छकुली
छकुली
छकुली....
छकुली एक मध्यमवर्गीय घरातील लाडात वाढलेली मुलगी. वडील हा हमाली काम करायचे. आई गृहिणी होती.
आजी,आजोबा,भावंड हे सर्व एकत्र होते. कुटुंब एकत्र पद्धतीचे होते.
छकुलीचे शिक्षण जेमतेम दहावी पूर्ण झाले. त्यानंतर दोन वर्षात तिचे लग्न करून देण्यात आले. अगदी 18 व्या वयात तिच्यावर घराची मोठी जबाबदारी आली.
शेतीवाडीत कष्ट करणारा नवरा आणि सासू-सासरे अशा कुटुंबामध्ये तिचे लग्न झाले आणि ती संसाराला लागली.
आता शेतीवाडी म्हटलं की स्वतःच्या शेतामध्ये कष्ट करायला लागतातच. तसेच छकुलीला सुद्धा शेतामध्ये कष्ट करावे लागत होते. तशी कष्टाची सवय नसल्याने तिच्या हाताला फोड येणे, पाय भाजण,उन्हात काम करणं हे होऊ लागले.
छकुलीचा नवरा राम आणि छकुली दोघांनी घरात खूप काबाड कष्ट करून पैसा मिळवत होते. आपले कुटुंब चालवत होते.
काही वर्षातच त्यांना दोन मुले आणि एक मुलगी झाली. दोघेही आपल्या मुलांमध्ये रमायला लागले. शेतीत कष्ट करणे होतेच या बरोबर मुलांना वाढवणं,त्यांना शाळेत घालणं सर्व सुरू झाले.
दिवसा मागून दिवस जात होते. मुलं मोठी होऊ लागली. घरातला सासू-सासऱ्यांचा हातभार कमी झाला. त्यांना देवाज्ञा झाली.
आता मात्र छकुलीवर मोठी जबाबदारी येऊन पडली. मुलांसाठी तिला घरात रहावेच लागत होते. मुलीला एकटे सोडून जाता येत नव्हते. आजूबाजूची वस्ती तेवढी चांगली नव्हती. उगीच आपल्या जीवाला घोर नको म्हणून छकुली मात्र आपल्या घरीच वेळ काढायला लागली,आणि घरून जी काही शेतीसाठी मदत होईल ती मदत करायला लागली. मुलांच्या संगोपनासाठी घेतलेला हा निर्णय तिच्या रामला सुद्धा मान्य करावा लागला.
कालांतराने मुलीचे लग्न झाले. मुलगी चांगल्या घरात दिली. आता छकुली आणि राम यांना आपल्या मुलीची काळजी नव्हती.
दोन मुलगे तिच्या नंतरचे होते मुलं जरा लहान होती म्हणून आईने म्हणजेच छकुली लय आणखी काही दिवस घरी जाण्याचा निर्णय घेतला. राम नेही तिला उत्तम साथ दिली.
मुले मोठी झाली शिक्षण शिकून आपापल्या पायावर उभी राहिली.
दोन्ही मुलांचे एका मागून एक असे लग्न झाले. राम आणि छकुलीला सुना आल्या. छकुलीच्या तब्येतीमुळे मात्र तिला आता शेतात जाणे कठीण झाले होते. जरी वय अगदी 53 होते तरीसुद्धा तिला हालचाल करणे कठीण झाले होते. कारण तिने अठराव्या वर्षापासून तिने काबाडकष्ट केलेले होते.
राम तुझ्यावर अतोनात प्रेम करत असतो. पण त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. काही वर्षात त्यालाही देवाज्ञा झाली. आता छकुली एकटीच राहिली. त्याच्या आधाराशिवाय तिला जगणे कठीण झाले.
मुलं आणि सोना त्यांच्या त्यांच्या मस्तीत मौज करत होते. आईकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते. वडील होते म्हणून थोडे तरी तिला सांभाळत होते. पण जशी वडीलांना देवाज्ञा झाली तसे मुलं आणि सुना तिच्याकडे दुर्लक्ष करू लागले.
एक दिवस छकुलीला खूप उलट्या झाल्या. मुलांनी लाजे खातर तिला साध्या दवाखान्यात नेऊन आणले. तीन दिवसाची औषधे डॉक्टरांनी दिलेले होते.
छकुलीला काही बरे वाटेना. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली. तिला जागेवरच उलटी होऊ लागली.
मुलांना, सोनाला तिची किळस वाटू लागली. मुलांनी चक्क तिला गोठ्यामध्ये ठेवले.
गोठ्यामध्ये एक चार पायी उभी केली. त्यावर काहीही न अंथरथा तिला चारपायी वर ठेवले.ना उशी, ना पांघरून दिले.
गोठ्यात आजूबाजूला शेणाचा वास, गायी गुरांचा आवाज, अवतीभवती डास, माशा अशा अवस्थेत छकुली एकटीच होती.
घर स्वतःच बांधलेलं असून त्याच घरातलं तिला बेदखल केली होती.
आजूबाजूची लोकं हे दृश्य पहात होती पण हळहळ व्यक्त करण्याशिवाय ते काही करू शकत नव्हते.तिच्या मुलांना समजवायला गेले तर त्यांच्या शिव्या ऐकून घ्याव्या लागत होते. त्यामुळे मग छकुलीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नव्हते.
