मॅच्युरिटी
मॅच्युरिटी
*मॅच्युरिटी (परिपक्वता)*
मॅच्युरिटी म्हणजे केवळ वय वाढणे नव्हे, तर विचार, वागणूक आणि निर्णयांमध्ये आलेला समजूतदारपणा होय.
काही व्यक्ती वयाची चाळीशी, पन्नाशी,साठी उलटली तरी सुद्धा परीपक्व नसतात वयाने मॅच्युअर झालेले नसतात . खेळकरपणा असावा. स्वभाव मनमौजी असावा. पण टोचून बोलणारा नसावा.
याचा अर्थ असा की निर्णय क्षमता त्यांना कमी असते असे नाही... पण आपण कुठे काय बोलावे हे समजत नसते. आपल्या बोलण्याचा इतरांच्या मनावर काय परिणाम होईल याची समज कमी असते. म्हणतात ना "उचलली जीभ लावली टाळ्याला".... असे होते.
"शब्द हा विचाराचा पुत्र आहे." माणसाने आपल्या मुखातून शब्द बोलताना तो विचारपूर्वक बोलला पाहिजे. आपल्या बोलण्याने किंवा शब्दाने कोणाचे मन दुखवणार नाही असे वागले पाहिजे.
हल्ली समाजामध्ये एकमेकांची उणी धुणे काढण्यात दिवस जात आहेत.
मला एवढेच म्हणायचे आहे की प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये डोकवावे आपल्यामध्ये काय कमी आहे,आपण कुठे कमी पडत आहे ती सुधारणा आपल्या स्वतःत करावी.
हल्ली स्वतःमध्ये पाहण्यापेक्षा दुसऱ्या मध्ये काय कमी आहे याचा विचार प्रत्येक माणूस करत आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की... समोरच्याकडे आपण एक बोट दाखवले तर स्वतःकडे चार बोटं असतात हे माणसाने विसरू नये. याचा अर्थ काय तर स्वतः मधले दोष शोधावेत आणि मग दुसऱ्यांचे दोष काढावेत.
तसं पाहिलं तर हल्ली समोरच्याला उत्तर देणे हेही फार महत्त्वाचे झाले आहे. नाहीतर समोरचा व्यक्ती बोलल्याशिवाय आणि त्याची खोड काढल्याशिवाय राहत नाही. त्याला उत्तर दिलं पाहिजे. अशावेळी राग येतो पण रागावर कंट्रोल ठेवावा. आपण त्याला सामोरे जाताना शांतपणे सामोरे जावे. "जशास तसे "वागून चालत नाही. त्याने आरे म्हटलं की आपण का रे म्हटलं पाहिजे असंही नाही. तर संयमानं कोणत्याही गोष्टी घ्याव्यात.
संयमाने घेतलेली एखादी गोष्ट कदाचित चांगली होऊ शकते.बिघडत तर नाही.
हे माझ्या बाबतीत कित्येकदा घडलेले आहे म्हणून हे उदाहरण मी देण्याचा प्रयत्न करत आहे.
उदा :- आपली काही चूक असो नसो तरी सुद्धा मुख्याध्यापक सर्वांना बोलतात त्यावेळी आपण शांत रहावे. त्यांना बोलावेच लागते त्यांना एवढे शिक्षक सांभाळायचे असतात.
ज्यावेळी त्यांना वाटेल की नाही आपण जे बोललो ते चुकीचं होतं त्यावेळेला ते आपल्याशी बोलून समर्थन करतील त्यांच्या चुकीच्या मुद्द्याबद्दल. त्यावेळी आपण शांत मनानं त्यांना काय हवं होतं आणि काय झालं हे सांगितलं तर आपले वरचे अधिकारी सुद्धा आपल्याला मान सन्मान देतात. हा अनुभव आहे. आपल्या मताला किंमत राहते.
कोणाचेही मन न दुखवता आपण आपले कार्य करत राहावे आणि त्यावेळी नक्कीच आपल्या कार्याचा गौरव होतो. आणि आपल्याशी सगळे चांगले बोलतात हा स्व अनुभव आहे.
