राधा (भाग १)
राधा (भाग १)


गावाच्या एकदम कोपऱ्याला एक छोटंसं खोपटं.... महिन्याची १ तारीख. संध्याकाळची वेळ झाली तरी अजून पत्र आलं नाही, म्हणून राधा वाट पाहत बसली होती. गावाकडं येणारी एकमेव पाऊलवाट होती ती. तीच काय ते बाकी जगाशी संपर्काचे साधन. आणि याच गावात ही प्रेमकहाणी सुरु झाली होती. शरदवर राधाचे जीवापाड प्रेम. त्याचाही तिच्यावर तितकाच जीव. अगदी लहानपानपासूनची ही मैत्री. तिचंच रूपांतर प्रेमात झालं होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. घरच्यांचीही संमती होती. पण अचानक शरदने शहरात जाण्याचा निर्णय घेतला. काम करून चार पैसे कमवावे आणि मगच आपला संसार थाटावा अशी त्याची इचछा. राधानेही त्याला विरोध केला नाही. एकदा तिकडे जाऊन जम बसला की तुलाही घेऊन जाइन, हे जाताना दिलेलं वचन....
दर महिन्याला शरद पत्र पाठवायचा. अन शेजारच्या ठकूकडून एकदा ते वाचून घेतलं की मग त्या पत्राला न्याहाळातच राधाचा पूर्ण महिन निघायचा. पण आता मात्र या वाट पाहण्याला राधाही कंटाळली होती. एक दिवस ठाकूकडूनच पत्र लिहून घेतले आणि पोस्टात टाकून दिले. त्यावर एक दोन महिन्यात गावी येतो, असे शरदचे उत्तर आले. ते ऐकून राधाच्या आनंदाला परवारच उरला नाही. तब्बल दोन वर्षांनी ती तिच्या शरदला पाहणार होती. शरदच्या येण्याचे ती अगदी दिवसच मोजू लागली. त्याच्याबरोबरच्या आयुष्याची स्वप्ने रंगवू लागली. शहराचे तिला आधीपासूनच भारी आकर्षण.... मनोमनीच तिने आपला शहरातला नवा संसारही थाटून टाकला होता.
बोलता बोलता २ महिने गेले, अन शरदच्या येण्याचा दिवसही उजाडला. सकाळपासून राधाचे मन कशातच रमेना. मनाची फक्त चलबिचल होत होती. संध्याकाळपर्यंत तिला दिवस काढायचा होता. शरद दुपारी गावात पोहोचला आणि लागलीच आपल्या घरी गेला. घरच्यांना भेटला आणि संध्याकाळ झाली तसा राधाकडे जायला निघाला. वाटेत तोही तिच्या आठवणींमध्ये हरवून गेला . दोन वर्षांपूर्वी अगदी गावाच्या वेशीपर्यंत त्याला निरोप द्यायला आलेली राधा त्याला आठवली आणि नकळत चेहऱ्यावर हसू आले. राधाच्या घरासमोर तो पोहोचला. राधा दारातच उभी होती. केव्हापासून त्याची वाट पाहत उभी होती तिलाच ठाऊक !!! दोघांनी एकमेकांना पहिले अन घट्ट मिठीच मारली. थोडा वेळ तसाच गेल्यावर दोघेही भानावर आले. शरद आत गेला. राधाच्या घरच्यांनाही भेटला. गप्पागोष्टी झाल्यावर त्याने लग्नाचा विषय काढला. तेवढे ऐकण्यासाठी राधा केव्हाची आतुर झाली होती. तिच्या घरच्यांनाही आनंद झाला. एक आठवडण्यात लग्न करायचे ठरले.
राधाचा इतक्या दिवसांचा विरह संपणार होता. ह्या दिवसाची तिने कित्येक वर्षांपासून वाट पहिली होती. ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा पार पडला. दोघेही खुश होते. दुसऱ्याच दिवशी शहराकडे जायचे ठरले. सगळी तयारी झाली होती. दोघांनीही सर्वांचा निरोप घेतला आणि निघाले. स्वप्नांच्या नव्या वाटेवर.... शेजारच्या गावात स्टेशन होत अन तिथून रेल्वे शहरात जात असे. राधा पहिल्यांदाच रेल्वेत बसली होती. सर्वकाही तिला स्वप्नवतच वाटत होतं. प्रवास सुरु झाला अन तिने निश्तिन्तपणे शरदच्या खांद्यावर डोकं ठेऊन दिलं. शरद तिला शहराविषयी सांगत होता. तिथली माणसं, तिथलं जीवन सर्वकाही किती वेगळं आहे, तिथे गेल्यावर थोडे दिवस तिला कष्टात काढावे लागती, वगैरे सांगून तिला हळूहळू गोष्टींची जाणीव करून देत होता. पण राधाचे लक्ष कशातच नव्हते. ती तिच्याच विश्वात रममाण झाली होती. तिचा शरद तिच्या सोबत होता आणि तिने इतकी वर्षे पाहिलेली तिची सर्व स्वप्नं आता पूर्ण होणार होती. तिने तशेच डोळे मिटले आणि त्या स्वप्नांच्या दुनियेत सामिल झाली.