ज्येष्ठ नागरिक दिन
ज्येष्ठ नागरिक दिन
🌷 ज्येष्ठ नागरिक दिन 🌷
ज्येष्ठ नागरिक 60 चा उंबरठा ओलांडला की ज्येष्ठ नागरिक असे म्हटले जाते.
ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः स्वतःची काळजी घ्यावी. पटकन कुठेतरी पाय दुमडणे, तोल जाणे,चक्कर येणे,बीपी त्रास, डायबेटीस त्रास,या गोष्टींमुळे स्वतःच स्वतःला जपावे. शेवटी अचानक काहीतरी होते हे कबूल आहे पण स्वतः स्वतःची काळजी घेतली तर बऱ्याच गोष्टी होणार नाहीत असे मला वाटते.
स्वतःचे मन वाचनात, लेखनात आणि नातवंडांबरोबर खेळण्यात घालवावे.
ही सेकंड इनिंग आयुष्याची फार महत्त्वाची असते. इथे आपली मुलं आणि नातवंड आहेत ती दिवसभर घराबाहेर असतात त्यांच्या नोकरीमुळे त्यांच्या शाळेमुळे आणि वृद्ध म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ माणूस हा घरामध्ये एकटा राहतो.
अशा वेळेला स्वतःचे छंद जे जीवनात उपभोगायचं राहिलेले आहेत ते नक्कीच करून घ्यावेत.
आपण वयाच्या 58,60 वर्षापर्यंत नोकरी करत असतो. अशा वेळेला अनेक छंद आपल्याकडून राहून गेलेले असतात. घराची पूर्ण जबाबदारी आपल्यावर असते मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो.आपला छंद पूर्ण करूयात...उदाहरण.. रांगोळी आहे,चित्रकला आहे,गाण्याचा छंद आहे,निसर्गात फेरफटका मारायचा छंद आहे,विविध सहलींचे आयोजन करण्याचा छंद आहे असे अनेक छंद असतात कोणाला लेखणीचा छंद असतो, यातून आपले जीवन मान उंचावत नेण्यासाठी ही एक सुसंधी आहे असे मला वाटते.
लहानपण,कुमार वय, तरुण पण आणि ज्येष्ठ असं म्हणूया वृद्ध म्हणायला नको.
वृद्धांना कोणाचातरी आधार लागतो पण जेष्ठ असं म्हटलं असता जरी आधार मिळाला किंवा द्यावा लागला असेल तरीसुद्धा जेष्ठाचे स्थान जीवनामध्ये फार उंच असते कारण त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या अनुभवातून शिकवण मिळत असते.प्रेरणा मिळत असते. वृद्धांना घरात खरंच स्थान नाही असे म्हटले तरीही चालेल हल्ली वृद्धाश्रमांकडे सर्वांचा ओढा आहे. इथे त्यांचे कुटुंबीय त्यांचा सांभाळ करू शकतात असे नाही पण अनेक अडचणी असल्यामुळे वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. खर तरं ही शोकांतिका आहे आजच्या तरुण पिढीची.अर्थात मी कोणालाच दोष देत नाही.पण ज्येष्ठांचे विचार घेऊन चालणारे कुटुंब खूप पुढे जाते. त्यांचा आदर केला जातो. जीवनात योग्य मार्ग निवडण्यासाठी ज्येष्ठांची खूप मदत होते.
माझ तर पहिल्यापासून म्हणणं आहे वृद्ध नको पण ज्येष्ठ शब्द जवळ करावा....
वृद्ध आणि ज्येष्ठ यांची खरं व्याख्या एकच आहे पण तरी पण शब्दांचा अर्थ पाहिला असता जरा वेगळा वाटतो.त्यामुळे जेष्ठाचे साम्राज्य कुटुंबामध्ये फार महत्त्वाचे असते त्यांच्या विचारांना महत्त्व प्राप्त होते.
बघा
वृद्ध = वयाचा उंचावलेला आलेख
ज्येष्ठ = वय + अनुभव + आदर
“वृद्धत्व ही वयाची अवस्था आहे;
पण ज्येष्ठत्व हा अनुभवाचा आणि सन्मानाचा मान आहे.”
जीवनाच्या या पथा वरती
अनुभवांची मस्त शिदोरी आहे
ज्येष्ठांच्या प्रत्येक शब्दामध्ये
जीवनाची एक कहाणी आहे..
कधी काठीचा आधार घेती
कधी आठवणींमध्ये ते रमती
घराच्या सुखासाठी त्यांनी
सारी हयातच वाहिलेली असती...
आई-बाबांच्या मायेपुढे बरं
कुठलीच संपत्ती मोठी नाही
त्यांच्या आशीर्वादाविना
घराला खरे घरपण नाही काही...
आज थोडे केस पांढरे झाले
पावलांना आली थोडी मंद गती
पण मनामधले ते प्रेम अजूनही
आहे सर्वांप्रती खूप आपुलकी..
त्यांच्या अनुभवाचा आदर करूया
त्यांचे दुःख आपण जाणून घेऊया
त्यांच्या एकटेपणाच्या संध्याकाळी
आपुलकीचा हात हाती देऊया...
ज्यांनी घडविले आपले जग
त्यांना सन्मान नित्य देऊया
ज्येष्ठ नागरिक दिनी नव्हे
दररोज त्यांची विचारपूस करूया...
त्यांच्या चेहऱ्यावरचे खरे हसू
आपल्या जगण्याची शान असू दे
त्यांच्या आशीर्वादाच्या सावलीत
आपले जीवन सुखी होऊ दे...
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
