सर्वोत्तम क्षण
सर्वोत्तम क्षण


पुर्वी गावी आठवड्यातून एकदा बाजार भरायचा. तो ही लांबच्या दुसऱ्या गावात. तेथे जाण्यास बस असायची. तो दर शुक्रवारीच भरायचा. माझे बाबा आठवड्याचे सर्व सामान आणण्यास तेथे जायचे.
बस पकडण्यास आमच्या घरापासून थोडे दूर जावे लागायचे. बस मधून उतरल्यावर आणखी एक लहान रस्ता लागायचा. त्या लहान रस्त्यावरून आमच्या घरी यायला एक उताराची लांब वाट होती. आम्ही, म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ, घरातल्या खिडकीतून बाबांची वाट पाहत बसायचो. लांबून बाबा दोन दोन मोठ्या थैल्या आणतात ते बघून मी आणि भाऊ दुडू दुडू धावत त्या चढावावर जाऊन थैल्या घेत होतो. हलकी असेल तर बाबा द्यायचे, नाही तर कधी नुसता
माझा हात पिशवीला लावायचे. तेवढच माझं समाधान की मी बाबांना मदत करते. कधी कधी घरातल्या दरवाज्याकडे पोचलो की बाबा पिशवी माझ्याच हाती सोपवायचे तेव्हा पिशवीसकट मी खाली पडायचे. मग सगळे हसायचे, मी सुध्दा.
मग आई त्यातलं सगळं सामा
न काढायची. खूप काही असायचे पण सर्वात जास्त माझं आवडतं म्हणजे भाजलेले चणे. लक्ष्मी देवीला संध्याकाळी नैवेद्य असायचा. तसेच गोल, कडक, पावाच्या बांगड्या ही असायच्या. चहात बुडवून खायच्या. पण मी आणि भाऊ खायच्या अगोदर हातात घालून मिरवत होतो.
बाबा थकून आले म्हणून आई त्यांच्याकरता अर्धा कप चहा करायची. तेव्हा आम्हाला ही थोडा मिळायचा. तेव्हा मी, आई, बाबा आणि भाऊ मिळून तो चहा आणि पावाची बांगडी खात होतो.
चहाच्या कपात बांगडी जात नव्हती आणि मला ती तोडायची नव्हती. मग आई मला दुसरी तोडलेली द्यायची. ती चहात बुडवली की सगळा चहा पिऊन टाकायची आणि जाडजूड व्हायची. खाताना एवढी गोड लागायची की आता आठवणीने सुध्दा तोंडात चव आली.
तो क्षण मला अजूनही प्रिय वाटतो. तेव्हाची ती सवय मला अजूनही सुखावते. कारण मला अकरा साडे अकराला थोडा चहा घ्यावा असे आता ही वाटते व मी पिते ही पण फक्त ती पाव बांगडी नसते.