सुखदुःखाचा हिंदोळा
सुखदुःखाचा हिंदोळा
*सुख-दुःखाचा हिंदोळा*
आपले जीवन म्हणजे सुख, दुःख, आनंद, हर्ष, आसू, हसू अशा मिश्र भावनांचा हिंदोळा आहे.
जीवन म्हणजे सुख-दुःखाचा सतत झुलणारा हिंदोळा आहे. सुखाची सुरुवात झाली की काही दिवसांनी त्याला दुःखाची झालर लागायला वेळ लागत नाही. सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख,आनंद ह्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा सतत खेळ चालू असतो. संकटांची परिक्रमा चालू झाली की ती जिथे संपते तिथून सुखाची पायवाट चालू होते. असे हे आपले जीवन.
कधी आनंदाच्या शिखरावर नेणारे तर कधी दुःखाच्या खोल दरीत उतरवणारे असते.
सुख आले की मन प्रसन्न होते, उत्साह दुणावतो. जीवन प्रवास आनंदमय होतो.
दुःख जीवनी आले की मन खचते, पण तेच आपल्याला खंबीर बनवते. संकट समयी मार्ग काढायला शिकवते.
सुखात अनेक जण सोबत असतात, पण दुःखात खरी माणसे ओळखता येतात. आपल्या सोबत कोण आहे हे जाणता येते. म्हणून काय आपण दुःखाचे सतत बोल इतरांना ऐकवू नयेत. कोणालाही त्यात स्वारस्य नसते. आपले दुःख आपणच जाणावे. "सुख सांगावे जना दुःख सांगावे मना "
दुःखाचे क्षण माणसाला संयम, सहनशीलता आणि अनुभव देतात. माणसांची पारख देतात. खडतर जीवन प्रवासात जगायचे कसे हे शिकवतात. मनाला खंबीर बनवतात. कोणाची साथ मिळवून खंबीरपणे आपला पाय कुठे,कसा रोवायचा हे समजते.
तर सुखाचे क्षण जीवन जगण्याची नवी उमेद देतात. नवी शिकवण देतात.
दोन्ही गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
फक्त सुखाची अपेक्षा करणे अवास्तव आहे. सुखी जीवनात आळशी स्वभाव होईल." आळसे कार्यभाग नासतो " ही उक्ती इथे लागू पडते.
दुःखाशिवाय सुखाची किंमत समजत नाही. संकटांचा सामना करून जे सुख पदरात पडते त्याचे मोल अनमोल असते.
जीवनातील प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवून जातो.
अडचणींना घाबरून न जाता त्यांचा स्वीकार करावा.वेळ सारखी कधीच नसते. प्रत्येकाची वेळ बदलते.परिस्थिती बदलते आणि दुःखही कायम राहत नाही.
म्हणूनच प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगणे महत्त्वाचे आहे. सुख आले असता उतू नये. दुःख असल्यावर संयमाने वागावे.
सुख-दुःखाचा हा हिंदोळा स्वीकारूनच जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण बनते.
सुख-दुःखाचा हिंदोळा, झुलवी जीवनरंग
कधी हास्याची उधळण, कधी अश्रूंचा संग...
दोन्हींचा स्वीकार केला, मन होते विशाल
अनुभवांच्या शिदोरीने, जीवन होते कमाल....
वसुधा नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
