शब्द
शब्द
लेख लिहिताना किती व कशा शब्दांची गरज असते? आणि त्या शब्दांची साचेबद्ध पद्धतीने कशी मांडणी करावी? असे प्रश्न एखाद्या लेखकास केले तर नक्कीच आपली खिल्ली उडवली जाईल. लेखनासाठी लागणारे आणि तो लेख जीवित भासेल असेच शब्द वाचकांस तो लेख वाचण्याकरिता प्रवृत्त करतात. एक विशिष्ट प्रकारची साचेबद्ध पद्धतीने केलेली शब्दांची अलंकारित मांडणी त्या लेखनास एक छान उंची प्राप्त करून देते. उगाचच केलेल्या गचाळ मांडणीने शब्दांमधील सजीवता ही निघून जाते. एखादे चारशे पानांचे पुस्तक चार दिवस वाचले आणि झाले माझे वाचून अशा वरवरच्या वाचनापेक्षा तेच चारशे पानांच्या अंतरंगात जाऊन, त्यातील भुमिकेच्या सखोलात जाऊन तो लेख महिन्याभरात अनुभवने म्हणजे झाले वाचन! पुस्तकाच्या मुखपृष्ठ पासून ते मलपृष्ठ पर्यंत असलेला शब्दांचा, वाक्यांचा प्रवास म्हणजे त्या लेखकाचे विचार, स्वतःशीच असलेले युद्ध आणि स्वतःसोबत वाचकांसाठी सुखी जीवनाच्या खजिन्यात पर्यंत अधोरेखित केलेला मार्ग!
तो शब्दांचा काही पानांचा प्रवास त्याचे वेगवेगळे रंग दाखवून जातो. वाक्यांत श्वास निर्माण करित असताना प्रसंगी मृदु स्वभावाच्या लेखकास कठोर बनावे लागते. पुस्तक म्हणजे त्याच्यासाठी आयुष्य असते. त्याच जीवनाची अभिमुख मांडणी करीत असता बर्याच पानांशी संवाद होतो. शब्द एक हत्यार आहे. त्यास सारखी धार लावलेली कधीही चांगली. पण त्या धारेने एखाद्याच्या मनात प्रवेश करायचा की ते मनच तोडावे हे त्याच्या विचारांवर अवलंबून असते. एकाच वेळेस दोन कामे करायचे वरदान शब्दांस लाभले आहे. जसे चांगले शब्द वापरताना काळजी घेतली जाते तसेच ते कोठे वापरावे याचे असलेले आकलन खुप कमींना प्राप्त होते. शब्द किती जरी चांगले असले तरी त्यांची जागा त्यांची किंमत ठरवितात. कधी कधी काही शब्द वेगवेगळ्या भाषिकांना प्रेमळ बाहुपाषांत जखडून ठेवतात तर कधी तेच शब्द आपांपसातल्या वादाचे उगम ठरतात. कधी गचाळ वाटणार्या शब्दांमध्ये देखील प्रेमाची भावना जाणवते. शब्दांची चांगली वाईट रुपे आपण तयार केली. त्या एकेरी शब्दांस देखील स्वतःचा कद माहिती नसतो. शब्द आणि त्याच्या वापरातील कौशल्याने पुढील व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाची भुरळ आपल्या मनावर पडते. एकदा म्यानातून काढलेली तलवार ज्याप्रमाणे वार वाया न घालवता परत आपल्या स्थानी येत नाही त्याप्रमाणे एकदा बाहेर पडलेले शब्द परत घेता येत नाहीत. चांगल्या शब्दांचा सहवास मनाला स्वच्छंदपणे जगण्याची उमेद देऊन जातो. जीवनाच्या प्रवासात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचे साक्षीदार शब्दांना मानले गेले आहे. माणसासाठी केलेल्या चार चांगल्या कामापेक्षा माणूस जास्त त्याला बोललेले बोल आठवून जीवन जगतो.
शब्दांचा वापर आणि त्याची साचेबद्ध मांडणी फक्त लेखनाच्या कद उंची प्राप्ती साठी नक्कीच महत्वाची नाही. कधी कधी आपण कितीही विचार करून बोललो तरी समोरचा लावायचा तो अर्थ लावतोच. शब्द कसेही असले तरी त्यांच्या मागील भावना चांगली असली पाहिजे. भाषा कितीही स्वच्छ असली तरी वाद होतातच कारण, त्यामागील असणारा स्वार्थ. स्वतःच्या भांडारातील शब्दांची मुक्त उधळण काही प्राप्ती व्यतिरिक्त कोणाकडून कधीही होत नाही. माणसे जोडण्याचा प्रेमळ स्वार्थ त्यामध्ये दडलेला असतो. शब्दांच्या मुक्त उधळणीने कधी ध्येय प्राप्ती होते तर कधी स्वतःची जागा ही निघून जाते, कायम वर असलेली मान अशी खाली जाते की ती परत वर यायची विसरते. एक शब्द लाखो कामे करून जातो तर एक शब्द करोडो कामे उधळून ही लावतो. म्हणूनच ते पुस्तक म्हणजे आपले आयुष्य आहे. त्यातील असणारे प्रत्येक पान म्हणजे आपल्या जीवनातील माणसे आणि प्रत्येक शब्द म्हणजे आपले संस्कार, विचार जे त्या लेखनाच्या प्रत्येक पानाची एक विशिष्ट उंची निर्माण करतात, वाक्यांत आपुलकी निर्माण करतात आणि एक लेखक म्हणून प्रत्येक वाक्य, पाने त्या पुस्तकाशी प्रेमळ बंधनात जखडून ठेवल्याने स्तुती होते ती वेगळीच!
