संकटाशी मुकाबला
संकटाशी मुकाबला
92 /93 ची दंगल. मिस्टर कामावरून आले, घरात चहा पाणी चाललं होतं आणि अचानक 12-15 वर्षाची दोन मुलं यांना बोलवायला आली. चाळीच्या तोंडाशी कोणतरी उभा आहे, तुम्हाला बोलावतोय.
त्यावेळी माझ्याकडे माझा भाचा होता, तो बेस्ट मध्ये ट्रेनिं होता तो कामावर गेला अजून आला नव्हता. त्याला कुठे काय लागलं की काय?, काही झालं की काय ?या शंकेने ते चाळीच्या तोंडाशी गेले .पण म्हणतात ना अशावेळी माणसाचा सहावा सेन्स जागा होतो तसाच माझा झाला आणि मला वाटले की आपल्या नवऱ्याला काहीतरी धोका आहे. आम्हीपण स्वसंरक्षणासाठी छताच्या आणि कौलाच्या ग्यँपमध्ये एक लोखंडी शिग ठेवली होती. ती हातात घेऊन मी धावत त्यांच्यामागे, व माझ्या पाठोपाठ पाय ओढत माझ्या सासूबाई .
बघतो तर काय गल्लीच्या तोंडाशी पंधरा-सोळा वर्षे वयाची पाच-सहा मुले हातात चाकू घेऊन उभी होती. दंगलीचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला कोणी नव्हते, अशावेळी मी आणि माझ्या सासूबाईंनी डेरिंग करून मध्ये उभ्या राहिलो. मी तर माझ्या नवऱ्याच्या पुढे जाऊन उभे राहिले, व त्या पोरांना जोरात ओरडून विचारलं "तुम्हाला काय वाटलं रे त्यांच्या पाठीमागे कोणी नाही "आणि अक्षरशः त्या पोरांना ढकलून त्यांच्या हातातले चाकू मी हिसकावून घेतले आणि माझ्या सासूने त्या पोरांच्या कानशिलात लगावल्या.
आमचा आवाज आणि गोंधळ ऐकून आजूबाजूची दोन माणसे जमा झाली आणि ती मुले फरार झाली अशा दंगलींमध्ये नेहमी खाजगी गोष्टीचा खुन्नस काढला जातो. कोणी केले ते आम्हाला नंतर समजले पण अशा अनपेक्षित प्रसंगात मी आणि माझ्या सासूने मोठ्या धैर्याने तोंड दिले.