STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

उदरभरण संस्कारांचे

उदरभरण संस्कारांचे

4 mins
287

      " रामराव कळलं का तुझा पक्या आज त्या आपल्या गावची चांडाळ चौकडी आहे ना तिच्या सोबत सिगरेट फुकत व्हता व्हय "नाऱ्या राम रावले सांगू लागला.

"खरं सांग नाऱ्या,जे बोलतोस ते खरं हाय व्हय?", "रामराव" हो म्या सोता पाह्यलय" नाऱ्या आता मात्र राम रावांचा पारा चांगलाच भडकला होता. राम राव तसा चांगल्या प्रवृत्तीचा माणूस! पण दोस्त भाई गोतावळा यांच्यासाठी मरमर करणारा अन् वेळ पडल्यास घराकडे दुर्लक्ष सुद्धा करणारा.मित्रांच्या गोतावळ्यात वाहणं इतकं वाढलं की तो प्यायला कधी लागला ते त्याचे त्याला सुद्धा कळले नाही. त्याच्या सारख्या चांगल्या माणसाला लागलेले हे व्यसन चांगले नाही हे त्याले कळत होते. खूपदा यापासून दूर जायचा तो स्वत: च विचार करायचा पण मित्र मंडळी समोर आली की मग सगळे संकल्प गळून जायचे आन् मागचे पाढे पन्नास असं व्हायचं अगदी. नाहीतर चागलं घरदार, चांगला स्थिर स्थावर झालेला व्यवसाय. गुणी,सुंदर बायको आणि सोन्यासारखी दोन लेकरं एवढं सगळं सुखासुखी सुरू असताना ह्या फंदात त्याने पडावेच का? हेच कळत नव्हते साऱ्यांना.एवढा कुटुंब वत्सल माणूस पण या एका गुणाने वाया गेलेला. राम रावाचे पोरं देखील फार गुणी, पण पोरगाही बापासारखाच मित्रवेल्हाळ! त्यामुळे त्याचे मित्र कोण असावेत यावर रामराव चा बारीक कटाक्ष असे.एवढे सगळे असूनही नाऱ्या घेऊन आलेली बातमी त्याला हादरवणारी होती. रामराव घरी पोचला. बराच वेळ होऊन गेलेला पण पोरगा अजून आलेला नव्हता. पोरगा प्रकाश नेहमीच्याच वेळेवर आला,आपल्या आधी बापाला आलेलं पाहून तो ही चपापला. तो मुकाट्याने आत जायला वळणार तेवढ्यात रामराव लेकावर गरजले. "कुठून आली म्हणायची स्वारी? फारच कामात दिसताय घरी यायला एवढा उशीर होतोय ते!" पोरगा चापापून जागीच थिजला.

"गावातल्या उनाड कार्ट्यांसह लईच काम असतील तुम्हाला. "बापाला आपले प्रताप कळले आता आपली काही खैर नाही,प्रकाश उर्फ पक्याला चांगलेच समजले. "कारभारीण आज यांना जेवण मिळणार नाही,आज यांनी केलेल्या कामाबद्दल आज यांना हेच बक्षीस!" असं बोलून रामराव तेथून तरातरा निघून गेले. वेळीच आवरलं तर पोरगं हातचं जाणार नाही हा विचार करूनच रामराव ने हे पाऊल उचललं. बापाचा आदेश ऐकून पोरगं उगीच अंगणात जाऊन बसलं. त्याची आई हळूच त्याच्यासाठी ताट घेऊन आली पण पोरानेही मनावर घेतलेलं,नाहीच जेवला तो. त्या दिवशी कोणीच जेवले नाही. सारं घर उपाशीच झोपलं. त्या चौबाऱ्यात राहणारी रामराव ची चुलत काकी हे सर्व न्याहाळत होती. नातू रात्रभर उपाशीच तसाच बसून राहिलेला बघून तिलाही रात्री अन्न गेले नव्हते. सकाळीच ही आजी उठली. सडा सम्मार्जन,स्नान उरकले. सोबत तिच्या प्रात: समयीच्या भूपाळ्या सुरूच होत्या.मग आजीने चुलीला सारवण करून हात जोडून जाळ केला अन् चहाचे आंधण चुलीवर ठेवले. दुसऱ्या बाजूला उकड काढून भाकरीचे पीठ ही मळले. चुलीतला जाळ थोडा बाहेर काढून ही आजी नातवा जवळ गेली. मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उठवले. चुळ भरायला पाणी दिले अन् चहा घ्यायला घरी घेऊन आली. पक्या चहा घ्यायला तयार नव्हता पण आजीने स्वतः च्या प्रेमाची ग्वाही देत त्याच्याशी संवाद साधणे सुरू केले. चहा सोबत तिच्या गप्पा अन् भाकरी थापण्याची तिची तयारी सुरू होती. कालच्या प्रकाराबद्दल ती त्याच्याशी बोलू लागली. बोलता बोलता गरम गरम भाकरी ठेचा अन् चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत तिनं त्याचापुढे सरकवलं. पक्या नाही नाही म्हणत असतानाही बळेच त्याला भाकरी खायला लावली अन् बोलणं सुरूच ठेवलं.