छकुलीला ना कधी अंघोळ घातली, ना कधी तिची साडी बदलली. ना तिला मोठ्या हॉस्पिटल मधे नेले.
तिच्या आजूबाजूला उलटीचा वास.त्या मुळे लोकही तिला भेटायला येत नव्हते. तिने स्वतःहून आता अन्न पाणी सोडले. आणि अवघ्या 5 दिवसात तिने जगाचा निरोप घेतला.
मुले, सुना यांना हायसे वाटले. म्हतारीचे आता सर्व आपलेच आहे. या भ्रमात ते होते. शेती, घर सारे आपल्याला मिळणार त्याचे दोन भाग करून वाटणी करून आपण सुखात जीवन जगू असे त्यांच्या मनात होते.
छकुलीचे क्रिया कर्म झाले. पाहुणे मंडळीला बोलवण्यात आले. तेराव्याचा विधी मोठा करायचा ठरले. गाव जेवण घालायचे ठरले.
छकुलीचा तेराव्याचा विधी पार पडत होता. नातेवाईक मंडळीं मुलांना जरा दोषी धरतच, पण त्यांच्यासमोर वाक्य ही न बोलता क्रिया कर्माला हजर राहिले.
कार्यक्रम संपत आला होता तेवढ्यात एक वकील येऊन उभे राहिले. त्यांनी विचारले छकुली आणि राम यांची मुलं कोण आहेत आणि त्यांच्या सुना कुठे आहेत. छकुलीची मुलं आणि सुना पटकन धावत वकीला जवळ आले. काय झाले?काम आहे म्हणून विचारू लागले?
वकिलाने सांगितले राम जाण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या इस्टेटची वसीयत करून ठेवली होती. त्याचे मला वाचन करायचे आहे.
मुलांना थोडे कुतूहल आणि थोडा धक्का बसला. आपल्या वडिलांनी असे काही केले असेल असे त्यांना वाटलेच नव्हते. आपले आई-बाबा गेल्यानंतर वंशपरंपरागतेने आपल्याकडे हा वारसा येणार, ही जमीन आणि हे घर आपलेच होणार असेच त्यांना वाटले होते.
काही नातेवाईक मुलं आणि सुना यांच्या समवेत वकिलांनी वसीयत वाचायला सुरुवात केली, " मी लिहिणार राम गणपत साळुंके असे लिहितो की,माझ्या नंतर माझी ही जमीन आणि माझे घर फक्त माझ्या बायकोला म्हणजे छकुली गणपत साळुंखे हिलाच मिळावे.तिचा माझ्या मुलांनी उत्तम सांभाळ केला तरच त्यांना फक्त अर्धी जमीन द्यावी.
ती गेल्यानंतर मात्र ही जमीन आणि हे घर शासनाच्या ताब्यात देऊन टाकावे,ट्रस्टला देऊन टाकावे, नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमाला दान करून टाकावे. माझ्या मुलांचा माझ्या सुनांचा यावर काहीही अधिकार राहणार नाही. मी हे पूर्ण शुद्धीत लिहीत आहे. "
वकिलाने वसीयत वाचल्यानंतर मात्र मुलांचे आणि सुनांचे डोळे पांढरे झाले. त्यांच्या हातातून सर्व निसटले. या जमिनीवर आणि ज्या घरावर ते स्वतःचा हक्क गाजवत होते त्यावर त्यांचा कोणताही हक्क नव्हता.
मुलांना आपण आईला असे वागवले याबद्दल पश्चाताप झाला. राम आणि छकुलीने आपल्याच मुलांना उत्तम धडा शिकवला.
या कथेमधून आपण एक शिकावे की वृद्धांची जपणूक करावी काळजी घ्यावी. पैसा अडका आज आहे उद्या नाही. एकमेकांची काळजी घेतली तरच जीवन सफल होऊ शकते.
आणि ज्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानपणापासून जपलेले असते . त्याच आई वडिलांना जर तुम्ही असे वागवले तर पुढे तुम्ही सुद्धा म्हातारे होणार असता याचा विचार प्रत्येकाने करावा.
स्वतःचे म्हातार पण सुखात घालवायचे असेल तर वृद्धांच्या सेवा नक्कीच करा, आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या.
वृद्धांची सेवा करून प्रेमाचा सुगंध मिळतो
त्यांच्या अनुभवातून जीवन फुलवूया
मायेचा हात धरू, सन्मान त्यांचा करूया
ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घर आनंदाने सजवूया....
ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले
त्यांच्या ऋणाचे मोल कधीच न फेडले गेले
वृद्धांची जपणूक करू प्रेमाने, आदराने,
त्यांची काळजी घेतल्याने त्यांच्या मनी हास्य फुलले....
वृद्ध हे घराचे परंपरा दीप असतात
अनुभवांच्या प्रकाशाने मार्ग दाखवतात
त्यांची काळजी घेऊ मायेच्या छायेखाली
त्यांच्या आशीर्वादांची फुले फुलतात....
वसुधा वैभव नाईक, पुणे
अध्यक्ष, संस्थापक -वसुधा फाउंडेशन पुणे.
निवृत्त शिक्षिका, समाजसेविका, कवयित्री, लेखिका,
युवा क्रांती संघटना,(पोलीस मित्र )राष्ट्रीय जेष्ठ सल्लागार
