जखम मनाची
जखम मनाची
*जखम मनाची*
मनाला झालेली जखम दिसत नाही, पण तिची वेदना खूप खोल असते.त्या वेदनेला काळ हेच औषध असते.
कधी एखादा शब्द मनाला लागतो, तर कधी जवळच्या व्यक्तीचे वागणे दुखावून जाते.कोणाचा चेहरा सर्व बोलून जातो.कोणाच्या नजरेतून समजते.
मनाला झालेली जखम सहजासहजी लवकर भरून येत नाही. ती अंतरी खोलवर रुजते.
शरीरावरील जखम औषधांनी भरते. पण मनाची जखम भरायला वेळ लागतो.
मनातील दुःख प्रत्येकाला सांगता येत नाही." घरोघरी मातीच्या चुली " या उक्तीप्रमाणे घरोघरी थोड्याफार फरकाने तेच चालू असते....
म्हणूनच अनेकदा हसऱ्या चेहऱ्यामागे वेदना दडलेल्या असतात.' विदुषक लोकांना हसवतो, चेहरा हसरा ठेवतो, पण त्याच्या चेहऱ्या मागची दुःख कोणाला माहित नसतात. पण तो हसवण्याचे त्याचे काम चोख बजावतो.
काही प्रसंग,आठवणी मनावर कायमच्या खुणा उमटवून जातात. काही जण त्या आठवणी लवकर पुसण्याचा प्रयत्न करतात तर काहींच्या मनामध्ये त्या आठवणीत तशाच कायमच्या रुजून राहतात.
मात्र काळ हळूहळू त्या वेदनांना सहन करण्याची ताकद देतो. अरे मानव त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.
स्वतःला समजून घेता घेता, मनातील भावना व्यक्त करणे गरजेचे असते.नाहीतर तर त्या दुखऱ्या वेदनाची खपली कायम तशीच राहते.
ज्यांनी मन दुखावले त्यांना माफ करणे म्हणजे स्वतःला वेदनेतून मुक्त करणे.माफ करणे हा स्वभाव प्रत्येकाने आपल्याकडे बाणवावा. म्हणजे जीवन अतिशय सुखकर होते.
मनाला जपले, तर तुटलेल्या भावनांमधूनही नव्या आशेचा जन्म होतो....
मनाच्या कोपऱ्यात जखम ताजीच राहते
हसताना देखील कधी डोळ्यांत दिसते...
शब्दांचे घाव कधी विसरता येत नाही
मनाची वेदना कुणाला सांगता येत नाही...
काळाच्या ओघात दुःख हळूहळू विरत जाते
मन पुन्हा नव्या स्वप्नांनी सजत राहते...
जखम तशीच राहते, पण वेदना कमी होतात
आठवणींच्या सावलीत हळूहळू दूर सरतात...
स्वतःवर प्रेमाची फुंकर घालत राहावे
तुटलेल्या मनाला पुन्हा फुलू द्यावे....
वसुधा वैभव नाईक, पुणे