एक म्हण आहे बघा "निंदकाचे घर असावे शेजारी " याचा अर्थ काय तर आपल्या चुका दाखवणारे सुद्धा समाजामध्ये हवे आहेत तर आपल्यामध्ये आणखी छान प्रगती होत जाते. असेही अनुभव आहेत खूप.
" ध्येयाचा ध्यास लागला की कार्याची पूर्तता होते म्हणतात " याप्रमाणे आपण आपलं कार्यामध्ये सतत मग्न राहावे. प्रथम आपल्या हातून चुका होतील पण कालांतराने त्या चुका होणार नाहीत म्हणजेच आपली स्वतःची मॅच्युरिटी आपण तपासून पहावी. आपलेच आपल्याला कळते की आपण कितपत मॅच्युअर झालेला आहोत. स्वतःची परीक्षा स्वतःच घ्यायला शिकावे.
जीवनातील अनुभव माणसाला परिपक्व बनवतात. प्रत्येक परिस्थितीत शांत राहून योग्य निर्णय घेणे, इतरांच्या भावना समजून घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे ही परिपक्वतेची लक्षणे आहेत.
परिपक्व व्यक्ती यशाचा गर्व करत नाही,आणि अपयशात खचूनही जात नाही. ती प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवे शिकण्याचा प्रयत्न करते. नातेसंबंध जपताना संयम आणि समजूतदारपणा दाखवतात. मतभेद असले तरी आदर राखून संवाद साधावा. संवादात आपलेपणा जाणवावा.
बरेचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीचे मत पटेलच असे नाही. पण आपण त्याच्या मतांचा आदर करावा. प्रत्येकाची निर्णय क्षमता वेगळी आहे. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. आपल्या हाताची पाच बोटं जर सारखी नाहीत तिथे पाच व्यक्तींचे विचार कसे जुळतील?? याचा विचार करावा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाचा मान ठेवून बोलावे.
काही चुका झाल्या तर एकांतात सांगाव्यात. एक गोष्ट सांगते "कौतुक करावे जनामध्ये आणि रागवावे एकांतामधे ".
त्यामुळे समोरील व्यक्तीचा मान ठेवला जातो. आणि त्याचे विचार त्याला पटवून दिले जातात. चूक कुठे झाली हे पण समजावून सांगितले जाते. कोणतीही चूक समजावून सांगताना रागाचा पारा वर नसावा. माणसाबद्दलचा त्या व्यक्तीचा आदर आणखी वाढतो.
परिपक्वता माणसाला स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकवते. ती अहंकारापेक्षा नम्रतेला महत्त्व देते. जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद देते.
खरी मॅच्युरिटी म्हणजे स्वतःला ओळखणे, परिस्थितीचा योग्य विचार करणे आणि इतरांच्या आनंदात आनंद मानणे. परिपक्व व्यक्ती समाजात आदराचे स्थान मिळवते. त्यामुळे प्रत्येकाने अनुभवातून शिकत स्वतःला अधिक समजूतदार आणि परिपक्व बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतः मॅच्युअर व्हावे.
वय वाढले म्हणून माणूस मोठा होत नाही
अनुभवांच्या शिदोरीनेच परिपक्वता येई बाई ....
शब्दांमध्ये संयम असतो,निर्णय दिसतो
विचारांमध्ये खोली असते, स्वभाव जाणता येतो..
समजुतीची फुले फुलत असतात बरं
यश आले तरी नम्र राहयाचे खरं..
अपयशातही अजिबात खचून नाही जायचे
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
स्वतःत बदल करायचे...
चुका मान्य करून मानव शिकत राहतो
अहंकाराला दूर ठेवून माणुसकी जपतो...
माणूस आहे माणसाप्रमाणे वागूया
परिपक्वतेचा दीप कायम उजळवूया...
विचारांना नवे पंख, बळ मिळवून देवू
समजूतदारपणाच्या वाटेवर
सुंदर जीवन फुलवू.... 🌷
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
