सपाट पायाची अपशकुनी
सपाट पायाची अपशकुनी


बऱ्याच दिवसांनी नाही खरंतर खूप वर्षांनी जवळची मैत्रीण अचानकपणे भेटली. इतक्या वर्षांनंतर होणाऱ्या भेटीचा आनंद दोघींच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. भेट अचानक आणि गप्पा बेसुमार असा सिलसिला चालू होता. कॉलेजमध्ये मध्ये ती नेहमीच टॉपर असायची..सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही हिरीरीने भाग घ्यायची. आणि सौंदर्य तर अफलातून...प्रत्येक वर्षी रोज क्वीन तीच ठरलेली असायची. दिसायला अप्सरा, स्वभावाने गोड..सगळ्यांना आपलंसं करणारी, MBA पूर्ण करून नामवंत कंपनीत मोठ्या हुद्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारी राघिणी वाटलं होतं गर्भश्रीमंत घराची सून असेल..प्रेमळ नवऱ्याची बायको असेल आणि गुण्यागोविंदाने तिचा संसार हसत असेल. शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्यावर तिच्याही आईवडिलांनी तिच्या लग्नाची जुळवाजुळव सुरू केली. ती दिसायला सालस ,सुंदर शिवाय स्वावलंबी असल्यामुळे समोरून नकार येईल याचा विचारही कोणी करत नव्हतं. बरेचसे कांदेपोहे व्हायचे पण शेवटी उत्तर नाही असंच असायचं. राघिणी सौंदर्यवती असली तरी ज्या पायांवर ती खंबीर उभी होती तेच पाय सपाट असल्याच कारण देऊन ती पसंद असतानाही पाहायला येणारं कुटुंब नकार कळवायचं.
मुलीचे पाय सपाट असणे म्हणजे अपशकुन असतो...ती ज्या घरात जाईल ते घर उध्वस्त होईल..अशुभ घटनाच घडत राहतील असे समज समाजात पसरलेले आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या समजुतींवर विश्वास ठेवणारी लोक आजही आहेत. कोणतं स्थळ राघिणीशी लग्नासाठी तयार झालंच तरी आजूबाजूचे,नातेवाईक तिच्या सपाट पायाच सत्य सांगून मोडता घालायचे. शेवटी शेवटी राघिणीही या सगळ्याला कंटाळून लग्न न करण्याचाच निर्णय घेते. पण आई वडील प्रयत्न करणं थांबवत नाहीत. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन सौरभ नावाचा मुलगा तिच्याशी लग्नास तयार होतो.. सपाट पाय असूनही. त्याच्या कुटुंबाचा नकार असतो पण राघिणीच्या घरची श्रीमंती, तिचं सौंदर्य आणि नोकरी पाहून ते होकार कळवतात. राघिणीचही वय वाढलेलं असतं..तीही आई वडिलांचा विचार करून लग्नास तयार होते. लग्नानंतरचे सुरुवातीचे गोड गोड बोलण्याचे, समजून घेण्याचे दिवस संपतात आणि राघिणीसमोर नवऱ्याचं, घरच्यांचं सत्य समोर यायला लागतं. बिझनेसमन आहे असं सांगून..तस दाखवून सौरभने राघिणीशी लग्न केलं होतं पण कोणत्याच एका बिझनेस वर तो टिकून राहत नव्हता. राघिणी आल्यापासून तर सगळं काम सोडून फक्त घरी तिच्या आलेल्या पगारावर ऐश करत होता...राघिणी स्वाभिमानी असल्यामुळे त्याचा हा स्वभाव फार काळ तिला पटला नाही.
