तो आणि ती (भाग १)
तो आणि ती (भाग १)
ऊन डोक्यावर आलं तरी सुधा अजून आली कशी नाही. हरीचे लक्ष सकाळपासून वाटेकडे होते. असं कधी होत नाही सहसा.... सुधा रोज सकाळीच येते. काय झालं असेल, ती ठीक तर असेन ना, असे अनेक प्रश्न हरीच्या डोक्यात येऊन जात होते. दिवस उलटून गेला तरीही सुहाचा काही थांग नाही. संध्याकाळी आपल्या रोजच्या जागेवर जाऊन वाटही पहिली; पण तिथेही नाही. आता मात्र तो काळजीत पडला.
हरी आणि सुधा.... गरीब घरातले दोन तरुण. पहिली भेट पाटलाच्या शेतात राबताना !!! पाटलाच्या मुजोरीला न जुमानता सगळ्या मजुरांची मते मांडणारा, सर्वांना मदत करणारा अन नेहमीच चेहऱ्यावर स्मितहास्य बाळगणारा हरी. त्याच्या याच सगळ्या गुणांवर तर सुधा भाळली होती. अन सुधाचा तो समजूतदारपणा, तिचे ते बोलणे हरीला फारच भावले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.... मग ते रोज संध्याकाळी अगदी तळ्याच्या त्या काठाला जाऊन भेटणे, ते हातात हात घेऊन गप्पा मारणे, भविष्याविषयी स्वप्ने रंगवणे सगळे हळूहळू वाढतच गेले. दोघेही एकमेकांना कायमचे सोबती मानून बसले होते. पण परिस्थिती पूर्णतः वेगळीच होती. अन दोघांनाही त्याची जाणीव होती.
कालच रामाने त्या दोघांना सोबत पहिले तेव्हाच दोघेही घाबरले होते. पूर्ण गावभर नाही पण आपल्या घरापर्यंत तरी ही गोष्ट जाणार याची खात्री होती. आणि तसेच झाले होते . सुधाच्या घरी ही गोष्ट अगदी थैमानच घालून गेली. शिव्या, मार, दूषणं, हवं नको ते सगळं उरकल्यावर शेवटचा ठरलेला पर्याय म्हणून तिच्या लग्नाची गोष्टही पुढे आली. त्यादृष्टीने आता प्रयत्नही सुरु झाले. सुधाचे घराबाहेर पडणेही त्यासोबत बंद झाले. हरीची रुखरुख साहिकच होती. त्याला ह्या सर्व गोष्टींची कल्पना होतीच. सुधाच
्या विरहापेक्षा तिच्या काळजीने तो त्रस्त होता.
सुधाचे आज कामावर न येण्याचे कारण काय हे त्याला आता कळले होते. परंतु आपल्या प्रेमावर त्याला पूर्ण विश्वास होता. सुधा अशी खचणार नाही. आपल्यासाठी नक्कीच येईल, असे त्याचे मन वारंवार त्याला सांगत होते. या एवढ्या एका आशेवर त्यांच्या रोजच्या भेटण्याच्या जागेवर जाऊन तो बसू लागला. एक आठवडा गेला; परंतु सुधा काही अली नाही. तरीही त्याने आस सोडली नाही. आणि त्याचा विश्वास खरा ठरला !!
एके दिवशी तळ्याकाठी उदास मानाने हरी बसला होता. सुधाची फार आठवण येत होती. तितक्यात पलीकडून आवाज आला, हरी..... वर पाहतो तर समोर सुधा उभी. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. उठून धावतच तो सुधाजवळ गेला. तिला घट्ट मिठी मारली तेव्हा त्याच्या जिवात जीव आला. कितीतरी वेळ दोघे तशेच उभे होते. एकमेकांच्या मिठीत. शेवटी न राहवून सुधाला रडू कोसळले. आपल्या सोबत झालेल्या सर्व गोष्टी तिने सांगितल्या. सुधाचे लग्न ठरले होते. आणि त्यामुळेच न राहवून सुधा थेट हरीकडे निघून अली होती. हारीने ही गोष्ट ऐकली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याने सुधाला शांत केले. आता काहीतरी करायला हवे, याची त्याला जाणीव झाली. माहित असूनही त्याने सुधाचे मत विचारले. आपल्या आयुष्याचा साथी तिने तर केव्हाच निवडला होता. मनोमनी ती हरीला आपले सर्वस्व मानून बसली होती. सुधाने होकार कळवला . दोघांपुढे आता एकाच पर्याय शिल्लक होता, ह्या सर्व कचाट्यातून पळून जाणे आणि नव्याने आपले आयुष्य सुरु करणे. दोघांनाही हा निर्णय पक्का केला आणि दुसऱ्या दिवशी गावातून पळून जाण्याचे ठरवले. दोघेही आपापल्या घरची गेले. उद्याच्या चिंतेत पण मुक्तीच्या आनंदात !!!