Nilesh Jadhav

Others

4  

Nilesh Jadhav

Others

स्पर्श..

स्पर्श..

5 mins
377


त्या दिवशी दसरा होता. एक दिवसाची जास्तीची सुट्टी काढुन मी गावाला निघालो होतो. आधी शिक्षण मग नोकरी या सर्वात काही गोष्टी मागे सुटून गेल्या होत्या खरं तर त्याच मला नव्याने गोळा करायच्या होत्या. मला माझ्या प्रेमाची कबुली द्यायची होती. तिला आज सांगायचं मग काहीही झालं तरीही. अगदी मनाशी ठाम निश्चय करून मी एस टी मध्ये बसलो होतो. ती माझी बाल मैत्रीण होती. जसा जसा मोठा होत गेलो तस-तसा मी तिच्या प्रेमात कधी पडलो हे माझं मलाच कळलं नाही. मला फक्त इतकंच कळत होतं की प्रेमात अमंगल अपवित्र असं काही नाही. कोणतंही प्रेम अपवित्र असूच शकत नाही. प्रेमाला बांध घालता येत नाही आणि म्हणूनच मी माझ्या प्रेमाची कबुली देणार होतो.

      तसं खुप दिवसातून मी गावाला चाललो होतो. आमचं गाव कोकणात आहे असेही म्हणता येणार नाही आणि पुण्याला आहे असेही म्हणता येणार नाही. आमचं गाव या सह्याद्रीच्या उतुंग रांगेत घाटमाथ्यावर वसलेलं आहे. या निसर्गाच्या खाणीत जन्म झाला मुळात हेच भाग्य. गावाला लहानपण मजेत गेलं. खुप आठवणी मनात साठवून आणि तिचा विचार डोक्यात ठेऊन गाडीच्या खिडकीतून मी बाहेर पहात होतो. कसं बोलायचं काय बोलायचं याचा विचार मनात कालवा करत होता. या सर्वात गाव कधी आलं कळलंच नाही. हमरस्त्यापासून आमचं गाव मैल दिडमैल लांब आहे. 

      बॅग पाठीवर अडकून मी निघालो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली ओल नुकताच पाऊस पडून गेलाय याची साक्ष देत होती. आजूबाजूला खासरात पिवळसर झालेल्या भातावर पाण्याचे थेंब तिरप्या झालेल्या उन्हामुळे चमकत होते. खासरात अजूनही पाणी होते. त्यामुळे भात काढायला अजून पंधरा दिवसांचा तरी अवधी लागेल हे कळत होतं. म्हणतात ना गावच्या मातीला एक वेगळाच सुवास असतो तसाच दरवळ सगळीकडे घुमत होता. मनाला प्रसन्न करणारे वातावरण मी माझ्या चष्म्याच्या आडून पहात होतो. घरच्या लोकांना, आज्जीला, आजोबांना भेटायची ओढ आणि मनात आणखी एक धाकधूक चालू असताना मधेच रस्त्यात कोणीतरी विचारत होतं. कसा आहेस..? कधी आलास वगैरे वगैरे.. थोडं अंतर गेल्यावर गावच्या विहिरीवर काही टाळकी पोहण्याचा आनंद घेत होती. मी तिकडे पहाण्याआगोदर पप्याने मला आवाज दिला "ये भावड्या ये पोहायला". पप्या माझा बालमित्र नात्याने चुलत भाऊ पण तो मित्रच जास्त होता. तसा तो तिन वर्ष माझ्यापेक्षा लहान होता. पण आम्हाला कळायला लागल्या पासून आम्ही दोघे कायम एकत्र असायचो. पप्याचं कपाळ थोडं मोठं होतं त्या मूळ आम्ही सगळे त्याला टकल्याच म्हणायचो. याची अजून एक खासियत म्हणजे याला अभ्यासात कधीच रस नव्हता. मातीचे बैल करणे, रानात फिरणे, सोनपाखरं पकडणे, असे काहीतरी त्याचे छंद होते. पप्या कसाही असो पण माझा जीवाचा जिवलग होता. थोडावेळ विहिरीवर थांबून आम्ही घरी जायला निघालो. 

        घरी जाताना मी पप्याला माझ्या मनातलं सगळं सांगितलं होतं त्यावर तो म्हणाला होता "भावड्या संध्याकाळी सोनं द्यायला गेलो की बोलून टाक" पप्याची ही आयडिया भारीच होती. घरी गेलो सगळ्यांच्या भेटी घेऊन समाधान वाटलं नंतर थोडंस जेवन करून बसलोच होतो तितक्यात पप्या आलाच मग आम्ही देवळाकडे गेलो. खुप दिवसानी गावातली सगळी मुलं जमा झाली होती सगळ्यांना भेटून बरं वाटत होतं. देवळापुढं अट्या-पट्या चा डाव रंगात आला होता. मी आपला बघत बसलो होतो कारण या खेळात चपळाई लागते आणि मी काय एवढा चपळ नव्हतो. अचानक पप्याने मला इशारा केला मी समोर पाहिलं तर ती समोरून येत होती मैत्रिणींच्या घोळक्यात का कोणास ठाऊक मला तिच जास्त वेगळी दिसली. एखाद्या नाजूक अशा फुलालाही लाजवेल इतकी ती सुंदर दिसत होती. क्षणभर वाटलं की जावं आणि बोलावं तिच्याशी पण नंतर वाटलं नकोच. कारण तिथे सगळ्या गावातली पोरं पण होती ना. आणि तिला एकटक पहाणारा त्या सर्वात मी एकटाच नव्हतो हेही कळायला मला वेळ लागला नाही . कधी संध्याकाळ होते आणि कधी तिच्याशी बोलतो असं झालं होतं मला. 

