वेळ
वेळ
वेळच नाही! की आहे? कदाचित असेलही... दुसर्यासाठी नाही स्वतःसाठी! हा खरच. माणूस जगतो, कमवतो ते का स्वतःसाठी? आयुष्याच्या शर्यतीत धावताना दोन क्षण बसावं, थोडी विश्रांती घ्यावी असं कोणाला वाटणार नाही? कधी कोठेतरी विसावा घेताना भविष्याच्या भीतीची हलकीशी झुळूक अंगाला स्पर्श करून जाते. तिच्या मऊ स्पर्शाने देखील अंगाचा दाह होतो. विश्रांतीसाठी बसलेले आणि स्वः विचार करीत बसलेले ते मन मग धावू लागते. धावता धावता ना कधी अंदाज लागला धावण्याच्या ना कधी अंदाज लागला काय कमवले आणि काय गमवले याचा!
कमावलेले कधी सुटून गेले याचा ही हिशोब लागला नाही आणि शर्यतीत धावताना आयुष्याचा सर्व जमाखर्च नोंदीत करावा असं ही कधी वाटले नाही. का वाटावं? वेळच नाही ना तितका! नाही असं पण नाही. पण तो द्यायला फुरसत नाही. शेवटी नोंद करत असताना मनाची जी घालमेल होते ती वेगळीच. त्यातून जरी कधी नोंद केलीच आणि शर्यतीच्या शेवटी पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, धावत आपण होतो मग आपलं वेळेच्या नोंदवहीत साधं नाव ही नसावे? मग का धावत होतो आपण? मी सोडून बाकी सर्वांची नावे आहेत या विचाराने थोडस मन हलक होतं पण, अंतर्मनाला वाटतच की, मन रागावतं आणि आपल्याला विचारतं की, तू मला वेळ दिला नाहीस कधी? या शर्यतीत जे काही मिळेल ते तू घेत गेलास. धन, संपत्ती, माणसे अशा अनेक गोष्टींनी तू तुझे भांडार कायम भरते ठेवलेस पण, शर्यत संपल्यानंतर ते भांडार उघडण्याची ताकद देखील तुझ्यात राहिली नाही. ज्या गोष्टी कायम तुला तुझ्यासोबत ठेऊ वाटल्या त्याच गोष्टींना परकं करायची वेळ आली आहे तुझ्यावर!
एवढे सगळे तू कमावलेस खरे पण कधीतरी स्वतःसाठी वेळ दिला असतास. शेवटी तुला निराशा कमी आणि आठवणींच्या शिदोरीचे व स्वतःला पूर्णपणे ओळखल्याचे समाधान मिळाले असते. तु अगणित अंतर धावत राहिलास कधी कधी थांबलास देखील पण त्या विश्रांतीचा काय फायदा तिचा वापर नीट होत नसेल. वेळेनुसार काय मिळाले, काय गेले आणि वेळेने काय दाखवले सगळे पाहिले. पण वेळेचे पुस्तक वाचत असताना कधीच पहिले पान उलटले गेले नाही ज्यावर स्वः वेळेचा लेख होता आणि नेमका तोच सुटल्यामुळे शर्यतीनंतर घेतलेल्या परीक्षेमध्ये नापास होण्याची नामुष्की ओढावली. आणि लगेच मन काहूर झाले का मी ते पहिले पान सोडून कायम दंतकथेतील परीसारख्या आभासी संपत्तीच्या मागे पळालो?
