STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Children Stories

3  

शुभांगी कोतवाल

Children Stories

सुंदर असे ते बालपण

सुंदर असे ते बालपण

3 mins
215

निष्काळजी जीवन , कोणतीही जबाबदारी नसलेलं , भरपूर रिकामा वेळ असणारं असं ते बालपण . आता फक्त आठवणीतच असणारं , आणि आठवणी सुद्धा पुसट होऊ लागल्या तरी लिहायला घेतलं की सगळं आठवायला लागतं . बालपण हरवलं पण त्याच्या आठवणी मात्र आहेत .

जेव्हा मोठे भावंडं शाळेत जात असत तेव्हा शाळेचं कुतूहल वाटे , कधी आपणही त्यांच्या बरोबर शाळेत जाऊ असं वाटायचं . पण जेव्हा खरंच शाळेत जायची वेळ आली तेव्हा मात्र ते अनोळखी वातावरण , शिक्षक आणि विद्यार्थी पाहून सुरुवातीला खरंच रडायला येत असे . आईला शाळा सुटली की परत घ्यायला यावं लागत असे , कधीकधी तर वर्गात न बसण्याचा हट्ट केल्यामुळे आईला तिथे शाळेच्या प्रांगणात बसून राहावे लागत असे .

पुढील वर्गात गेल्यावर कधी शाळेत पोहोचायला उशीर होत असे. सकाळी आईनी उठवलं की , अजून दहा मिनिटं झोपू दे असं म्हणून कंटाळा करतच शाळेत जात असू . तेव्हा हातावर पट्टीचा मार मिळत असे , पण आम्ही दुरून येतो , आणि शिवाय हुशार विद्यार्थी म्हणून कधी मार पडत नसे .

रिकाम्या वेळेत खूप हुंदडायचं , खूप तऱ्हे-तऱ्हेचे खेळ खेळणं , सायकल फिरवायची , दोरीच्या उड्या मारायच्या आणि त्यातूनही पडलं की गुडघे फोडून जखम झाली की खोबरेल तेल लावून आईकडून त्यावर फुंकर घालून घ्यायची , आणि दुसऱ्या दिवशी तेवढंच शाळेत न जायचं कारण मिळत असे . स्पर्धेत भाग घ्यायचा , त्याची तयारी करायची. खेळ असो वा गीतेचे संस्कृत अध्याय असो , तर कधी ग्रुप डान्स मध्ये भाग घ्यायचा असो , कॉलोनीतला गणेशउत्सवाचा सार्वजनिक कार्यक्रम असो , घरातल्या सगळ्यांचं प्रोत्साहन मिळत असे . 

दुपारी अभ्यास करून झाला की संध्याकाळची वाट पाहायची , हातपाय धुवून , वेणी घालून तयार होवून निघायचं मैत्रिणींबरोबर खेळायला , ते अगदी अंधार पडायची वेळ झाली , घरून बोलावणं आलं की , उद्या परत भेटूया असं म्हणून मैत्रिणींचा निरोप घ्यायचा . दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत तर दिवसा सुद्धा कुठे सावलीत बसून बैठे खेळ खेळणं , तर जाई जुई ची फुलं - कळ्या तोडून आणून , स्वतः साठी व घरातल्या स्त्रियांसाठी गजरे बनवून ते ओल्या कापडात ठेवून देत असू. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत ताजे टवटवीत रहात . 

सणावाराला , वाढदिवसाला नवीन फ्रॉक शिवून मिळत असे , तो घालून शेजारी- पाजारी दाखवून , किती छान दिसते म्हणून कौतुक करून घ्यायचं , खरंच किती गंमत , आणि किती तो निरागसपणा . 

आमचं घर नेहमी भरलेलं असे , आजी , आईवडील , काकाकाकु , भावंडं , चुलत भावंडं सगळे एकत्र रहात असत आणि खूप मजा होती . आता मोठे झाल्यावर त्या संयुक्त कुटुंबाची किंमत कळते आणि उणीवही भासते . 

शेजारी पण तसे खूप चांगले . वाढदिवस असो किंवा दसऱ्याला शमीची पाने असो , मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्यातही एक गंमत असे . कोणाकडे घरभरणी असो किंवा लग्नकार्य जर कोणी हात बघून ज्योतिष सांगतात असं कळलं की आम्ही सगळे लहान मुलं तिथे एकत्र येवून आपआपला हात दाखवून , शिक्षण किती , परदेशात जायला मिळेल का ? नवरा कसा मिळेल ? वगैरे प्रश्न विचारून मुकाट्याने बसून उत्तर ऐकून त्यावर विश्वास करत होतो. 

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा च्या घरी जायचं , मावस - मामे भावंडं पण असत , तिथेही खूप मजा करायची . घरी कासार येत असे , सर्व मुली व बायकांना काचेच्या बांगड्या घालून देत असे , तर कुणी मोठी ताई नेलपॉलिश लावून देत असे . 

मामा आम्हा सर्वांना शेतात घेवून जाई , तिथेच बागेत आंबे व पेरू ची मोठाली झाडं होती . येताना उसाच्या रसापासून गूळ बनवण्याच्या ठिकाणी पण जात असू , गुऱ्हाळ . बैलगाडीत बसायची भीती पण वाटत असे पण मजा सुद्धा यायची . 

शाळेचा रिझल्ट म्हणजे थोडी भीती असायची पण नेहमी पहिल्या नंबर ने पास व्हायची त्यामुळे तशी काही काळजी नसे . 

खूप मित्रमैत्रिणी , संयुक्त कुटंब व त्याची मजा , चांगले शेजारी , बालपणाचा मुक्तपणा , अज्ञानातला आनंद , निष्काळजी व सुखी जीवन , भविष्याची स्वप्न , उत्साह , मोठ्यांकडून होणारे लाड व कौतुक , थोड्यातही आनंद मानण्याची वृत्ती हे सगळं बालपण सुखावह करून गेलं . खरंच आहे " बालपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा " .प्रत्येकाला सुखी व आनंदी आणि समाधानी बालपण जगायला मिळो हीच अपेक्षा .


Rate this content
Log in