डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3.7  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

उकडीचे मोदक अन् नाती

उकडीचे मोदक अन् नाती

3 mins
466


              लग्न झालं ,सुट्ट्या संपल्या अन् श्रेय साक्षी ला घेऊन USA ला आला.नवा देश,नवे लोकं,नवा संसार सारी नव्याची नवलाई होती साक्षी साठी...!लग्नाआधी श्रेय सोबतचे फोन कॉल,व्हिडिओ कॉल दोघांना एकमेकांबद्दल असलेली माहिती आणि ओळख एवढेच काय ते गाठीला. नव्या जागी ॲडजस्ट होणं किती कठीण असेल ते देव जाणे? त्यातही तो देश परदेश असेल तर असे असंख्य विचार तिच्या मनात यायचे. 


काही दिवस नव्या जोडप्याचे एकमेकांना ओळखण्यात,एकमेकांच्या मधुर सहवासात भूरकन निघून गेले.मग सुरू झालं ते सोशल लाईफ. काही दिवसातच तिथे असलेले अनेक भारतीय कुटुंब तिच्या ओळखीचे झाले. आणि मग दूरवर असलेल्या अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांशी सुध्दा तिथल्या महाराष्ट्र मंडळात परिचय झाला.एवढ्या दूरवर असलेली ही देशी माणसं तिला अगदी गारव्या सारखी भासायची.


श्रेयचे ऑफिस,तिचा घर संसार सगळे कसे सुरळीत सुरू होते. नव्या संसारात ती सुद्धा अगदी मस्त रुळली होती. देश विदेश च्या वेळांचा योग्य समन्वय साधून घरच्यांशी संवाद साधणं त्यांची ख्याली खुशाली विचारणं .सगळं कसं अगदी मनाप्रमाणे सुरू होतं. यू ट्यूब वरून आपल्या इथल्या नवनवीन रेसिपी बघून त्या श्रेय ला खाऊ घालण्यात तिला वेगळाच आनंद मिळायचा.सोबतच पुढच्या भविष्यासाठी तिथे नोकरी करायची म्हणून त्याचीही तयारी. दिवस अगदी फुलपाखरासारखे उडून चालले होते. सगळा आनंदीआनंद होता. दूरवर असल्याने इकडचे सण वार ,आनंद मेळे हुकले होते तिचे पण तंत्रज्ञानाने ते सुद्धा सुकर झालेले.


पण जसजसा गौरी गणपती चा सण जवळ येऊ लागला मनीची रुखरुख वाढलेली. पण जाणं अशक्य असल्याने दोघांनीही मनाची समजूत घातली. मराठी मंडळ जो गणेशोत्सव साजरा करतो त्यातच आपण उस्फुर्त सहभाग घ्यायचा आणि गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद लुटायचा असं दोघांनीही मनोमन ठरवले.


दोघेही अगदी घरचाच उत्सव असल्यागत तिथल्या गणेशोत्सवात हिरीरीने सहभागी होऊ लागले. प्रतिष्ठापनाकार्यक्रम पार पडला. साक्षी ने यू ट्यूब वरून रेसिपी बघून स्वादिष्ट तळणीचे मोदक प्रसादला बनवले. विकतच्या मोदकांवर साक्षीचे घरगुती मोदक अगदी भारी पडले.खूप दिवसांनी असे घरचे मोदक खायला भेटल्याने श्रेय सोबतच इतरही बरीच मंडळी खुश झाली.

अन् आनंदाने साक्षीचा चेहरा ऊजळून निघाला.


दोन तीन दिवसांनी घरच्या गणपतीच्या प्रसादाला श्रेय ने उकडीचे मोदक केलेले पाहिले अन् झालं साहेबांच्या तोंडाला पाणी सुटले. साक्षीचे पाक कौशल्य पाहून अपेक्षा वाढलेला श्रेय लाडात येऊन साक्षीला "अगं उकडीचे मोदक बनवून बघ ना." म्हणून तिच्या मागे लागला. नवऱ्याच्या लाडिक आग्रहाला मान देऊन साक्षीने दुसऱ्याच दिवशी सामान आणून उकडीच्या मोदकांचा घाट घातला. नेहमीप्रमाणेच यू ट्यूब गुरुजींच्या शिकवणी नुसार सारे अगदी नियोजनबद्ध करून पाहिले पण प्रयोग फसलाच हो शेवटी! हिरमुसली साक्षी.पण होतेच आहे म्हणून श्रेय ने तिची समजूत काढली.


पण हार मानेल ती साक्षी कसली. दुसऱ्या दिवशी तिचा पडलेला चेहरा बघूनच आईने तिच्या नाराजीचे कारण विचारले. अन् आई किती मनकवडी असते याचा प्रत्ययही तिला आला. आईने तिला सांगितले अगं उकडीचे मोदक म्हणजे वाटते तितकं साधं सोपं काम नाही ग! ती उकड काढणे म्हणजे पाणी आणि पिठाचे योग्य प्रमाण,त्यात चिक्की यावी म्हणून घातलेलं चमचाभर मैदा,त्यातील तेलाचं थोडं प्रमाण त्याला हलकेच मळून त्याला मऊसर बनवणे,त्याच्या पात्या करणे ,त्यात गूळ खोबऱ्याच्या मिश्रणाचे सारण भरुन ते निगुतीने वळणं. अगं वरवर बघायला या क्रिया सहज वाटल्या न बेटा तरी हे इतकं साधं सोप्प नाही ग. वर्षानुवर्षे एकमेकांच्या सहवासाने जसं नातं एकरूप होत जातं त्यात ती सहजता ,लवचिकता येते ती म्हणजे एकप्रकारची मोदकाची उकडच ग. त्या नात्याला प्रेमाच्या ओलाव्याने मळले ना की ती अगदी मऊशार बनते ग. त्यात मग जीवनातील आनंद म्हणजे गूळ आणि मिश्किल क्षण म्हणजे खोबरं यांच्या मिश्रणाचे सारण त्यात खुबीने भरून अगदी निगुतीने ते वळणे म्हणजे त्या नात्याला प्रेमाच्या बंधनात बांधणे ग. आणि जीवनाच्या भट्टीत तावून सुलाखून बाहेर निघणे म्हणजे ते मोदक वाफवणे ग. म्हणूनच जेवढी यात मुरशील तेवढी सरावाने सरावशील बघ.आता मी दिलेल्या अगदी बारीक सारीक सुचानांसह पुन्हा घे ग मोदक बनवायला नक्कीच साधतील ते.


आईच्या दिलेल्या प्रत्येक सूचनेचा मागोवा देत ,त्यात तिच्या नात्याला मुरवत, त्याचा गोडवा भरत साक्षीने पुन्हा उकडीचे मोदक बनवले.काय आश्चर्य अगदी सुगरणीलाही लाजवेल असे रुचकर मोदक साक्षीने बनवले. सासरीसुद्धा तिला हे अवघड मोदक साधले याचे फारच कौतुक झाले. अन् आवडीचे मोदक खाऊन बाप्पा, श्रेय आणि सारे तृप्त झाले अन् नकळतच साक्षीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य तरळले.


Rate this content
Log in