         पोरांशी गप्पा मारत, खेळ बघत कधी संध्याकाळ झाली कळलं सुद्धा नाही. मी उठून घरी गेलो तोंड वगैरे धुऊन मी नवीन कपडे घातले. आपटा घेऊन मग आम्ही मंदिरासमोर जमा झालो. मंदिरा समोर सोनं म्हणजे आपट्याची पानं लुटून मग ती पहिली देवाला व मग गावात घरोघरी जाऊन सोन वाटण्याची प्रथा आहे. घरातली लक्ष्मी हातात आरती घेऊन दारावर सोनं द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला ओवाळतात आणि सोनं घेतात आणि देतात. सोनं लुटल्यावर आम्ही जमेल त्या लोकांची गळा भेट घेत रामराम ठोकत गावात धूम ठोकली. पप्या आणि मी आम्ही दोघांनी बरोबर ठरवलं होतं की कुठल्या वेळेला तिच्या दारावर धडक द्यायची. त्या पध्द्तीने आम्ही एक एक घर घेत होतो सोनं देत होतो. रात्रीचं चाचपडत चिखल तुडवत होतो. एव्हाना खाली पॅन्ट पूर्ण खराब होऊन गेली होती आणि कपाळ तर टिळा लावून लावून संपूर्ण लाल होऊन गेल होतं. जस जसं तिचं घर जवळ येत होतं तस तसं काळजाच्या ठोक्याची गती वाढत चालली होती. लोकांची बाकीच्या पोरांची गर्दी तिच्या दारातून कधीच पार झाली होती. सोबत पप्या होता ना त्याने बरोबर मला उलट दिशेने आणलं होतं. 

     आम्ही तिच्या दारात गेलो बाहेर अंगणातच ती तिची आई आणि आज्जी तिघीही उभ्या होत्या. अपेक्षे प्रमाणे आरतीच ताट तिच्याच हातात होतं. मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो क्षणभर मी तिच्या डोळ्यात पाहिलं मला तिच्या डोळ्यात हरवल्यासारखं झालं. तिच्या हातातील ताटात असलेल्या त्या इवल्याशा निरंजनच्या प्रकाशात तिचं रूप जणूकाही उजळून निघालं होतं. नाही कदाचित तिच्याच तेजस्वी रूपाने त्या निरंजनला प्रकाश मिळाला असावा बहुदा. किती सुंदर आहे ना ही...! डोळे पण किती बोलके आहेत चेहऱ्याला साजेसं असं नाक सगळंच कसं जिथल्या तिथे. माझ्या मनात चाललेली कोलाहल अचानक थांबली आणि अंगावर रोमांच उभा राहिला. विजेचा झटका लागावा असंच काहीसं झालं कारण तिने टिळा लावण्यासाठी तिचा अंगठा माझ्या कपाळावर टेकवला होता. तो स्पर्श मी आजही विसरलो नाही काय जादू होती त्या स्पर्शात माहीत नाही पण हे सगळं विलक्षण सुखवणारं होतं इतकंच सांगेल. माझी नजर अजूनही तिच्याच डोळ्यात घुटमळत होती. खरं तर जे मला बोलायचं होतं सांगायचं होत ते तर माझ्या ओठांवर पण नाही आलं. या सगळ्यात पप्यानेच मला सावध केलं. 

      तिथून निघून गेल्यावर वाटेत पप्या माझ्यावर वेड्यासारखं हसत होता. आणि मी मी मात्र अजूनही तिथेच अडकलो होतो. त्याच्या नंतर मी कित्येकदा माझ्या प्रर्माची कबुली दिली तिने मला कधीच दिला नाही. पण तेंव्हाचा हा प्रसंग, तिचा तो स्पर्श कायम सोबत राहिला. माझं एक मत आहे प्रेमात शारीरिकतेच भय बाळगू नये. आत्मा शरीराचं आवरण घेऊनच वावरत असतो. सर्वांनाच हे कवच तोडून बाहेर येता येत नाही. प्रेम म्हणजे दोन आत्म्यांना परस्परात विलीन होण्यासाठी वाहणारी ओढ असते. आणि ही भावना जर एकतर्फी असेल तर मग प्रेम म्हणजे त्याग आहे. आणि प्रेम नेहमीच जिंकत. प्रेमात आतुरता असावी आसक्ती असू नये....


Rate this content
Log in