लख लख चंदेरी
लख लख चंदेरी
*लखलख चंदेरी*
नभात चांदण्यांची आरास असावी. अंगणात दिव्यांची माळ असावी आणि प्रत्येकाच्या मनात आनंदाची ज्योत तेवत असावी, असं सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं, तेव्हा ओठांवर सहज शब्द येतात — लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया..
किती जुने गाणे आहे. त्याचा अर्थ, चाल, लय, ताल एक नंबर आहे. अजूनही आठवले की मन प्रसन्न होते आणि आपोआप आपणही त्या सुरात हरवतो.
दिव्यांचा प्रकाश केवळ घर उजळत नाही, तर तो मनातही आशेचे किरण पेरत असतो .पेटता दिवा पाहिला की मन प्रसन्न होते.
लखलखणाऱ्या पणत्या आपल्याला जगण्याचा सुंदर संदेश देतात. अंधार कितीही गडद असला, तरी एक छोटीशी ज्योत त्याला आव्हान देऊ शकते. पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये एक मिनमिनती पणती जरी लावली तरी पूर्ण घर उजळून टाकते. एवढीशी पणतीची ज्योत ती पूर्ण घर उजळून टाकण्याची ताकद तिच्यामध्ये असते. तिमिर नाहीसा करते आणि प्रकाशाची ज्योत पेटवते. तिमीराकडून तेजाकडे नेते.
अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात कितीही संकटं आली, तरी मनात आशा, जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर आपण यशाचा मार्ग शोधू शकतो. संकटांचा सामना करू शकतो. आलेल्या संधीचा फायदा घेऊ शकतो.
चंदेरी प्रकाश म्हणजे केवळ चकाकी नव्हे; तर नात्यांमधील प्रेम, शब्दांमधील गोडवा, माणुसकीतील ओलावा आणि विचारांमधील निर्मळता होय. घरात दिवे लावणं सोपं आहे; पण एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचा दिवा लावणं ही खरी माणुसकी आहे. आनंदाचा दिवा लावताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळवता येतो आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतो. बघा एखाद्या वृद्धाश्रमातील वृद्धांना वडापावची मेजवानी दिली तरी ते किती खुश असतात.
अनाथ मुलांना दिवाळीमध्ये कपड्यांचे वाटप केले तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही.
दररोज काबाडकष्ट करणाऱ्या बायकांना जर आपण दिवाळीमध्ये छान नवीन साड्या घेऊन दिल्या तर त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना आपण पाहतो.हाच तो आनंदाचा दीप होय
एखाद्या अनाथाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं, दुःखी मनाला आधार देणं, निराश व्यक्तीला आशेचा किरण दाखवणं, अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची ज्योत पेटवणं, हीच खरी लखलख चंदेरी दुनिया असते..
आपण दिवाळीत घर स्वच्छ करतो, आकर्षक सजावट करतो; पण मनातील राग, द्वेष, मत्सर आणि अहंकारही दूर केले, तर जीवन अधिक सुंदर होईल. आपल्या शब्दांनी कुणाचं मन दुखावण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आलं, तर तोच खरा प्रकाशोत्सव साजरा होईल.
चला तर मग, आपल्या कर्तृत्वाने, प्रेमाने, साहित्याने, समाजसेवेने आणि सेवाभावाने जग उजळवूया.प्रकाशमान दीप पेटवूया.
आपल्या हातातील एक छोटीशी ज्योत दुसऱ्याच्या हातात देऊया. कारण प्रकाश वाटल्याने तो कमी होत नाही, उलट त्याचा उजेड अधिकच वाढतो. ज्ञानाचा दीप घरोघरी लावावा तसे प्रकाशासाठी दीप हातोहाती सोपवावा.
लखलख चंदेरी प्रकाशात केवळ अंगणच नव्हे, तर माणसामाणसांतील नातीही उजळायला हवी आहेत.
लखलख चंदेरी
नभात चांदणी
अंगणी उतरली
प्रकाशाची राणी...
पणत्यांच्या ज्योती,
सोनेरी सजला साज,
आनंदाने दीप नटला
दिवाळ सण आज...
दिवा एक प्रेमाचा,
नात्यांसाठी लावावा
दिवा एक मायेचा
आप्तांसाठी ठेवावा..
नको कुणाच्या मनात
दुःखाचा कधीच अंधार
नको या नात्यांमध्ये
दुराव्याची भिंत अपार...
स्नेहाच्या धाग्यांनी
नाती मनात गुंफूया
प्रेमाच्या प्रकाशात
जग सारे उजळूया...
लखलख चंदेरी दुनिया
स्वप्नांची फुलते पहाट
सुखाची बरसात होते
आनंदाची मिळते वाट....
प्रत्येक मनात एक दीप तेवू दे प्रत्येक ओठांवर हास्य फुलू दे, लखलख चंदेरी या प्रकाशपर्वात, प्रेमाचा सुगंध जगभर दरवळू दे....
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
