STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

केसांचा रंग आणि घरातील अधिकार*

केसांचा रंग आणि घरातील अधिकार*

3 mins
0

*
 वय वाढत जाते,केसांचा काळा रंग हळूहळू पांढरा होतो.मग त्याला डाय करून हवा तो रंग ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ते लपवता येण्यासारखे नसते. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, चालण्याचा वेग मंद होतो आणि शरीर पूर्वीसारखे साथ देत नाही. पण मन मात्र अजूनही तेच असते. लहान मुलांसारखे, तारुण्यातील बहरसारखे.... आपल्या माणसांसाठी काळजी करणारे, घरासाठी निर्णय घेणारे आणि आपली माणसे सुखी राहावीत अशी मनापासून इच्छा बाळगणारे. कधी काळी घरातील प्रत्येक निर्णयात त्यांचे मत विचारले जायचे. किंवा आपले विचार शिस्त घरावर लादणारे सुद्धा मन होते. मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंत, घर बांधण्यापासून आर्थिक नियोजनापर्यंत त्यांचा शब्द महत्त्वाचा असायचा. त्यांच्या अनुभवाला घरात वजन असायचे.पण..... पण काळ बदलतो… केसांचा रंग जातो तसा घरातील अधिकारही नकळत कमी होत जातो. वयोवृद्धाच्या शब्दांना मान फार कमी मिळतो. पूर्वी, “बाबा म्हणतात म्हणजे बरोबर असेल,” असे मानणारी मुले मोठी होतात. स्वतःचे निर्णय घेऊ लागतात. त्यात काही चुकीचे नाही. प्रत्येक पिढीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मात्र या बदलात एक गोष्ट हरवू नये.वृद्ध माणसाचा सन्मान हरवू देवू नये. त्यांना विचारा हे योग्य आहे का? नसेल तर त्यांना स्पष्ट सांगा की इथे हे विचार जमत नाहीत आपण दुसरा विचार करूया पण गोडीत सांगावे. “तुम्हाला आता काय कळतं?” “तुमच्या काळात असं होतं…” “तुम्ही यात पडू नका…” अशी वाक्ये कदाचित सहज बोलली जातात; पण ती वृद्ध मन आतून खूप दुखावतात. त्यांच्या मनाला या गोष्टी लागून जातात आपण इतक्या वर्ष सगळं केलं आणि आता आपल्याला कळत नाही अशी म्हणणारी आपलीच मुलं त्यांच्या मनाला पोखरून जातात.... त्यांचे मन उदास होते. पुढे काय मग ते निःशब्द होत जातात आणि मनातले मनात विचार करत व पुढील आजारांना सामोरे जातात. त्यांचा एकटेपणा वाढतो. आता आपली गरज या घराला नाही असे वाटते. या घरातील माझे अस्तित्व संपले आहे आता यापुढे आपले काय?? अशा अनेक विचारांनी त्यांचे मन खात जाते. फक्त काही गोष्टी पाळाव्यात... प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना विचारात घ्यावे. जरी निर्णय पटला नाही तरी हे चांगलं नाही हे तोंडावर सांगू नये. गोड शब्दात त्यांना पटवून द्यावे. प्रत्येक वयोवृद्ध आपल्या वेळी काय झाले हे विचारात घेतो. आणि असेच विचार प्रकट करत असतो. हल्ली जमाना नवीन आहे तंत्रयुग आहे. या पद्धतीमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत याचा वापर योग्य तो झाला... तर वयोवृद्धांना देखील त्रास होत नाही फक्त त्यांचे विचार विचारून कृती करावी. त्यांना फक्त एवढेच वाटते की, “माझे मत अजूनही महत्त्वाचे आहे.” अधिकार कमी झाला तरी आपलेपणा कमी करू नये.जबाबदाऱ्या कमी झाल्या तरी आदर कमी होऊ नये. घराची सूत्रे पुढच्या पिढीने हातात घेतली तरी ज्यांनी हे घर उभे केले, त्यांच्या हातातील अनुभवाची शिदोरी विसरू नये. त्यांचे अनुभव देखील विचारात घ्यावेत आणि आपल्याला हवे ते करावे. दोघांचा समन्वय साधून केले तर अति उत्तम होते. वय म्हणजे ओझे नाही. वृद्धत्व म्हणजे त्या व्यक्तीचा उपयोग संपणे असे नाही. आणि पांढरे केस म्हणजे विचारांची किंमत संपणे तर अजिबातच नाही. त्या पांढऱ्या केसांमध्ये अनुभवांची खाण असते हे विसरता कामा नये. घरातील ज्येष्ठ माणूस म्हणजे त्या घराच्या इतिहासाचे जिवंत पुस्तक असतो. त्याच्या आठवणींमध्ये घराची मुळे असतात आणि अनुभवांमध्ये पुढच्या पिढीसाठी दिशा असते. म्हणून घरातील अधिकाराचे हस्तांतरण होऊ द्या; पण सन्मानाचे हस्तांतरण कधीही होऊ देऊ नका.... कारण उद्या आपलेही केस पांढरे होतील… आपलाही आवाज थोडा मंद होईल… आपल्यालाही कुणीतरी म्हणेल, “आता तुम्ही आराम करा.” तेव्हा आपल्याला अधिकारापेक्षा अधिक गरज असेल ती एका प्रेमळ शब्दांची.. “तुम्ही आहात, म्हणून हे घर अजूनही घर आहे!”असे बोललात तर त्याना खूप आनंद होईल... हीच तर जीवन संपत्ती आहे. अनुभव बोलत असतो. आपल्या घरातील जेष्ठ, वयोवृद्ध माणसाची किंमत कधीच कमी होऊ देवू नका.... वसुधा वैभव नाईक, पुणे. मो. नं. 9823582116


साहित्याला गुण द्या
लॉग इन