हळूहळू दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. राघिणीची सासू घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला राघिणीलाच जबाबदार ठरवायला लागली त्यात राघिणीची जाऊही सासूचे कान भरायची. एकंदरीत घरचं वातावरण बिघडत चाललं होतं..त्यात लग्नाला वर्ष होऊनही अजून पाळणा हलला नव्हता त्यावरूनही राघिणीला टोमणे मारणं चालूच असायचं. स्वतःच्या नाकर्त्या मुलाला संसार चालवायच्या चार चांगल्या गोष्टी शिकवण्यापेक्षा राघिणीच्या सपाट पायाने घर उध्वस्त झालं हे बोलणं सासूला सोप्प होतं...सपाट पायांनी गृहप्रवेश केला आणि घरात अशांतता,दारिद्र्य घेऊन आली अस रोज राघिणीला ऐकावं लागायचं. राघिणी करारी होती..समजूतदारही होती पण आता तिच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. घर,संसार फक्त आणि फक्त तिच्याच जीवावर चालत असताना नको ती अंधश्रद्धा मानून तिला अपशकुनी ठरवलं जात होतं. सुशिक्षित घराच्या नावाला काळिमा फासणारे विचार ठासून भरलेल्या कुटुंबासोबत आणि नवऱ्यासोबत तिचं राहणं आता अशक्य झालेलं. नात्यांची घुसमट होण्यापेक्षा त्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेणं राघिणीने पसंद केलं. पैश्याची, पोटगीची मागणी न करता तिने सौरभकडून घटस्फोट मिळवला.
नातं तुटल्यावर दुःख व्हायला प्रेमाचे धागे बंधावे लागतात जे त्या दोघांत कधीच बंधले गेले नाहीत. बुरसटलेल्या विचारांपायी तिला अपशकुनी ठरवलं गेलं...तिच्यातल्या कला, कौशल्य, कर्तृत्व यांना डावललं जाऊन तिच्या सपाट पायांना अधोरेखित करून स्त्री म्हणून तिच्यावर अन्याय झाला..स्त्रीत्वाचा अपमान झाला याच दुःख तिच्या मनी नेहमी सलतं. आई वडिलांजवळ राहून त्यांना मनःस्ताप देण्यापेक्षा आज राघिणी सगळ्यांपासून दूर नवीन शहरात एकटीच राहते. समाजाची मानसिकता आजही बदलली नाही पण राघिणीचं आयुष्य मात्र बदललं. भूतकाळाला मागे सोडून ती खूप पुढे आले...आता कोणतं नात तुटण्याचं तिला भय नाही ना कोणतं नातं जोडण्याची इच्छा. तिच्या मुक्त आभाळात ती आनंदी आहे...यशाच्या नवीन पायऱ्या चढून रोज नव्याने भरारी घेते. तिची कथा ऐकून तिचं सांत्वन करण्याइतपत खचलेली ती नक्कीच वाटली नाही पण आजही अभिमान वाटावा..हेवा वाटावा अस स्वतंत्र अस्तित्व तिने निर्माण केलंय. पुढच्या प्रवासासाठी तिला खूप शुभेच्छा देऊन मी तिचा निरोप घेतला. मनात मात्र एक प्रश्न अजूनही घोळतोय...आजही एकविसाव्या शतकात सपाट पाय असल्याची शिक्षा एका मुलीला आयुष्यभर का भोगावी लागते?
सतीची प्रथा, बालविवाह,विधवा केशवपन, स्त्रियांचं चार भिंतीतलं जगणं,शिक्षणाला विरोध अशा अमानुष प्रथांचा कित्येक वर्षांआधी नायनाट झाला पण हे मुलीचे पाय सपाट असणे, अपशकुनी असणे, कुंडलीतील अशुभ मंगळ, केसातील जट या अंधश्रद्धा आजही स्रीभोवती वेटोळे घालून आहेत.तिचं आयुष्यच उध्वस्त करत आहेत...या मानसिकतेचा अंत केव्हा होईल??? कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित. आजही या गैरसमजुतीनी एका स्त्रीचं आयुष्य पणाला लागतं याच दुःख होतं पण या काटेरी वळणातूनही आपला मार्ग शोधत,हार न मानता,अश्रू ढाळत न बसता स्त्री तिच्या अस्तित्वाची लढाई यशस्वीपणे लढते,जिंकते याचाही आनंद आहे. कृपया तुमच्या नजरेत,ऐकिवात अशा अंधशश्रद्धे पोटी कोणा मुलीच भविष्य धोक्यात येत असेल तर पुढाकार घेऊन नक्कीच या घटना थांबवायचा प्रयत्न करा. ही अंधश्रद्धा मुळातून उखडून काढण्यासाठी प्रयत्न करा.