सावरले
सावरले
गणू शेठ गावातील श्रीमंत कास्तकार .पन्नास एकर जमिनीचा मालक .स्वतःच्या मेहनतीने ,जमीनित
राबले .भरगच्च पिकं काढत गेले .गावात त्यांचा दरारा .घरात ,माणसांचा राबता .शेतावर भरपूर
मजूर ,गोठ्यात दुभती जनावरे .अशा या रुबाबदार गणू शेठांना तीन मुले होती .उमेश ,रमेश आणि दुर्गेश .
त्यांच्या आईची इच्छा होती की, माझा पोरगा एकटाच आहे . त्याला भरपूर गणगोत भेटावं म्हणून ,एका पाठोपाठ तीन मुलं झालीत .
गणू शेठ फारसे शिकलेले नव्हते ,त्यामुळे त्याना वाटायचे की ,आपली मुलं शिकली पाहिजेत. मी जरी
शेतकरी असलो तरी मुलं शिकून सवरून मोठ्या पदावर गेली पाहिजेत. म्हणुन त्यांनी ,गावातील चौथी
पर्यंतची शाळा झाल्यावर मुलांना ,शहरात शिक्षणासाठी पाठविले . मुलांचे करायला त्यांच्या आईला ,म्हणजेच मुलांच्या आजीला ठेवले .त्याना उत्तम शिकवण्या लावून दिल्या .गणू शेठला वाटले मुलं चांगली शिकतील .त्यांनी मुलांना खाण्यापिण्याला ,शिक्षणाला काहीच कमी पडू दिले नाही .
वर्षामागून वर्षे गेली .गणू शेठचे आता वय चाळीशीत आले .आयुष्यभराच्या दगदागिने शरीर थकले .मेहनतीची कामे जमेनात .गडी माणसांच्या भरवशावर शेती ,होऊ लागली .इकडे मुलं वडिलांच्या जीवावर शहरात मजा मारत होती .उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं घरी आली की ,त्यांची आई म्हणायची,
"पोरांनो ,तुमचे बाबा आता थकले घरी असले की जरा शेताकडे चक्कर मारत जा ."
चांगलीच वाया गेलेली मुले ,आईची गोष्ट कानावर कशी घेतील ? मुलांच्या वर्तनाचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर झाला. उमेश दहावीत नापास झाला . गणुशेठला फार वाईट वाटले .दुसऱ्या वर्षी रमेशची तिच गत झाली ,आता तर गणुशेठ पुरते थकले होते . मुलं शिक्षणातही नाहीत आणि शेतीची कामे केली नाहीत म्हणून तिथेही बोंबच .उमेश आणि रमेश काही काम न करता दिवसभर गावात नुसते फिरत . अशा रिकामटेकडया लोकांना व्यसन फार लवकर जडते . उमेश , रमेश गावातील दारूच्या अड्ड्यावर जाऊ लागली .
दुर्गेशने दोन्ही भावांची दशा बघितली .पुढच्याच ठेच मागचा शहाणा .तो अभ्यासाला लागला .डॉक्टर झाला .गणुशेठचा ऊर अभिमानाने भरून आला . दुर्गेशने त्याच्या दोन्ही भावांना व्यसनाच्या तावडीतुन बाहेर काढले .दोन्ही भाऊ शेती सांभाळून संसारात सुखात आहेत .
गणुशेठणी तिन्ही मुले शिकतील असे मनात ठरविले होते पण एकच शिकला .त्या एकाने दोघांना सावरले ,हे बघून त्यांचे मन समाधानी आहे .
