ज्येष्ठांनी ज्येष्ठांना केलेली मदत
ज्येष्ठांनी ज्येष्ठांना केलेली मदत
🌷 ज्येष्ठांनी ज्येष्ठांना केलेली मदत 🌷
ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याचा शेवटचा टप्पा नव्हे,किंवा वृद्धत्व नव्हे.तर अनुभवांनी समृद्ध झालेला एक सुंदर प्रवास आहे.
या प्रवासात अनेक चढ-उतार येतात. शरीराची ताकद कमी होऊ शकते, काही जबाबदाऱ्या कमी होऊ शकतात; पण मनातील माणुसकी, आपुलकी आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची इच्छा कधीच कमी व्हायला नको असे मला वाटते.
आज अनेक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या आयुष्यातील विविध कारणांमुळे एकटेपणाचा सामना करताना दिसतात. कोणाची मुलं परदेशी असतात. कोणाच्या मुलींची लग्न होऊन त्या सासरी नांदत असतात.
यातील कुणाला आरोग्याच्या कारणाने मदतीची गरज असते, कुणाला दैनंदिन कामात सहकार्य हवे असते, तर कुणाला फक्त दोन प्रेमाचे शब्द ऐकण्यासाठी कोणीतरी जवळ हवे असते.कुणाला भाजीपाला, फळं हवी असतात.अशा वेळी ज्येष्ठांनी ज्येष्ठांच्या मदतीला धावून जाणे ही केवळ मदत नसून माणुसकीची सुंदर परंपरा आहे.ही मी स्वतः मदत केलेली आहे. अजूनही करते आहे.
कुणाला दवाखान्यात जायचे असेल तर सोबत जाणे, औषधे आणून देणे, सरकारी योजना किंवा आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे, एखाद्या अडचणीत असलेल्या ज्येष्ठाशी फोनवरून संवाद साधणे, त्यांची विचारपूस करणे.या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात मोठा आधार निर्माण करू शकतात.
विशेष म्हणजे अशी मदत करणाऱ्या व्यक्तीला समोरच्याची परिस्थिती समजून घेणे अधिक सोपे जाते. कारण ज्येष्ठ व्यक्ती दुसऱ्या ज्येष्ठाच्या अडचणी केवळ ऐकत नाही, तर त्या अनुभवातून समजून घेत असते.
माझ्या घरासमोर राहणारे कर्णिक कुटुंब आहे. आजी आहेत 80 वर्षाच्या तर आजोबा आहेत 85 वर्षांचे. आजोबांना काचबिंदू झाल्यामुळे त्यांना दिसत नाही. पण त्यांचे मेमरी खूप शार्प आहे ते पुस्तक लिहितात कोणाकडून तरी लिहून घेतात. पूर्वी त्यांची लेखनिक आणि वाचक मीच होते. घर समोरासमोर त्यामुळे वेळ मिळेल तसा मी त्यांच्याकडे जायची त्यांना वेळ मिळाला की ते माझ्याकडे यायचे.
त्यांचा लेखनिक आणि वाचक म्हणून मला अनेक गोष्टी शिकता आल्या.जीवन व्यवहारा मधील. त्यामुळे मला खूप आनंद आहे की अशा जोडप्याची मी मदत करू शकते. आता माझी नातवंड सुद्धा त्यांची मदत करत आहेत.
“मला काय मिळेल?” या विचारापेक्षा “मी कोणाच्या उपयोगी पडू शकतो?” हा विचार ज्येष्ठांच्या जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवतो.
मदत म्हणजे नेहमी पैशांचीच असते असे नाही. कधी वेळ देणे ही मदत असते, कधी एखाद्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे ही मदत असते, तर कधी फक्त “काळजी करू नका, मी आहे” एवढे म्हणणेही मोठा आधार ठरते.
ज्येष्ठांनी एकमेकांसाठी अशी छोटी-छोटी मदतीची वर्तुळे निर्माण केली, तर एकटेपणा कमी होऊ शकतो आणि समाजात आपुलकी वाढू लागते.
आपण आयुष्यभर कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि समाजासाठी काही ना काही देत आलो आहोत. आता आपल्या अनुभवाचा उपयोग एकमेकांसाठी करूया.
कारण वय वाढले म्हणून हात थांबायचे नसते.
फक्त मदतीचा स्वरूप बदलायचे असते.
आपण कुणाला आधार देऊ शकतो, कुणाचा आत्मविश्वास वाढवू शकतो, कुणाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणू शकतो.
ज्येष्ठांनी ज्येष्ठांना दिलेला आधार म्हणजे दोन व्यक्तींमधील मदत नाही; ती अनुभवाने अनुभवाला दिलेली साथ आणि माणुसकीने माणुसकीला दिलेली हाक आहे.
आपणही ठरवूया...
“मी एकटा नाही आणि माझ्या आसपासचा ज्येष्ठही एकटा नाही.आपण एकमेकांसाठी आहोत!”
ही भावना रुजली तर ज्येष्ठत्वाचा प्रत्येक दिवस अधिक आनंदी, सन्मानपूर्ण आणि अर्थपूर्ण होईल.आनंदी व समाधानी जीवन जगता येईल.आनंद एकमेकांना देता येईल.
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
