विमान
विमान
आनंदला आकाशात विमान दिसलें की ते दिसेनासे होईपर्यंत पाहण्याची भारी हौस होती. कितीही खेळण्यात दंग असला तरी खेळ थांबवून विमान बघत असायचा. शाळेतही वर्ग चालू असतांना विमानाचा आवाज आला की त्याचे ते विमानाचा आवाज ऐकू येईपर्यंत बाहेरच लक्ष असायचे. शिक्षक कितीदा त्याला वर्गात लक्ष नाही म्हणून शिक्षाही द्यायचे पण त्याचे मन काही ऐकायचे नाही. वर्गात शिक्षक नसले की बाहेर जाऊन विमान बघूनच यायचा. चित्रपटात जेव्हा विमान दिसायचे तेव्हा ते बघून त्याला वाटायचे की आपणही विमानात प्रवास करायला पाहिजे. त्याने त्याच्या आईबाबांकडे कित्येकदा हट्टही केला पण त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे त्याचा तो हट्ट पूर्ण करणे त्यांना शक्य नव्हते. आनंदचे बाबा एका कंपनीत जेमतेम पगारावर मशीन ऑपरेटर होते. आणि आई गृहिणी आणि आनंदला अजून एक छोटी बहीण होती. आनंदला आणि त्याची बहीण राधाला त्यांनी कसेबसे कमी फी असलेल्या शाळेत घातले होते. वर्षाची पाच हजार शाळेची फी होती. आणि शाळेची स्टेशनरी आणि इतर खर्चच त्यांना पेलत नव्हता. घरी आई बाबा जास्त शिकले नसल्यामुळे त्याला शिकवणी ही लावली की मुलगा चांगला शिकला पाहिजे आणि त्याचे आयुष्य सुखात गेले पाहिजे हा विचार करून स्वतः च्या पोटाला चिमटा काढून मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे. तो दरवेळी त्यांना विमानात बसण्याचा हट्ट करायचा. तेव्हा त्याची आई आनंदला बाळा तु खुप अभ्यास कर खुप मोठी नौकरी मिळव आणि मग तुझ्याबरोबर आम्हालाही विमानात बसव. आनंद तसा अभ्यासात हुशार असतो त्यामुळे तो त्याच्या शिक्षकांचा लाडका असतो.
एकदा शिक्षक सर्वांना वर्गात विचारतात मोठे होऊन तुम्हाला काय व्हायचे तेव्हा आनंद म्हणतो मला मोठा होऊन वैमानिक व्हायचे कारण विमान आवडते म्हणून मी वर्ग चालू असताना विमान वरून गेले की वर्गातल्या शिकवण्यावरून त्या विमानाकडे लक्ष जाते. तेव्हा शिक्षक आनंदला म्हणतात तुझे स्वप्न आहे तसेच ए पी जे अब्दुल कलाम यांचेही स्वप्न होते. ए पी जे अब्दुल कलाम ह्यांना शिक्षक एकदा वर्गात एकदा पक्षाची झेप, त्याची उडान, त्यांची गती ह्याबद्दल सांगत होते. ते मुलांना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी समुद्रावर घेऊन गेले आणि त्यांची इतम्भूत माहिती प्रत्यक्ष दिली. पक्षांचा एरोडायनॅमिक आकार, त्यांचे पोकळ हाड, त्यांचे पंख ह्यामुळे पक्षी उडू शकतात. हे समजून सांगितले. आणि त्यादिवशी पासून ए पी जे अब्दुल कलाम ह्यांनी एकच ध्यास घेतला की पायलट व्हायचे त्यांचे वडील ही एक नावाडीच होते त्यामुळे परिस्थिती हलाकीची होती पण त्यांनी त्या स्वप्नचा ध्यास घेतला आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी मेहनत केली ते वैमानिक तर नाही झाले पण मिसाईल मॅन झाले आणि वैज्ञानिक बनवून स्वप्न पूर्णत्वास नेले. म्हणून खुप अभयस कर आणि जिद्दीने तुझे स्वप्न पूर्ण कर. आनंदला ते पटले. पण ती पक्षाची आणि ए पी जे कलमांची गोष्ट ऐकून आनंदच्या मनात एक किडा भिनभिनला की आपण वैमानिक बनायचे अभ्यासही करायचा पण आपण स्वतः विमान बनवायचे. तो दिवस रात्र हे कसे करायचे ह्याचा विचार करायला लागला. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याच्याकडे एक सायकल होती त्या सायकलचे विमान बनवायचे तर त्याने त्याच्या बाबा मशीन ऑपरेटर असल्यामुळे भंगारवाला जवळून लोखंड घेतले आणि समोर आणि मागे विमानासारखा शेप बनवून त्याला लोखंडाचे पंख बनवून वेल्डिंग करून लावले आणि त्याला उडविण्याचा प्रयत्न करायला लागला पण ते काही उडेना. त्याच्या बाबांना हे माहित होते की ते उडणार नाही पण मुलाची एक तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याला मदत केली आणि त्याच्या संशोधक बुद्धीला चालना दिली.
अश्याप्रकारे ते विमान उडत नाही ह्यापेक्षा प्रयत्न केले काही बनविण्याचा ह्याचा आनंदला आनंद झाला आणि तो जोमाने अभ्यास करू लागला.