श्वास मनाचा स्वच्छंदी जगण्याचा
श्वास मनाचा स्वच्छंदी जगण्याचा
स्वच्छ अर्थातच साफ निर्मळ ,मन जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधेलच ना. आणि प्रफुल्लित झालेले मन निश्चितच एक जगण्यातला मोकळेपणा अनुभवेल. मोकळेपणाने श्वास घेईल. पिंजर्यातल्या पक्षाला सोडून दिल्यानंतरचा त्याचा तो मोकळेपणा ,स्वच्छंदी जगण्यातला आनंद शब्दात न सांगता येण्यासारखा.
नियती नावाच्या मालकाने, आयुष्य रुपी पिंजऱ्यात, माणूस नावाच्या पक्षाला असे काही ठरवून पकडले आहे की, त्यातून माणसाची सुटकाच नाही. समोर येईल ते खायचं, फडफड करायची, कधीतरी व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचा, तिच्या आनंदात आपला आनंद मानायचा. या पिंजर्याच्या सळयाही भरभक्कम गोलाकार अशा. चहूबाजूने बंदिस्त केलेल्या. आलच मनात कधी तिच्या तर कधीतरी त्या बंधनातून बाहेर येणार आणि मोकळा श्वास घेणार. स्वतःचा आनंद जपणार. पण किती काळ? आणि सवयही लागलेली असते ना बंधनात राहण्याची.
पण हे बंडखोर मन कधीतरी बंड करतच. पिंजऱ्यातली बंधन सहन करून अगदी अगतिक होतं. मग प्रयत्न करतं बंधन विरहित आयुष्य जगण्याचा. शोध घेत आनंदाचा. तो शोधही व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न.
स्वच्छंदी जगण्याचा श्वास हा मोकळ्या मनातून तर आत मध्ये प्रवेश करतो. स्वच्छंदी मनच जगणही स्वच्छंदी करते. जे मिळते किंवा जे मिळाले त्यातच आनंद शोधलेला काय वाईट? "शोधा म्हणजे सापडेल" हे खोटे नसतेच. पण तसा प्रयत्न तर केला पाहिजे.
जेव्हापासून हे जग कळायला लागले तेव्हाची सुरुवात आठवावी. तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी यात कितीतरी अंतर असते. सुरुवातीची अजाण अवस्था कळण्या पलीकडची होती. पण आता तरी जाणते झालो आहोत ना !! का नाही एक वेगळा लूक देऊ शकत जगण्याला.
मन एवढं मोठं असावं की त्यात सगळं काही सामावून घेता येईल. अगदी सगळं. आणि एकदा का सामावून घेतलं की आपली जबाबदारी असते त्याला कोणत्या पद्धतीने न्याय द्यायचा? जवळजवळ लढाई तरी जिंका तोच आपण. पण मग कधीतरी उरलीच तर लढाई , दुसर्याच्या कलाने जिंकायची. मनावरचा ताण मग तो कोणताही असो सहजच मिटून जातो. मग त्या मोकळ्या मनाचा स्वच्छंद पणा तो काय वर्णावा?
मग हे पाखरू झालेल्या मनाला, स्वच्छंदपणे आकाशात विहरू द्यावं. निसर्गातल्या या सुंदर रंगांची उधळण पहावी. पक्ष्यांचा मधुर स्वर कानात साठवावा. किनाऱ्याच्या ओढीने या धावणाऱ्या या लाटा पाहाव्यात, तर कधी नदीच्या पात्रात मनसोक्त डुंबावं, बरसणाऱ्या धारांना मुठीत पकडावं, तर कधी आणि या निळ्या आकाशाला कवेत घ्यावं. दूरवर आसुसलेल्या क्षितिज पहावं, तरी या वसंत ऋतूतील चैतन्य अनुभवावं. बालपणातल्या निरागस हास्य, खळाळणाऱ्या हास्यातला मोकळेपणा, रडण्यातल कारुण्य जवळून पहावे. "आनंदाचे डोही आनंद तरंग" याचा अनुभव घ्यावा.
आणि माझ्यातल्या मी ला ओळखावं. स्वतःतल्या मी ला शोधावं. मला काय पाहिजे? माझा आनंद कशात आहे? याचे अवलोकन करावे. मी वर भरभरून प्रेम करावं.
त्या नीरव शांततेत स्वतःच्या मनाची स्पंदने ऐकावीत आणि स्वच्छंदी जगण्याचा मार्ग शोधावा.
