दि. 19/09/2026 *मनाशी मनाचेच चाललेले द्वंद्व...*
दि. 19/09/2026 *मनाशी मनाचेच चाललेले द्वंद्व...*
दि. 19/09/2026
*मनाशी मनाचेच चाललेले द्वंद्व...*
बऱ्याच वेळी जीवनात अशी वेळ येते, जेव्हा बाहेरची परिस्थिती शांत असते; पण मनाच्या आत मात्र विचारांचे वादळ सुरू असते.
कोणातेही वाद नसतात.कोणाही बोलणे नसते. संभ्रम नसतो.तरीही मनाशी मनाचेच द्वंद्व चाललेले असते.
एक मन म्हणते, “सोडून दे... जे घडायचे ते घडून गेलेय .”
तर दुसरे मन म्हणते, “नाही! अजून एकदा प्रयत्न करून बघूया..
एक मन भूतकाळाच्या आठवणींत रमलेले असते, तर दुसरे मन भविष्याच्या उंची स्वप्नांकडे पाहत असते. एक मन म्हणते, “तुला खूप सहन करावे लागले ” तर दुसरे मन हळूच कानी सांगते, “थोडे अजून सहन कर... कदाचित उद्या सगळे बदलेल.”पण अजूनही शंका येते मनी.. खरेच सर्व बदलेल का हो?
या द्वंद्वात सर्वांत जास्त थकतो माणूस स्वतःच... अति विचार करायला लागतो. मनाने खूप थकून जातो.
मनाला अनेक प्रश्न पडतात..मी योग्य केले का? कुठे चुकले माझे ? कुणावर विश्वास ठेवावा की नाही ? कुणाला जवळ करावे की नाही ? कुणापासून अंतर ठेवावे? काही नाती जपावीत की स्वतःचे मन जपावे?असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालतात.
कधी कधी उत्तर समोर असते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य नसते. मानसिकता नसते.कारण मनाला सत्यापेक्षा आशा प्रिय असते.भावना प्रिय असते.म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा त्याच आठवणींत, त्याच प्रश्नांत आणि त्याच विचारांत गुरफटत राहतो.त्यातच रममाण होतो.
प्रत्येक मानसिक द्वंद्व आपल्याला काहीतरी शिकवून जाते. ते आपल्याला स्वतःची ओळख करून देते. आपली ताकद, आपली कमजोरी, आपली अपेक्षा आणि आपल्या मनाची खरी गरज समजून घेण्याची संधी देते.संकटात सामना करायला शिकवते. धीर देते.
शेवटी जीवनाचा सर्वांत मोठा निर्णय बाहेरची माणसे घेत नाहीत; तो आपल्या मनालाच घ्यावा लागतो.
म्हणून मनात संघर्ष असेल, तर त्यापासून पळू नका. स्वतःशी शांतपणे संवाद साधा. मनाचे दोन्ही आवाज ऐका... आणि मग असा निर्णय घ्या, ज्यामुळे परिस्थिती बदलली नाही तरी मनाला शांतता मिळेल.
कारण प्रत्येक लढाई जिंकणे महत्त्वाचे नसते.. मनाशी मनाला पटेल, रुचेल तेच करावे.पण माणुसकी विसरायची नाही.
मन चंचल, अस्थिर आहे. अनेक गोष्टींचा ताळमेळ एकदाच घालण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक विचाराचा साचा थोडाफार सारखा असतो. पण प्रत्येकाबद्दलची भावना वेगळी असू शकते.
त्यामुळे मनाने मनाशी केलेला सुसंवाद हा विचारात घेऊन आपल्या मनातली उलघाल योग्य वेळेस संपवावी.
कधी कधी स्वतःशी समेट करणे हीच आयुष्यातील सर्वांत मोठी जीत असते.
आपल्याच मनाला हिऱ्याच्या कोंदणात बसवावे योग्य निर्णय घ्यावेत.भावनांचा वापर करावा...आणि योग्य त्या मार्गाने चालावे ...
मनाशी मनाचेच, चालले द्वंद्व
विचारांच्या गर्दीत हरवले आपलेच छंद...
एक मन म्हणते, “सोडून दे सारे,”
दुसरे म्हणते, “थांब जरा रे....
डोळ्यांत प्रश्न अन् मौन ओठांवर
मनात मात्र उठतो विचारांचा काहूर...
जपावे नाते की स्वतःला जपावे
कोणते दुःख मनातच ठेवावे?....
कधी आशा जिंकते, कधी भीती हारते
मनाचीच मनाची रोज लढाई होते.....
शेवटी शांत होतो गोंधळ विचारांचा
स्वतःशीच होतो संवाद नितळ प्रेमाचा...
द्वंद्व संपते जेव्हा मनाला तेव्हा कळते
स्वतःची साथच शेवटी आपल्या बरोबर कायम राहते.....
स्वतःच्याच विचारातून अलगद बाहेर पडावे
आपलेच शरीर आपलेच आजारांचे माहेरघर नसावे....
वसुधा वैभव नाईक, पुणे....
— वसुधा वैभव नाईक, पु