"बाप रागावला तुले काल तर राग आला असंल नाही? पर मायबाप आपले दुश्मन नसते रे लेकरा. आपल्या भल्यासाठीच करते ते सगळे." "असे मित्र कोण्या कामाचे राजा? जे आपल्याला चांगला रस्ता दावत न्हाईत ना ते आपले खरे मित्र न्हाईत बघ! म्हणून नेहमी चांगल्याच पोराईची संगत करावी." "बाबा रे असं नालायक लेकरू निपजन्या पेक्षा माझ्यासारखं निपुत्रिक राहिलेलं च बरं ना राजा!" आजी च बोलणं ऐकलं अन् पक्याचे डोळे पाणावले. खरं तर आजीचं सारं तत्वज्ञान तिनं दिलेल्या सात्विक अन्नसोबतच त्याच्या उदराचे अन् मन बुद्धीचे सुद्धा भरण करत होते. वडील रागावले अन् उपाशी राहावे लागले त्याचा खरं तर त्याला राग आलेला ,अख्खी रात्र त्याचं विचारात गेलेली.अजूनही राग उरातच घेऊन तो आलेला पण गरमा गरम भाकरीचे दोन चार घास पोटात जाताच डोकं सुद्धा चांगल्या विचारांनी प्रवृत्त झालेलं. आजीने केलेल्या मनाच्या मशागतीने स्वतःची चूक ही उमगलेली.

पक्या तिथून उठला तो स्वतः मधे संपूर्ण सुधारणा करण्याचे वचन आजीला देऊनच! पक्या तिथून गेला अन् मग अंगणात उभा असलेला रामराव तिला दिसला.आवाज देऊन तिने त्याला सुद्धा बोलावले. गरमा गरम भाकरी त्याच्या पुढे ठेवल्या. निपुत्रिक पण शुद्ध विचाराच्या काकीच्या हातचे ते सात्विक अन्न उपाशी रामराव ची नकळत भूक चाळवून गेले. सोबतच काकिने वडिलकीच्या नात्याने लेकाला सुद्धा तेच समजावले की अशी मित्र आपली खरी मित्र कधीच नसतात जी वाईट मार्गावर नेतात. अन् लेकाला सुधारायचे असेल तर रामराव ला आधी स्वतः मधे सुधारणा करणे जरुरी आहे. काकिच्या सात्विक अन्नासोबतचा उपदेशाचा डोस रामराव च्या सुद्धा चागल्याच पचनी पडला होता. रामराव आणि पक्या दोघांनाही त्यांची चूक उमगली होती अन् त्यांनी स्वतः मधे केलेली सुधारणा ही नव्या भविष्याची नांदी होती. रामराव पोराला उपाशी ठेवण्याच्या शिक्षेतून जे समजावू शकला नव्हता ते एका सत्व गुणात्मक भाकरीने करून दाखवले होते. म्हणूनच म्हणतात ना,जैसा खावे अन्न,वैसा होवे मन. ते काही उगीच नाही!

अन्नात घातलेल्या पदर्थांसोबतच जेव्हा बनवणाऱ्या च्या मनातील शुद्ध सात्विक भाव त्या अन्नात जेव्हा उतरते तेव्हाच ते अन्न सात्विक अन्न बनते अन् अगदी प्रसाद स्वरूपात कार्य करते.



Rate this content
Log in