STORYMIRROR

Meghana Suryawanshi

Others

3  

Meghana Suryawanshi

Others

प्रश्न

प्रश्न

2 mins
204

जीवन नावाच्या शहरातील गल्लींतून फिरत असताना मनात येणारा हा प्रश्न असा आहे की, शहर संपत आले तरी त्याचे उत्तर मिळत नाही. त्यास प्रश्न तरी म्हणावे का? प्रश्न कळेलचं पुढे. सगळ्या गोष्टी ठराविक वेळेलाच होतात आणि त्यांची घाई न केलेलेच चांगले असते कधीकधी. जीवनाच्या शहरात तीन गल्ल्या बालपण, तारुण्य, म्हातारपण! शहरात प्रवेश करीत असताना एकदम कुतुहल वाटते. नवनवीन गोष्टी स्वतःहून आपले मनद्वार उघडून आत येतात. पुढे कोणत्याही गोष्टीचा अंदाज नसताना फक्त समोरील एक आटपाट, सुंदर नगर फक्त दिसत असते.

         असे वाटते की फक्त तीन तर गल्ली आहेत पण त्या गल्लींतील घर, रस्ते सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असतो. प्रवेश करीत असताना ना कधी कल्पना असते भेदलेल्या जमीनीची ना कोरड्या तलावाची. असो पण ते लगेच थोडी आहेत! खूप दुरवर आहे त्यांचे स्थान. कधी मन भरकटलेच तर त्यांचे दर्शन नशीबाला लाभते. शहर फिरत असताना वेगवेगळ्या भेटवस्तूंची शिदोरी मिळते. सुख, दुःख, परिपक्वता, संपत्ती आणि बरेच काही. परिपक्वता सोडली तर बाकीच्या गोष्टी स्वतःहून चालत येतात आपल्याकडे. पहिल्या गल्लीत समजतच नाही मग राहिलेल्या एका गोष्टीचा उपयोग तो काय? अल्लड असणारे मन काल्पनिक जगातच रमत असते. मनोरंजनाच्या गल्लीत मौजमजा करीत असताना असं वाटतं की शहर एवढेच आहे. 

       पण काही कळायच्या आत पुढील गल्ली सुरू होते. एकदम वेगळी, नवीन आव्हाने, आशा आकांक्षा, आसक्ती, निराशा अशी. खुप सारी घरे आहेत त्यात. प्रत्येक पाऊल टाकत असताना मातीतील असणाऱ्या वेगळेपणाची जाणीव होते. जी गोष्ट मागच्या गल्लीत कधी वापरली नाही तीला नकळत हात घातला जातो आणि इतर गोष्टींसोबत तीची ही सोबत कायमची मिळते. डोळ्यांसमोर असणारा अल्लड जीवनाचा पताका वार्‍याने दुरवर फेकला जातो. खुप सार्‍या आव्हानांपुढे मन खुप एकाकी पडते असं वाटतं की मागच्या गल्लीत परत जावं आणि मन नकळत जातं ही आणि तिथेच रमत असताना सगळे हाकलून घालवतात, " वयानुसार कसं वागायचं समजत नाही का?" समजायला तर सगळे सोपे असते पण मुद्दाम समजून घ्यायचे नसते. असं वाटतं की सगळ्याच गोष्टी समजून आताच घेतल्या तर काय मज्जा शहर फिरायची. सगळ्याच गोष्टींची योग्य सांगड कधीच बसत नाही. पण भेदरत, कधी कधी निवांत केलेला दुसर्‍या गल्लीचा प्रवास संपत असताना परत मन भरारी घेते निवांत असणाऱ्या तिसर्‍या गल्लीकडे. 

        हा निवांतच आहे ती. ना काही आव्हाने, ना कामे. फक्त आपण आणि आपल्या आठवणींची सोबत. आणि एक एक गोष्टींचा ताळमेळ घालताना हजारो प्रश्न उपस्थित होतात ते करायचे का राहून गेले? खरच जीवनाचा पुर्णपणे आनंद लुटला का मी? का मी परिपक्वतेची शिदोरी कायम जवळ ठेवली? थोड्या वेळेसाठी जरा दुर केली असती तर पहिल्या गल्लीगत दुसरी गल्ली भासली असती हो ना? आणि कदाचित मन कधी दुःखी पण राहिले नसते सगळ्या गोष्टींचा विचार करून. फसवलं तर लहानमुलालाच जाते. फसलोच तर मनाने स्वतःला समजावलं असतं बाळा लहान आहेस तू! पण मग कायमच फसत राहिलो तर काय अर्थ शहर फिरण्याचा. 

        एकंदरीत प्रश्न हेच की परिपक्वतेची शिदोरी कायम जवळ बाळगावी का? कोणत्या गल्लीत तीचा किती वापर करायचा ह्याची पुर्णपणे नीट मांडणी का कधी कोणाला जमली नाही?       


Rate this content
Log in