. पण त्या रागामागे लपलेली तिची काळजी समजून घेण्याचा प्रयत्न आपण किती वेळा करतो? मुलं लहान असेपर्यंत हे सर्व चालून जातो पण जर मुलं मोठी झाली तर त्यांनाही विचारांची गती असते आणि मग ते कोणत्या तरी वाईट विचारांना जवळ करतात... तिथून पुढे मुलं आणि आई यांचा संवाद बिघडत जातो. आईच्या रागामध्ये प्रेम लपले हे पाहतच नाहीत. आईच्या मनाचा विचारच करायचा नाही. कारण आता मुलं मोठी झाली आहेत. मुलांना स्वतःची अक्कल आली आहे. अक्कल येणे चांगलेच आहे परंतु आई आणि मुलांचे नाते विसरून चालत नाही. जेव्हा आई बोलते तेव्हा खूप राग येतो पण ज्या वेळी मुलं आईला बोलतात त्या वेळी आईच्या मनाच्या मुक्या संवेदना मुलांना कळतात का?? त्यावेळी त्यांना वाटतं मी जे बोलतोय तेच खरं आहे आई आता म्हातारी होत चालली आहे आणि आईच्या मनाचा विचार करणं त्यांच्या मनातच नसतं. पण त्यांना कुठे समजतं त्यांच्यापेक्षा अनेक उन्हाळे, पावसाळे,हिवाळे त्यांनी झेललेले आहेत. चांगलं, वाईट आई पेक्षा जास्त छान कोण जाणतं..... अजूनही मी साठ वर्षाची झाले तरीसुद्धा माझ्या आईकडे मला डोळे वर करून बघायची परवानगी नाही.शब्द काय तोंडातनं काढाल... पण आजची पिढी आई म्हणजे कोणीतरी आपली हक्काची वस्तू आहे असे मानतात...मानाव हक्काची वस्तू आहे पण त्या हक्काच्या वस्तूला सुद्धा मन आहे हे विसरता कामा नये. रबर ताणला तर तुटतो... म्हणजे काय तर कोणताही वाद किंवा संवाद हा खूप ताणला गेला नाही पाहिजे... कोणती वस्तू कशामुळे किती तुटते?? हे आपल्याला माहिती आहे. मग त्या ठिकाणी नातं कोणतंही असू देत, मनातन ती गोष्ट एकदा खाली पडली तर परत ती वस्तू परत उचलण्यासाठी मन तेवढं सक्षम असायला लागतं. म्हणजेच काय तर आई आणि मूल हे नातं सुद्धा एवढं पक्क असायला हवं की मनातला विचार,मनातला राग, द्वेष हे सगळं जाऊन पुढच्या क्षणाला सगळं निवळलं पाहिजे. एकमेकांवर डूख धरून चालत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते हे विसरून चालत नाही. आईला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, आयुष्यात यशस्वी व्हावं आणि चुकीच्या वाटेवर जाऊ नये, असं मनापासून वाटतं. याच अपेक्षांमधून कधी तिचा आवाज चढतो, कधी शब्द कठोर होतात. मात्र प्रत्येक रागामागे प्रेमच असतं असं पण नाही बरका... कधी आईही थकलेली, दुःखी किंवा तणावात असते. तिच्याही भावना समजून घेणं गरजेचं आहे. आईलाही मन आहे हे विसरता कामा नये. आई म्हणजे तुम्ही जसं डमरू वाजवाल तसं डमरू वाजवणारी वस्तू नाही. आईच्या मनातील मुक संवेदना वाचायला शिका. मुलं मोठी होतात, स्वतःचं विश्व निर्माण करतात. आईच्या सूचना त्यांना जुनाट वाटू लागतात. तिच्या काळजीला हस्तक्षेप समजलं जातं. पण तो हस्तक्षेप नसून त्याच्या पुढच्या वागण्याला दिशा देण्याचा काम असतं. जर का जीवनाची देशा चुकत असेल तर ते दिशा दाखवण्याचा काम आईच करते ना!आयुष्यभर आपल्या मुलाला चांगलं कोण जाणतं? तेव्हा आईच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असतो... ज्यांच्यासाठी आयुष्यभर धडपडले, त्यांनाच आज माझे शब्द नकोसे का वाटतात? विचारही नकोसे वाटतात. आणि आईच्या शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या काढला जातो. कारण त्यांच्या पंखात बळ आलेलं आहे. मुलांच्या पंखात बळ आईच घालते पण आईला विसरू नये असे मला असे वाटते. मुलांच्या पंखात बळ दिलं की ते स्वैर फिरायला मोकळे होतात असं नाही...आकाशाला गवसणी घाला पण पाय जमिनीवर ठेवा आणि आकाशाला गवसणी घालताना आई-वडिलांना विसरू नका ज्यांनी तुम्हाला जीवन दिल आहे...आणि ज्यांनी तुम्हाला लहानपणी सावरलेल आहे त्यांना विसरून कसे चालेल... आईला प्रत्येक वेळी महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. कधी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, कधी प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवणं, तर कधी “आई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना!” एवढे शब्दही तिच्या मनाला आधार देतात. बघा बरं प्रयत्न करून... म्हणा बरं आई मी आहे तुझ्यासाठी... त्या माऊलीला किती आनंद होतो हे तिच्या चेहऱ्यावर पाहून तुम्हाला समजेल. हा!आणि तुम्ही सुद्धा आई होणारच आहात ना!आई झाल्यानंतर तुमच्या मनाला कसे वाटते आणि तुमच्या आईशी तुम्ही कसे संवाद करत होतात हे निश्चित फरक जाणून बघा. आई आहे तोपर्यंत तिची काळजी घ्या. आई हा शब्द खूप मोठा आहे.... व्यापक आहे... त्या शब्दाची व्याप्ती विसरू नका. आईचा राग समजून घ्या.. पण तिच्या रागामागचं दुःखही ओळखा. कारण आईलाही प्रेम हवं असतं, समजून घेणारी माणसं हवी असतात आणि तिच्या भावनांना महत्त्व देणारं आपलं माणूस हवं असतं. ते आपलं माणूस आपलीच मुलं असतात ना! जर मुलांनीच आईला समजून घेतलं नाही तर बाकी कोण येणार आहे समाजातलं??? आईच्या रागाला उत्तर रागाने देण्यापेक्षा, तिच्या मनाला समजून घेणाऱ्या प्रेमाने द्या. कारण आईच्या मनाला जपणं, हीच नात्याची खरी श्रीमंती आहे... नात्याची किंमत ओळखून नाते जपण्याचा मनापासून प्रयत्न करावा. आई आणि मूल हे नाते खूप जबरदस्त आहे त्याचा विचार मनातून व्हावा... आनंदाने नाते फुलवा... वसुधा वैभव नाईक, पुणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन